क्लब असल्याचे समजताच परवाना मागे : सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

म्हापसा : अग्निसुरक्षा परवानग्या झपाट्याने दिल्या जात असल्याने अग्निशमन दल सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. दरम्यान, कॅफे ‘सीओ-२’ ला दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) केवळ रेस्टॉरंटसाठी होते, नाईटक्लबसाठी नाही. ही बाब लक्षात येताच विभागाने ती परवानगी मागे घेतली, असा दावा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने केला.
एनओसी मागे घेण्याचे कारण
जागेची पाहणी केल्यानंतर ती रेस्टॉरंटसाठी निर्धारित अग्निसुरक्षा नियमांनुसार असल्याचे आढळले होते. आग प्रतिबंधक उपाययोजना आणि दिशादर्शक फलक व्यवस्थित असल्याने एनओसीचे नूतनीकरण केले, असे सहाय्यक विभागीय अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी सांगितले. मात्र, नंतर ती जागा नाईटक्लब म्हणून चालवली जात असल्याचे समजताच प्रमाणपत्र मागे घेण्यात आले. ती जागा क्लब म्हणून कार्यरत असल्याची माहिती आम्हाला नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायतीच्या परवान्याचा आधार
अग्निशमन परवानग्या स्थानिक पंचायतीने दिलेल्या व्यापार परवान्याच्या आधारावर जारी केल्या जातात. या प्रकरणात पंचायतीने त्या आस्थापनेचे वर्गीकरण ‘रेस्टॉरंट’ म्हणून केले होते. त्या वर्गीकरणाच्या आधारावर आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अग्निशमन दलाने परवानग्या जारी केल्या होत्या, असे फेर्राव म्हणाले.
जलद परवान्यांमुळे संताप
सरकारने नियुक्त केलेल्या संयुक्त अंमलबजावणी समितीने सील केलेल्या नाईटक्लबपैकी एक असलेल्या कॅफे ‘सीओ-२’ ने ४८ तासांच्या आत अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले. संचालनालयाने ज्या गतीने प्रमाणपत्रे जारी केली, त्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला असून अनिवार्य तपासणी आणि योग्य प्रक्रिया टाळल्या गेल्या का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.