विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ शक्य

Story: राज्यरंग |
18th December, 10:17 pm
विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ शक्य

विधानसभेची निवडणूक पुढील वर्षात मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने शिल्लक असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल सत्ताधाऱ्यांविरोधात जाणे, हे राजकीय बदलाचे लक्षण आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पीछेहाट झाली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय नोंदवला. राजधानी तिरुवनंतपूरम महापालिकेचा निकाल सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. या महापालिकेतील डाव्यांची पाच दशकांची मक्तेदारी मोडून काढत भाजपने भगवा फडकवला. यापूर्वी २०१५ आणि २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत डाव्या आघाडीने यश मिळवले होते. विशेष म्हणजे दोन्ही निवडणुकांत डाव्या आघाडीची सत्ता आली होती. हाच कल कायम राहिल्यास राज्यात सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेसच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या येणे शक्य आहे.

राज्यातील १,१९९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ९ आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले. यात ६ महापालिका, ८६ नगरपालिका, १४ जिल्हा परिषदा, १५२ पंचायत समित्या आणि ९४१ ग्रामपंचायतींचा समावेश होता. तिरुवनंतपूरम महापालिकेत भाजपने १०१ पैकी ५० प्रभागांत विजय मिळवला आहे. डावी लोकशाही आघाडीला (एलडीएफ) २९ आणि काँग्रेस आघाडीला (यूडीएफ) १९ प्रभागांमध्ये, तर २ जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. माजी आयपीएस अधिकारी आर. श्रीलेखा तिरुवनंतपूरम् महापौरपदाच्या प्रमुख दावेदार आहेत. यापूर्वी भाजप ३४ जागांसह महापालिकेत विरोधी पक्ष होता.

महापालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात संघटन वाढविण्यासाठी दहा वर्षांत भाजपने बरेच प्रयत्न केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता; पण भाजपने प्रयत्न सुरूच ठेवले. लोकसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघ भाजपने जिंकला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामपंचायतींमध्ये १४४२, नगरपालिकांमध्ये ३२४, महापालिकांमध्ये १०० सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत. भाजपच्या मतांच्या टक्केवारीतील वाढ लक्षणीय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या आशा वाढल्या आहेत.

या निवडणुकीत ९०४ पैकी ५०५ ग्रामपंचायती, १४ पैकी ७ जिल्हा परिषदा, ८७ पैकी ५४ नगर परिषदा आणि सहापैकी चार महापालिकांमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला सत्ता मिळाली. विधानसभा निवडणुकांत आजवर डाव्यांची ‘एलडीएफ’ आणि काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ यांच्यातच सत्तेची अदलाबदल होत राहिली आहे. आगामी निवडणुकीतही वेगळे होईल, असे अपेक्षित नाही; पण सर्वच राजकीय पक्षांच्या जागांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, याची पूर्वसूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून मिळाली आहे.

- प्रदीप जोशी