'सिंकहोल' : कोन्या मैदानावर मानवनिर्मित संकट

Story: विश्वरंग - तुर्की |
5 hours ago
'सिंकहोल' : कोन्या मैदानावर मानवनिर्मित संकट

तुर्कीचे 'अन्नभांडार' म्हणून ओळखले जाणारे कोन्या मैदान सध्या एका अभूतपूर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटाचा सामना करत आहे. तुर्कीच्या एकूण कृषी क्षेत्रापैकी ११.२ टक्के वाटा असलेल्या या प्रदेशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे जमिनीला पडणारे महाकाय खड्डे म्हणजेच 'सिंकहोल' शेती आणि मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय बनले 

आहेत.

कोन्या तांत्रिक विद्यापीठाच्या अहवालानुसार, २०१७ मध्ये या भागात केवळ २९९ सिंकहोल होते, जे २०२१ पर्यंत वाढून २,५५० झाले आहेत. २०२५ च्या सुरुवातीलाच २० नवीन मोठ्या सिंकहोलची नोंद झाली असून, त्यातील काहींची खोली ३० मीटरपेक्षा जास्त आणि रुंदी १०० फुटांपर्यंत आहे. तुर्कीची आपत्कालीन संस्था एएफएडीनुसार, केवळ करापिनार जिल्ह्यात ५३४ सिंकहोल असून, संपूर्ण बेसिनमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

या संकटामागे प्रामुख्याने तीन कारणे आहेत. कोन्या मैदान हे 'कार्स्ट' प्रकारच्या विद्रव्य खडकांपासून (कार्बोनेट आणि जिप्सम) बनलेले आहे. हे खडक पाण्यात सहज विरघळतात. गेल्या २० वर्षांत मका आणि बीट यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांसाठी हजारो वैध-अवैध विहिरींमधून उपसा करण्यात आला. १९७० पासून पाण्याची पातळी सुमारे ६० मीटरने खाली गेली आहे. जेव्हा भूजल कमी होते, तेव्हा जमिनीच्या पोकळीला आधार राहत नाही आणि वरचा थर अचानक कोसळतो. गेल्या १५ वर्षांत पाऊस कमी झाल्याने जलसाठे नैसर्गिकरीत्या रिचार्ज होऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली आहे.

कोन्या मैदान हे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो हेक्टर शेती सिंकहोलमुळे नष्ट होत आहे. धान्य उत्पादन घटल्यास तुर्कीला आयातीवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसानीसोबतच, शेतजमिनी सोडून शेतकऱ्यांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचा सामाजिक धोकाही निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर भूजल उपशावर तत्काळ नियंत्रण मिळवले नाही, तर शेजारील करामन आणि अक्सराय यांसारख्या प्रदेशांनाही याचा फटका बसेल. सध्या सरकार बेकायदेशीर विहिरींवर बंदी घालत असून एएफएडीद्वारे जोखीम मॅपिंगचे काम सुरू आहे.

कोन्यामधील हे संकट निसर्गाच्या अतिशोषणामुळे ओढवलेली एक 'मानवनिर्मित आपत्ती' आहे. शाश्वत जलव्यवस्थापन आणि पीक पद्धतीत बदल हाच या अन्नभांडाराला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.

- सुदेश दळवी