भाजपच्या ११ महिला विजयाच्या शिल्पकार; हळदोणेत काँग्रेसच्या मॅरी यांचा 'जादुई' विजय

पणजी : राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या महिला उमेदवारांचे प्रमाण ४० टक्के इतके राहिले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक महिला उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, महिलांसाठी राखीव नसलेल्या हळदोणा मतदारसंघातून काँग्रेसच्या मॅरी मिनेझीस यांनी विजय मिळवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
दक्षिण गोव्यातील विजयी महिला
या जिल्हा पंचायत निवडणुकीत १९ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष निकालात २० मतदारसंघांत महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी १० महिला उमेदवारांनी यश संपादन केले आहे. सर्वात जास्त ११ महिला उमेदवार भाजप-मगोच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत. ४ काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर, २ अपक्ष, तर २ आरजीपीच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत.
उत्तर गोव्यातील विजयी महिला
उत्तर गोव्यात मोरजी मतदारसंघातून तारा बाबूसो हडप (मगो) विजयी झाल्या. कळंगुटमधून फ्रान्झिलीया रॉड्रिग्ज, रेईश-मागूसमधून रेश्मा बांदोडकर, चिंबलमधून गौरी कामत आणि मये मतदारसंघातून कुंदा मांद्रेकर या भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत. हरमलमधून राधिका पालयेकर आणि कोलवाळमधून कविता कांदोळकर या अपक्ष निवडून आल्या. सांताक्रुझमधून एस्पेरान्सा ब्रागांझा आणि सेंट लॉरेन्स मतदारसंघातून तृप्ती बकाल या आरजीपीच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत. तर हळदोणा मतदारसंघातून काँग्रेसच्या मॅरी मिनेझीस निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हळदोणा मतदारसंघ महिलांसाठी राखीव नव्हता, तरीही मिनेझीस यांनी ५ पुरुष उमेदवारांना टक्कर देत विजय मिळवला.
दक्षिण गोव्यात भाजपने महिला उमेदवारांच्या बाबतीत वर्चस्व राखले आहे. उसगाव-गांजेमधून समीक्षा नाईक, बोरीमधून पूनम सामंत, शिरोडामधून गौरी शिरोडकर, रिवणमधून राजश्री गावकर आणि बार्से मतदारसंघातून अंजली वेळीप या भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत. वेलिंग-प्रियोळमध्ये अदिती गावडे (मगो) विजयी झाल्या. राय मतदारसंघातून इनासीना पिंटो (गोवा फॉरवर्ड) तर बाणावलीतून लुईजा रॉड्रिग्ज (काँग्रेस) विजयी झाल्या आहेत.
