संकल्पविहीनत्व

कापुरात हिरा लपलेला सहसा कळत नाही. पण त्यावर पाणी पडले की, कापुराचे तुकडे विरघळून जातात आणि हिरा तसाच राहतो. त्याप्रमाणे हा मनुष्य जरी देहधारी असला तरी माया-संग त्याला बाधत नाही.

Story: विचारचक्र |
7 hours ago
संकल्पविहीनत्व

मागील लेखात आपण भगवद्गगीतेच्या नवव्या अध्यायाचा शेवट आणि माहात्म्य व दहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकासकट त्यावरील विवरण पाहिले. आता या लेखात दहाव्या अध्यायाचे पुढील श्लोक पाहूया.      

न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: ।     

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ।।२।।      

सरळ अर्थ : हे अर्जुना, माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतिसहित लीलेने प्रकट होण्याला देवगण जाणत नाहीत आणि महर्षीजनही जाणत नाहीत. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचेही आदिकारण आहे.      

विस्तृत विवेचन : अर्जुना, इथे वेदही मौनावले; मन-पवनही पांगुळले; रात्र नसूनही रवि-चंद्र मावळले (म्हणजे मला जाणून घेण्यासाठी निरुपयोगी ठरले) कारण या कोणालाही माझे दर्शन आजवर झालेले नाही! अरे बाबा, पोटातल्या गर्भाला आपल्या आईचे वय माहीत असते का? तसे माझ्या स्वरूपाचे ज्ञान देवांनाही जाणता येत नाही. जसे जलचरांना समुद्राचे माप आणि डासांना आकाश ओलांडता येत नाही, तसे महर्षींचे ज्ञानसुद्धा मला पहायला असमर्थ ठरते.      

मी कोण, केवढा, कोणापासून, केव्हा आणि कुठे उत्पन्न झालो, याचा निर्णय एकेक कल्पे निघून गेली तरी होत नाही. हे सगळे थोर थोर ऋषी, तसेच सगळे देव आणि हे जे जे सगळे दृश्यमान व भासमान आहे त्या सर्वांचेही मूळ मी असल्याने मी जाणायला कठीण आहे.      

जसे पर्वतावरून उतरलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढून जाऊ शकत नाही किंवा वाढणारे झाड आपल्या मुळाकडे जात नाही, अंकुरात वटवृक्ष सामावत नाही किंवा जसा लाटेमधे समुद्र सामावत नाही किंवा जशी अणुमध्ये पृथ्वी सामावू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले ऋषी, देव वा जीव मला जाणायला समर्थ नाहीत.      

असा मी जरी कितीही अगम्य असलो, तरीही जर कोणी ही सगळी बाह्यवृत्ती (म्हणजे इंद्रियांकडे धावणारी मनाची ओढ) सोडून देऊन, निश्चयाने माघारी वळून सगळ्या  इंद्रियांना पाठमोरा होऊन, देहभावाला दूर करून महाभूतांच्याही शिरी चढतो आणि तिथे स्थिर होतो, तो आपल्या मन:चक्षूंनी निर्मळ अशा आत्म-प्रकाशात निभ्रापणे माझे अजत्व (जन्महीन स्वरूप) बघतो.      

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।  असंमूढ: स मर्त्येषु सर्व पापै: प्रमुच्यते ।।३।।      

सरळ अर्थ : आणि जो मला अजन्मा अर्थात वास्तविकपणे जन्मरहित व अनादि तसाच लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यांमधील ज्ञानवान पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो.      

विस्तृत विवेचन : सकळ लोकांचा मीच महेश्वर आहे, आदीचेही पैलतीर मीच आहे, अशा प्रकारे जो मला तत्वतः स-आचार जाणतो, तो दगडधोंड्यांमधे लपलेला परीस किंवा रसांमधला सर्वोत्तम रस असलेले अमृत किंवा मनुष्यांमधे असलेला प्रत्यक्ष माझाच अंश आहे यात तिळमात्र शंका नाही. त्याला तू चालती बोलती ज्ञानाची मूर्ती समज. त्याचे अवयव हे सौख्यांकुरच असतात. लोकांना त्याच्यामधे मनुष्यत्व जाणवते, कारण त्यांची ती भ्रांती मोडू नये म्हणून लोकांतातही तो तसाच वागतो. कापुरात हिरा लपलेला सहसा कळत नाही. पण त्यावर पाणी पडले, की कापुराचे तुकडे विरघळून जातात आणि हिरा तसाच राहतो. त्याप्रमाणे हा मनुष्य जरी देहधारी असला, तरी माया-संग त्याला बाधत नाही. साहजिकच सगळे मानवी दोष त्याला सोडून निघून जातात. ज्या झाडावर साप असतो, त्या झाडाला आग लागल्यावर जसा तो साप ते झाड सोडून जातो, त्या प्रकारे ज्याला माझे ज्ञान झाले, त्याला सगळे संकल्प सोडून जातात. असो. आता माझ्याबद्दलचे ज्ञान कसे प्राप्त होऊ शकेल, असा विचार जर तुझ्या मनात डोकावत असेल, तर माझे रूप कसे आहे, माझे भाव कसे आहेत, जे प्रकृतीसारखे भिन्न भिन्न वस्तूंमधे व गोष्टींमधे आखिल त्रैलोक्यात सर्वत्र विखुरले आहेत, त्यांच्याबाबत मी तुला यथार्थ निरूपण करीन.      

बुध्दिर्ज्ञानमसंमोह: क्षमा सत्यं 

दम: शम: । 

सुखं दु:खं भवोsभावो भयं चाभयमेव च ।।४।।      

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोयश:।      

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा: ।।५।।      

सरळ अर्थ : आणि हे अर्जुना, निश्चय करण्याची शक्ती तसेच तत्वज्ञान व अमूढता, क्षमा, सत्य तसेच इंद्रियांना ताब्यात ठेवणे व मनाचाही निग्रह करणे, त्याचप्रमाणे सुख, दु:ख, उत्पत्ती व प्रलय त्याचप्रमाणे भय आणि अभय सुद्धा. तसेच अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती आणि अपकीर्ती असे हे प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात.      

विस्तृत विवेचन : हे कुंतीपुत्रा, माझे भाव जाणून घेताना पहिला क्रम लागतो तो बुध्दिभावाचा. त्यानंतर क्रम लागतो तो अमर्याद ज्ञानाचा. त्यानंतर मग इतर भाव क्रमशः येतात. सहनसिद्धी किंवा क्षमा, असंमोह (म्हणजे कशाचाही मोह/भ्रम न पडणे), सत्य, शम-दम (म्हणजे शांती, इंद्रियदमन व मनोनिग्रह), लोकांमधे असलेले सुख व दु:ख, हे सर्व माझेच भाव होत.      

- क्रमशः  


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३