४२ मतदारसंघांत महिला मतदार ठरवणार विजेता

पुरुषांपेक्षा २४ हजार अधिक मतदान : ५० पैकी ४२ मतदारसंघांत वर्चस्व

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st December, 11:34 pm
४२ मतदारसंघांत महिला मतदार  ठरवणार विजेता

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत यंदा ७०.८१ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक राहिले. एकूण मतदानात पुरुषांपेक्षा २४,१३९ महिलांनी अधिक हक्क बजावला असल्याने हा कौल कुणाच्या बाजूने जातो, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

महिलांचे मतदान निर्णायक
उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक होती. ५० पैकी ४२ मतदारसंघांत महिलांचे मतदान अधिक, तर केवळ ८ मतदारसंघांत पुरुषांचे मतदान जास्त झाले. आकडेवारीनुसार २,९५,७२० पुरुषांनी तर ३,१९,८५९ महिलांनी मतदान केले. महिलांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केल्याने निकाल धक्कादायक लागू शकतात.

पुरुषांचे अधिक मतदान असलेले मतदारसंघ
राज्यातील केवळ आठ मतदारसंघांत पुरुषांचे मतदान अधिक झाले. यामध्ये धारगळ, तोरसे, हणजूण, रेईश मागूश, कुर्टी, कवळे, बोरी आणि सांकवाळ यांचा समावेश आहे. उर्वरित सर्व मतदारसंघांत महिलांनी आघाडी घेतली आहे.

ख्रिस्ती पट्ट्यात निरुत्साह
ज्या मतदारसंघांत ख्रिस्ती मतदारांचे प्रमाण जास्त आहे, तिथे तुलनेने मतदान कमी झाले. हा समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. सासष्टीतील अनेक मतदारसंघांत ६० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. यात ताळगाव (५९.४४%), राय (५९.२३%), नुवे (६२.७२%), कोलवा (५९.९७%), वेळ्ळी (५६.५२%), बाणावली (५९.७०%), नावेली (५५.२९%) आणि कुठ्ठाळी (५६.९६%) यांचा समावेश आहे.

दिग्गजांच्या मतदारसंघात विक्रमी मतदान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यक्षेत्रातील पाळी मतदारसंघात ८६.५८ टक्के मतदान झाले. तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मतदारसंघातील नगरगाव (८६.७१%) आणि उसगाव-गांजे (८२.८४%) येथेही मोठे मतदान झाले. याशिवाय लांटबार्से (८८.२९%), हरमल (८०.४३%), होंडा (८५.५३%), केरी (८७.९९%), बेतकी (८१.३२%) आणि बार्से (८०.१९%) या मतदारसंघांतही उच्च मतदानाची नोंद झाली.

#Goa #ZillaPanchayatElection #WomenVoters #VotingAnalysis #GoaPolitics #Salcete #HighTurnout #GoaNews