१५ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त : आयआरबीच्या १८ तुकड्या

पणजी : राज्यात २० डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (२२ डिसेंबर) सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याने भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) १८ प्लाटूनसह सुमारे १,२०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
१५ ठिकाणी मतमोजणी व्यवस्था
राज्यात उत्तर गोव्यात सहा तर दक्षिण गोव्यात नऊ मिळून एकूण १५ ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
उत्तर गोवा : पेडणे (सावळवाडा मल्टीपर्पज क्रीडा मैदान), बार्देश (पेडे क्रीडा संकुल), तिसवाडी (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी), डिचोली (नारायण झाट्ये सभागृह, सर्वण), सत्तरी (कदंबा बस स्थानक हॉल, वाळपई).
दक्षिण गोवा : फोंडा (फर्मागुडी सरकारी आयटीआय), सासष्टी (माथानी साल्ढाणा संकुल, मडगाव), धारबांदोडा (सरकारी कार्यालय संकुल, तामसोडो), सांगे (सरकारी क्रीडा संकुल), केपे (सरकारी क्रीडा संकुल, बोरीमळ), काणकोण (सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, शेळेर) आणि मुरगाव (मुरगाव पोर्ट इंस्टिट्यूट, वास्को).
अधिकाऱ्यांची फौज तैनात
बंदोबस्तासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ९ उपअधीक्षक, २९ पोलीस निरीक्षक, ७४ उपनिरीक्षकांसह १,२०० कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय भारतीय राखीव दलाच्या महिला आणि पुरुष मिळून १८ पलटून तैनात करण्यात आल्या आहेत.
विशेष पथके आणि खबरदारी
वाहतूक पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (ATS), बॉम्ब निकामी पथक, जलद कृती दलाचे पोलीस (QRT) तसेच विशेष विभागाचे कर्मचारी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी राखीव ठेवले आहेत.