शशी थरूर यांच्या भूमिकेकडे लक्ष

Story: राज्यरंग |
11th December, 10:45 pm
शशी थरूर यांच्या भूमिकेकडे लक्ष

केरळ विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआने मोठा विजय मिळवला असला तरी केरळमध्ये भाजपची तेवढी ताकद नाही. येथे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यातच थेट लढत अपेक्षित आहे. नुकत्याच एका कंपनीने केलेल्या निवडणूकपूर्व राजकीय सर्व्हेत काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्ता संपादन करेल, असा अंदाज वर्तवला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती शशी थरूर यांना मिळाली आहे. सध्या काँग्रेस आणि थरूर यांचे संबंध ताणले गेल्याने विधानसभा निवडणुकीत शशी थरूर कोणती भूमिका बजावतात याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘केरळ व्होट वाईब सर्व्हे २०२६’ मध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (एलडीएफ) पराभवाला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना यूडीएफचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सर्वाधिक २८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. इथेच काँग्रेसच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

शशी थरूर अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या सरकारचे कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेसच्या भूमिकेविरोधात ते मत मांडत आहेत. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नाहीत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. अशा स्थितीत थरूर काँग्रेसप्रणित आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत नकारात्मक चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत थरूर यांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम आहे.

थरूर यांच्याकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला परवडणारे नाही. तसे झाल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विदेशात गेलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केरळमधील एका कार्यक्रमात स्टेजवर बसलेल्या थरूर यांच्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्याचवेळी थरूर हे मोदी आणि भाजपच्या अधिक जवळ गेल्याची चर्चा सुरू झाली होती. शशी थरूर यांची सर्व्हेतून समोर आलेली लोकप्रियता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते, हे मात्र निश्चित.

- प्रदीप जोशी