भाजपचा ‘नवीन’ धक्का

अध्यक्षाच्या निवडीतून भाजपने सर्वसामान्य व्यक्तींनाही मोठी संधी दिली जाते, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भाजपच्या या धोरणांमुळेच त्यांचे कार्यकर्तेही कधी तरी आपल्यालाही योग्य न्याय मिळेल या प्रतिक्षेत असतात. भाजपने ते सूत्र नेहमी पाळले.

Story: संपादकीय |
21 hours ago
भाजपचा ‘नवीन’ धक्का

जनसंघानंतर भाजपची स्थापना झाली, तेव्हापासून आतापर्यंतच्या ४५ वर्षांच्या काळात प्रथमच बिहार राज्यातून भाजपने आपला अध्यक्ष निवडला आहे. जे. पी. नड्डा हे हिमाचलसारख्या छोट्या राज्यातील नेते आहेत. यापूर्वी तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र या राज्यांतून भाजपला अध्यक्ष मिळाले होते. विशेष म्हणजे यावेळी पक्षाची धुरा ज्या व्यक्तीकडे दिली आहे त्यांचे नावही चर्चेत नव्हते. गेले काही महिने अनेकांची नावे चर्चेत आली. पण नितीन नवीन यांचे नावही पुढे आले नव्हते. भाजप असेच धक्के देण्यात पुढे असते. राष्ट्रपतींची निवड असो किंवा उपराष्ट्रपतींची, मंत्र्यांची असो किंवा पक्षाच्या अध्यक्षांची. भाजपने असे धक्के वारंवार दिलेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांना हवा तसाच व्यक्ती अध्यक्षपदी नियुक्त होतो. त्यामुळे एका अर्थाने बिनविरोध होत असली, तरीही भाजपच्या अध्यक्षाची निवड ही काही प्रमाणात ठराविक लोकांच्या मर्जीतूनही होत असते. भाजपने या निवडीतून जसा सर्वांना धक्का दिला आहे त्यातून भाजप हा सर्वसामान्य व्यक्तींनाही मोठी संधी देतो, हेही पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. राजस्थान, मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री निवड असेल, अनेक राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांची निवड असेल किंवा राज्यांचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी असतील, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे पद मिळू शकते हे भाजपने पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे. नवीन हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. २०१०-१३ या कार्यकाळात भाजयुमोच्या टीममध्ये असलेले काही पदाधिकारी मोठ्या पदावर पोहचले, त्यात अनुराग ठाकूर हे मोदी यांच्या मागील मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. हर्ष संघवी गुजरातचे गृहमंत्री झाले. डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता नितीन नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. भाजपच्या या धोरणांमुळेच त्यांचे कार्यकर्तेही कधी तरी आपल्यालाही योग्य न्याय मिळेल या प्रतिक्षेत असतात. इतर राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय, पद मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही. भाजपने ते सूत्र नेहमी पाळले.       

हल्लीच बिहारच्या निवडणुका झाल्या. तिथेही भाजपला बिहारच्या जनतेने स्वीकारलेले दिसून आले. मागच्या निवडणुकांपेक्षा यावेळी जास्त जागा भाजपला मिळाल्या. तरीही भाजपने मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची वर्णी लावली. नितीश कुमार थकलेले असले, तरीही भाजपने तिथे युतीचा धर्म तोडला नाही. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूला समान जागा मिळाल्या होत्या. बिहारवर कब्जा करायचा असेल, तर सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत हे भाजपच्या लक्षात आले असेल. २०२९ च्या निवडणुकीत भाजपने बिहारला लक्ष्य केलेले असेल, तर त्यासाठी बिहारचा व्यक्ती पक्षाच्या अध्यक्षस्थानी आल्यास त्याला उत्तर भारतात फायदा होईल याचीही जाणीव भाजपला आहे. तिथे भाजपला आज ना उद्या एकहाती सत्ता हवी असल्यास बिहारमधील जनतेला भाजप त्यांच्या जवळचा हे दाखवावे लागेल. तिथली जातीय समिकरणे वेगळी असली, तरीही भाजप नितीश कुमार यांच्या मदतीनेच विस्तारत आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपला बिहारच्या राजकारणात शिरकाव करून घेण्यासाठी पुरेसे आहे. कारण सलगपणे तिथली जनता भाजपला स्वीकारत आहे. विधानसभेतील भाजपच्या जागा वाढत आहेत. जनगणनेनंतर मतदारसंघांची फेररचना झाली, तर तिथेही भाजप आपला हातखंडा वापरून काही आवश्यक बदल करू शकेल. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांसह आता बिहारवर भाजप आपला झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी थोडी वाट पहावी लागत असली, तरी बिहारची व्यक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी आणल्यानंतर बिहारमध्ये पक्षाचे वजन आणखी वाढू शकते, याचीही जाणीव पक्षाच्या नेत्यांना आहे. त्याचाच विचार करून भाजपने ही खेळी खेळलेली असावी. महाराष्ट्र, गोवा, दिल्ली या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये पुढे निवडणुका आहेत. तिथे भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. या राज्यांमधील राज्यपाल नियुक्त्या असतील किंवा संघ आणि भाजपचा विस्तार असेल, यावर भाजप कुठलाच गाजावाजा न करता शांतपणे काम करत आहे. विरोधकांमध्ये नसलेल्या एकीचा फायदा उठवून भाजप आपले काम करत आहे. नितीन नवीन यांची नियुक्ती ही भाजपच्या काही वरिष्ठांना आपल्याला हवे तसे काम करण्यासाठी मुभा मिळावी म्हणूनही असेल, पण पक्षाच्या विस्तारासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी ही निवड महत्त्वाची आहे.