या प्रकरणातून गोवा सरकारनेही बोध घेऊन अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत आणि बेजबाबदारपणाची काय किंमत असते, हे दाखवून द्यावे. चौकशीनंतर संबंधितांच्या सर्व मालमत्ता ज्या बेकायदा आहेत, त्या पाडून टाकाव्यात. त्यांना गोव्यात पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बंदी घालावी.

रोमिओ लेनचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा या बंधूंना आपल्या बर्च क्लबला आग लागल्याची बातमी कळल्यानंतर त्यांनी लगेच रात्री थायलंडची तिकिटे बुक केली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या दरम्यान त्यांनी दिल्लीहून विमानाने थायलंडला पलायन केले. गोवा पोलिसांनी त्वरित रात्रीच लुकआऊट नोटीस जारी केली असती, तर हे लुथरा बंधू दिल्लीच्या विमानतळावरच सापडले असते. पण गोवा पोलिसांकडून सर्वात मोठी चूक इथे झाली. क्लब जळत होता त्यावेळी लुथरा बंधूंनी ऑनलाईन तिकिटे बुक केली आणि पहाटेच्या विमानाने ते थायलंडला पसार झाले होते. तिथे फुकेतमध्ये ते राहत आहेत. आपल्या क्लबला आग लागून प्रचंड नुकसान होत असताना आणि लोक मरत असताना हे दोघेही बंधू विदेशात पळण्याची तयारी करत होते. यावरून त्यांना लोकांच्या जीवांची पर्वा नव्हती किंवा आपल्या मालमत्तेचीही चिंता नव्हती, त्यांना सुरक्षा यंत्रणांपासून दूर पळून जायचे होते. कदाचित, ते कुठे आहेत हे कळण्यास विलंब झाला असता, तर थायलंडमधून ते अन्य सुरक्षित ठिकाणीही पळाले असते. ११.४५ ला आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. इथे बचावकार्य सुरू होते, त्याची तमा न बाळगता लुथरा बंधूंनी पळ काढला. भलेही आता केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना थायलंडमध्ये स्थानबद्ध केले असले तरी ते इतर देशांतही पळू शकले असते. विशेष म्हणजे थायलंडला जाण्यासाठीचे सोपस्कार त्यांनी काही तासांत केले. एरवी गोवा पोलीस गोव्यातील मुलांसाठी तातडीने तासभरात लुकआऊट नोटीस काढत असते. पण दिल्लीत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सुरुवातीचे काही तास कुठलीच प्रक्रिया होत नाही. त्याचाच फायदा उठवून हे आरोपी विदेशात पसार होतात. ते पसार झाल्यामुळे हसे झाले, शेवटी गोवा सरकारचे. गोवा पोलिसांचे आणि गोव्याच्या प्रशासनाचे. एवढे मोठे अग्निकांड होऊन पंचवीस लोकांचा मृत्यू होतो आणि तो क्लब चालवणारे सरकारच्या हातावर तुरी देऊन पळ काढतात, असा संदेश लोकांपर्यंत गेला. हसे टाळता आले असते. त्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून मालकांना ताब्यात घेणे अपेक्षित होते. आता ती चूक सुधारण्यासाठी, थायलंडमधून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थायलंडशी भारताचे संबंध चांगले असल्यामुळे तिथून दोन्ही लुथरांना भारतात आणून इथे अटक करावी लागेल.
लुथरांना भारतात आणल्यानंतर गोवा पोलीस सोपस्करानंतर ताबा घेतील. पण त्यासाठी नेमके किती दिवस लागतील, ते अद्याप स्पष्ट नाही. न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अटकेचा मार्ग मोकळा आहे. या प्रकरणातून गोवा सरकारनेही बोध घेऊन अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत आणि बेजबाबदारपणाची काय किंमत असते, हे दाखवून द्यावे. चौकशीनंतर संबंधितांच्या सर्व मालमत्ता ज्या बेकायदा आहेत, त्या पाडून टाकाव्यात. त्यांना गोव्यात पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बंदी घालावी. घटना घडल्यानंतर काळजीने जे लोक गोव्यात न येता थायलंडला पळून जाऊ शकतात, त्यांना त्यांच्या बेजबाबदारपणाची किंमत मोजायला लावणे गरजेचे आहे. त्यांच्या उर्वरित मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा. गोव्यात व्यवसाय करून शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या लुथरा बंधूंनी आपल्या चुकांमुळे मृत्युमुखी पडेलल्यांना मदतीचा हातही पुढे केलेला नाही. मृतांच्या कुटुंबियांना आरोपींकडून मदत मिळवून देण्यासाठी गोवा शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आतापर्यंत गोवा सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख आणि केंद्राकडून २ लाख रुपयेच दिले गेले आहेत. क्लबची मालकी असलेल्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत मिळवून देण्याची गरज आहे. लुथरा बंधू सहजपणे सुटू नयेत. त्यांच्यावर मनुष्यवधाचा खटला चालायला हवा. गैरव्यवस्थापनामुळे २५ जणांचे बळी गेले आहेत, त्यामुळेच सौरभ आणि गौरव लुथरा यांच्यावर खुनाचे खटले चालायला हवेत. त्यांच्यासोबतच जे सरकारी अधिकाऱ्यांमुळे हे बेकायदा क्लब चालत होते, त्यांनाही शिक्षा व्हायला हवी. त्यांनीच दुर्लक्ष केल्यामुळे आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. फक्त लुथरा बंधूच नव्हे तर व्यवस्थापनात जे कर्मचारी, जे सरकारी अधिकारी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर खटले चालायला हवेत. असा भविष्यात कोणीही अशा बेकायदा गोष्टींना आश्रय देणार नाही.