
गेल्या काही वर्षांत राज्यात असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. विशेष करून कोविडनंतर ही आकडेवारी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०२२ ते २०२४ दरम्यान कर्करोगाचे ५,२१८ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १४५ तर दिवसाला सरासरी ४ रुग्ण आढळले होते. तर मागील दोन आर्थिक वर्षात मधुमेहींची संख्या ८ टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णसंख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र यासाठी बदलेली जीवनशैली हे एक प्रमुख कारण मानण्यात येते. कामावरील, घरातील तणाव, निकृष्ट आहार, अतिरिक्त प्रमाणात जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव अशा विविध गोष्टी आजारात वाढ करत आहेत.
बदललेल्या जीवशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदय विकार, लठ्ठपणा, पक्षाघात, उच्च रक्तदाब असे विविध आजार होत आहेत. मागील दहा वर्षांत राज्यात मधुमेहाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या १२५.७० टक्क्यांनी, कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५६.६१ टक्क्यांनी तर हृदय विकाराने आणि हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या २२.५८ टक्क्यांनी वाढली आहे. वरील कालावधीत हृदय विकाराने आणि हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर कर्करोग, मधुमेह यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.
याआधी देखील असे आजार होतेच. मात्र सध्या या आजारांच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू पडणाऱ्याची आकडेवारी वाढत आहे.
सरकारने टाटा मेमोरियल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार असंसर्गजन्य आजाराबाबत दीर्घकालीन अभ्यास केला जाईल. यानुसार हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि दीर्घकालीन श्वसन रोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांची कारणे शोधण्यासाठी राज्यातील १ लाख लोकांचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये लोकांची अनुवांशिकता, जीवनशैलीचा अभ्यास आणि पर्यावरणीय प्रभावाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. सरकाने पुढाकार घेतला आहे. तरी ही केवळ सरकारची जबाबदारी म्हणून अंग झटकता येत नाही. यासाठी लोकांनी स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. आपल्या जीवनशैली, आहारात बदल करणे देखील तितकेच आवश्यक आहे.
कामाचा तणाव न घेता आयुष्य जगता आले पाहिजे. काम आणि आरोग्य यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. गोव्याला निसर्गाची देणगी मिळाली आहे. सुदैवाने येथील हवा अजूनही चांगली आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. सकस आहार, व्यायाम, पुरेशी विश्रांती, व्यसने बंद करणे इत्यादी केले तरी आरोग्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते.
- पिनाक कल्लोळी