वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून सत्ताधारी-विरोधकांत दावे-प्रतिदावे

‘डबल इंजिन’च्या कामामुळेच टक्का वाढल्याचा भाजपचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st December, 11:31 pm
वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून सत्ताधारी-विरोधकांत दावे-प्रतिदावे

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत ७०.८१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. हे वाढलेले मतदान ‘डबल इंजिन’ सरकारच्या विकासकामांमुळे झाल्याचा दावा भाजपने केला, तर सरकारविरोधी असंतोषामुळेच लोक घराबाहेर पडल्याचे मत काँग्रेस व गोवा फॉरवर्डने व्यक्त केले. निकालापूर्वीच दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत.

विकासकामांमुळे मतदान वाढले : भाजप
राज्यात केंद्र व राज्य अशा डबल इंजिनचे सरकार सत्तेत आहे. रस्ते, पूल, मूलभूत सुविधा आणि पाणीपुरवठा यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. जनता सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्यामुळेच मतदानाचे प्रमाण वाढले. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतांवर भाजपचा विजय निश्चित असून, विकासकामांच्या जोरावर मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

सरकारविरोधात असंतोष : काँग्रेस
केंद्र आणि राज्य सरकारविरोधात गोव्यात असंतोष आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून अपघात आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोक सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फटका भाजप-मगो युतीला बसेल, असा दावा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

मतदार परिवर्तनाच्या बाजूने : गोवा फॉरवर्ड
जेव्हा मतदानाचे प्रमाण वाढते, तेव्हा ते सत्ताधारी सरकारच्या विरोधातच असते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही भाजप-मगो सरकारच्या विरोधात मतदान झाले असून मतदार परिवर्तनाच्या बाजूने आहेत. विरोधकांचे उमेदवार मजबूत ठरले असून हा असंतोष विजयात रूपांतरित होतो की नाही, हे सोमवारी स्पष्ट होईल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

‘आप’ला चांगला प्रतिसाद
भाजप सरकारविरोधातील नाराजी प्रचारादरम्यानच दिसून येत होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मतदानाचे प्रमाण वाढल्याने भाजपचा पराभव निश्चित आहे. वाढलेले मतदान विरोधी उमेदवारांच्या बाजूनेच निर्णायक ठरेल, असा दावा आपचे गोवा संघटक ॲड. अमित पालेकर यांनी केला.

#Goa #ZillaPanchayatElection #BJPGoa #CongressGoa #GoaForward #AAPGoa #ElectionAnalysis #DamuNaik #AmitPatkar #VijaySardesai