मोदींच्या परदेश दौऱ्यांचे सकारात्मक फलित

पंतप्रधान मोदी यांच्या जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्यातील वक्तव्ये केवळ औपचारिक राजनैतिक सौजन्यापुरती मर्यादित नव्हती. ती भारताच्या नव्या जागतिक भूमिकेची, आत्मविश्वासाची आणि बहुपक्षीय राजनैतिक रणनीतीची स्पष्ट घोषणा होती.

Story: विचारचक्र |
17th December, 10:36 pm
मोदींच्या परदेश दौऱ्यांचे सकारात्मक फलित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरणाला केवळ औपचारिक कागदपत्रांपुरते न ठेवता, ते राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक पातळीवर सक्रियपणे पुढे नेले. त्यांच्या परदेश दौर्‍यांकडे पाहिले, तर त्या फक्त भेटी न राहता भारताच्या जागतिक स्थानाची पुनर्मांडणी करणाऱ्या राजनैतिक हालचाली ठरल्या आहेत. आज भारत दखल न घेतलेला देश राहिलेला नाही, तर अनेक जागतिक प्रश्नांमध्ये मत मांडणारा, दिशा देणारा आणि तोल साधणारा घटक म्हणून पाहिला जात आहे. या बदलामागे मोदी यांच्या आक्रमक, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रत्यक्ष संवादावर आधारित परराष्ट्र धोरणाचा मोठा वाटा आहे. पूर्वी भारताचे परराष्ट्र धोरण बऱ्याच अंशी संरक्षणात्मक होते. गट निरपेक्षतेचा आग्रह, मोठ्या शक्तींशी सावध अंतर आणि अंतर्गत प्रश्नांमुळे जागतिक व्यासपीठांवर मर्यादित हस्तक्षेप असे चित्र होते. मोदी यांच्या काळात मात्र धोरण बदलले. आज भारत अमेरिकेशी धोरणात्मक भागीदारी करतो. रशियाशी पारंपरिक संबंध टिकवतो, युरोपशी आर्थिक व पर्यावरणीय सहकार्य वाढवतो, पश्चिम आशियात संतुलन राखतो तर आफ्रिका व लॅटिन अमेरिका यांच्याशी नव्याने नाते जोडतो. हे व्यापक धोरण मोदींच्या दौऱ्यांतून स्पष्टपणे दिसते.

मोदी यांच्या परदेश दौर्‍यांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक संबंध. ते फक्त अधिकृत बैठकांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर राष्ट्रप्रमुखांशी थेट संवाद साधतात. अनौपचारिक भेटी, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग, भारतीय समुदायाशी थेट संपर्क यावर भर देतात. याचा परिणाम असा की भारताबाबतचा दृष्टिकोन अनेक देशांत शासकीय पातळीपुरता न राहता, राजकीय आणि सामाजिक पातळीवरही सकारात्मक होतो. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, आफ्रिका किंवा अरब देशांत सर्वत्र भारतीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष उपस्थिती जाणवते.

मोदींच्या परदेश दौर्‍यांचा एक मुख्य उद्देश म्हणजे भारताला गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून सादर करणे. ‘मेक इन इंडिया,’ ‘स्टार्टअप इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘ग्रीन एनर्जी’, या संकल्पना केवळ देशांतर्गत न राहता, परदेशात नेऊन मांडल्या गेल्या. थेट परकीय गुंतवणूक वाढली, संरक्षण उत्पादन, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात करार झाले. भारत उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. जागतिक कंपन्यांना चीनपलीकडील पर्याय म्हणून भारत अधिक विश्वासार्ह वाटू लागला, हेही या दौर्‍यांचे अप्रत्यक्ष फलित आहे. 

मोदी यांच्या परदेश दौर्‍यांनी भारताच्या संरक्षण क्षमतेलाही चालना दिली. संयुक्त लष्करी सराव, समुद्री सुरक्षेतील सहकार्य, दहशतवादाविरोधात जागतिक पाठिंबा हे मुद्दे सातत्याने पुढे आले.

विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्यातील वक्तव्ये केवळ औपचारिक राजनैतिक सौजन्यापुरती मर्यादित नव्हती. ती भारताच्या नव्या जागतिक भूमिकेची, आत्मविश्वासाची आणि बहुपक्षीय राजनैतिक रणनीतीची स्पष्ट घोषणा होती. 

जॉर्डनमध्ये केलेल्या वक्तव्यांत मोदींनी दहशतवाद, कट्टरवाद आणि अस्थिरतेविरोधात सामूहिक लढ्याचा मुद्दा ठळकपणे मांडला. हा संदेश फक्त जॉर्डनसाठी नव्हता; तो मध्यपूर्वेतील संपूर्ण इस्लामी जगाला उद्देशून होता. भारत स्वतःला केवळ पीडित देश म्हणून नव्हे, तर जागतिक सुरक्षा चर्चेतील नैतिक भागीदार म्हणून पुढे येत आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा उल्लेख न करता, सार्वत्रिक मूल्यांच्या भाषेत मुद्दा मांडणे ही मोदींची परिपक्व राजनैतिक शैली दिसते.

भारत टोकाच्या विचारसरणीविरोधात आहे, कोणत्याही धर्माविरोधात नाही, भारत हा विकास भागीदार आहे असे म्हणताना इथिओपियातील वक्तव्यांमध्ये मोदींनी वारंवार विकास, क्षमता निर्माण, तंत्रज्ञान आणि मानवकेंद्रित प्रगती यावर भर दिला. आफ्रिकेसाठी भारत स्वतःला शोषक शक्ती नव्हे, तर विश्वासार्ह मित्र म्हणून पुढे आला आहे. ओमानसंदर्भातील वक्तव्यांत मोदींनी भावनिक भाषेपेक्षा व्यवहार्य आणि रणनीतिक निवेदने केली. तिन्ही देशांतील वक्तव्यांचा सूर एकच होता, तो म्हणजे उपदेश नाही, हस्तक्षेप नाही, दबाव नाही पण स्पष्ट भूमिका आहे. हीच बाब भारताला अमेरिका-चीनसारख्या महासत्तांपेक्षा वेगळे स्थान देते.

मोदींची वक्तव्ये ही आंतरराष्ट्रीय असली, तरी त्यांचे देशांतर्गत राजकीय अर्थही आहेत. नेतृत्वाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी, भारतीय कामगार, व्यापारी, गुंतवणूकदार, मध्यमवर्गीय मतदारांसाठी सुरक्षा आणि स्थैर्य देण्याची ग्वाही त्यामध्ये आहे. आजचा भारत ऐकतो, जोडतो, भागीदारी करतो. पण आपल्या हितांवर ठाम राहतो, हीच भूमिका मोदींच्या प्रत्येक वक्तव्यातून, शब्दांपेक्षा सुरातून आणि संदर्भातून अधिक ठळकपणे उमटते.

योग, संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद, भारतीय जीवनशैली यावर भर देत राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वेगळेपण सांगायला मोदी विसरले नाहीत. अर्थात, मोदींच्या परदेश दौर्‍यांवर टीकाही होते. दौऱ्यांची संख्या जास्त आहे का, देशांतर्गत प्रश्नांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, हे प्रश्न उपस्थित होतात आणि ते गैर नाहीत. जागतिक मंचावर मिळणारा मान, देशांतर्गत वास्तवाशी सुसंगत असणे गरजेचे आहे. परदेश दौरे हे साधन, अंतिम उद्दिष्ट नाही. त्यामुळे भारत उद्या जगाला दिशा देईल की नाही, हे या दौर्‍यांतून मिळालेल्या संधी आपण कशा वापरतो, यावर अवलंबून आहे.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४