ट्रम्प भारतीय तांदळावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत

Story: विश्वरंग- अमेरिका |
18 hours ago
ट्रम्प भारतीय तांदळावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय तांदूळ आणि कॅनडाहून येणाऱ्या खतांवर (फर्टिलायझर) नवीन आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे स्पष्ट संकेत देत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणांवर कठोर भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलरच्या (सुमारे एक लाख कोटी रुपये) नव्या मदतीची घोषणा करताना ट्रम्प यांनी सांगितले की, विदेशी आयातीमुळे अमेरिकेचे स्थानिक शेतकरी त्रस्त आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आता यावर कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.

ट्रम्प यांनी थेट भारतावर तांदूळ ‘डंप’ करत असल्याचा, म्हणजेच तो अमेरिकेच्या बाजारात अत्यंत स्वस्त दरात विकत असल्याचा आरोप केला. यामुळे अमेरिकेच्या तांदूळ उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते असे करू शकत नाहीत. आम्ही याची परवानगी देणार नाही, असा सज्जड इशाराही ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकेचे शेतकरी अनेक दिवसांपासून तक्रार करत आहेत की, भारत, व्हिएतनाम आणि थायलंडमधून येणाऱ्या स्वस्त तांदळामुळे त्यांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मी इतरांकडूनही ऐकले आहे की डंपिंग (स्वस्त आयात) होत आहे. आम्ही याची काळजी घेऊ, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर भारतीय तांदळावर नवा टॅरिफ येण्याची पूर्ण शक्यता आहे.

ट्रम्प यांनी केवळ तांदळावरच नाही, तर कॅनडाहून अमेरिकेत येणाऱ्या खतांवरही कठोर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेत वापरले जाणारे बरेच खत कॅनडाहून येते. गरज पडल्यास, आम्ही त्यावरही मोठा टॅरिफ लावू, ज्यामुळे अमेरिकेतच खतांचे उत्पादन वाढेल, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

या व्यापारविषयक कठोर धोरणांच्या घोषणेसोबतच, ट्रम्प यांनी अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलरच्या नवीन मदत पॅकेजची घोषणा केली. महागाई, वाढते खर्च आणि विदेशी आयातीचा मारा यांपासून शेतकऱ्यांना वाचवणे ही आपल्या प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांमध्ये शेतकऱ्यांचा एक मोठा गट आहे.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी भारताकडून येणाऱ्या अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले होते. भारत अमेरिकेच्या वस्तूंवर मोठा टॅरिफ लावतो आणि रशियाकडून तेल खरेदी करतो, या कारणास्तव ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी तेव्हा स्पष्ट केले होते.

- सुदेश दळवी