सासष्टीत काँग्रेसची जोरदार मुसंडी

भाजपला अपयश, ‘आप’लाही धक्का : राय येथे गोवा फॉरवर्डने उघडले खाते

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31 mins ago
सासष्टीत काँग्रेसची जोरदार मुसंडी

मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीत सासष्टी तालुक्यातील मतदारसंघात गिर्दोली, दवर्ली, नावेली, नुवे, कुडतरी, वेळ्ळी आणि बाणावलीची जागा जिंकत काँग्रेसने  ‘धुरंधर’ असल्याचे दाखवले. गोवा फॉरवर्डने रायची जागा जिंकून राज्यात प्रथमच खाते खोलले. दवर्ली, गिर्दोली या जागा भाजपकडून गेल्या. तसेच आपची ‘एकला चलो रे’ची भूमिका मतदारांना आवडली नसल्याचे या निकालातून दिसून आले.
सासष्टीचा आतापर्यंतचा निकाला पाहता राय मतदारसंघातून गोवा फॉरवर्डच्या इनासिना पिंटो या १३४१ मताधिक्क्याने जिंकल्या. अपक्ष उमेदवार जोएना कुलासो यांनी २३५७ मते मिळवली. तर माजी सदस्य डोम्निक यांच्या पत्नी फातिमा या १६३६ मते मिळवून तिसर्‍या क्रमांकावर राहिल्या. हा गोवा फॉरवर्ड पक्षाचा राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीतील पहिला विजय ठरला.
नुवे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अँथनी सिडली ब्रागांझा यांनी ३४७१ मते मिळवून ४४० मताधिक्याने विजय मिळवला. माजी आमदार बाबाशान व सरपंच फ्रिडा यांनी पाठिंबा दिलेल्या आपचा उमेदवार लुईस बार्रेटो याला ३०२१ मते मिळाली. अपक्ष जॉन फर्नांडिस याला १३२८ तर आरजीचा उमेदवार सेबेस्तियाव सिल्वेरा याला १६७८ मते मिळाली. या विजयाने नुवे मतदारसंघातील काँग्रेसच्या अस्तित्वाला पुन्हा उभारी आलेली आहे.
दवर्ली मतदारसंघात काँग्रेस व भाजप यांच्यात अटीतटीची लढत झाली. काँग्रेसचे फ्लोरियानो फर्नांडिस यांनी ६०५० मते मिळवत ४६० मताधिक्याने विजय मिळवला. भाजपने पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती मात्र, त्यात केवळ एका मताचा फरक पडला व फ्लोरियानो यांना विजयी घोषित करण्यात आले. भाजपच्या सत्यविजय नाईक यांना ५५९० मते मिळाली. त्याशिवाय अपक्ष वल्लभ वरक यांना ९७३ व प्रदीप वेर्लेकर यांना ३२४ मते मिळाली. दवर्ली हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. पण आता काँग्रेसने हा मतदारसंघही मिळवला.
गिर्दोली मतदारसंघात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपमधून प्रवेश केलेल्या संजय वेळीप यांना उमेदवारी दिलेली होती. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली. संजय वेळीप यांनी २३०६ मताधिक्क्याने विजय मिळवला. भाजपचे उमेदवार गोकुळदास गावकर यांना ३७४८ मते मिळाली. अपक्ष महेश वेळीप यांना ३५८ तर आपचे उमेदवार जोसेफ पिक्सत यांना १२९१ इतकी मते मिळाली.
कुडतरी मतदारसंघात काँग्रेसच्या एस्ट्रा दा सिल्वा यांनी ५०९७ मते मिळवून २८०९ च्या मताधिक्क्यांनी विजय मिळवला. मरिनो रिबेलो यांनी कुडतरीत तिसर्‍यांदा ही जागा जिंकून आणली. अपक्ष विवेक नाईक यांनी २२८८ मते मिळवली तर आप चौथ्या क्रमांकावर राहिला.
नावेली मतदारसंघात एडविन उर्फ सिप्रू कार्दोज यांचा करिष्मा कायम राहिला. तीनवेळा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सिप्रू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार मालिफा कार्दोज यांनी ४५०३ मते मिळवून २०५१ मताधिक्क्याने विजय मिळवला. आप दुसर्‍या क्रमांकावर तर भाजप तिसर्‍या क्रमांकावर राहिले.
वेळ्ळीतही काँग्रेसने जागा कायम राखत उमेदवार ज्युलिओ फर्नांडिस यांनी ४०८३ मते मिळवून १६६६ मताधिक्क्याने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साविओ डिसिल्वा यांच्यासह गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांच्यासाठी प्रचारात सहभाग घेतला होता. आपच्या इसाका फर्नांडिस या २४१७ मते मिळवून दुसर्‍या तर चिंचणी सरपंच फ्रँक व्हिएगस तिसर्‍या क्रमांकावर राहिले.
कोलवा मतदारसंघात काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे पहावयास मिळाले. अपक्ष उमेदवार नेली रॉड्रिग्ज यांनी ३१४१ मते मिळवली. पण आपच्या आंतोनिओ फर्नांडिस यांनी ३२१४ मते मिळवत ७३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. काँग्रेसचा उमेदवार याठिकाणी तिसर्‍या क्रमांकावर राहिला.
बाणावली, वेळ्ळीत ‘आप’ला धक्का
बाणावली व वेळ्ळी मतदारसंघात आम आदमी पक्षाचे आमदार असतानाही दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. बाणावली मतदारसंघात काँग्रेस उमेदवार लुईझा रॉड्रिग्ज यांनी ५११९ मते मिळवून ६५० मतांनी विजय मिळवला. आपच्या माजी सदस्य असलेल्या जोसेफ पिमेंता यांना ४४६९ मते मिळाली. आपने मोठा गाजावाजा करत सासष्टीत उमेदवार उभे केले होते, पण केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला.
भाजपच्या हातातील जागाही गेल्या
भाजपने सासष्टीतील नऊ पैकी नावेली, गिर्दोली व दवर्ली अशा तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील दवर्ली व गिर्दोली या जागांवर भाजपची याआधी सत्ता होती. पण या दोन्ही जागांवर काँग्रेसने भाजपचा पराभव केला. दवर्लीतील उमेदवार सत्यविजय नाईक यांनी आपल्याच कार्यकर्त्यांनी दगा दिल्याने भाजपचा पराभव झाल्याचा आरोप केला.

राय
इनासिना पिंटो (गोवा फॉरवर्ड) ३६९८ (१३४१ मतांनी विजयी)

आंतोनितो फर्नांडिस (आरजी) ११२५
फातिमा गावकर (अपक्ष) १६३६
जेरोमिना कुलासो (आप) ८००
जोएना कुलासो (अपक्ष) २३५७
सारिका गावकर (अपक्ष) ३६३
एकूण मते : १००७५
अवैध मते : ९६
वैध मते : ९९७९

नुवे
अँथनी ब्रागांझा (काँग्रेस) ३४७१ (४४० मतांनी विजयी)

जॉन फर्नांडिस (अपक्ष) १३२८
लुईस बार्रेटो (आप) ३०३१
सेबेस्ताव सिल्वेरा (आरजी) १६७८
एकूण मते : ९६३५
अवैध मते : १२७
वैध मते : ९५०८

दवर्ली
फ्लोरिआनो फर्नांडिस (काँग्रेस) ६०५० (४६० मतांनी विजयी)

प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) ३२४
सत्यविजय नाईक (भाजप) ५५९०
वल्लभ वरक (अपक्ष) ९७३
एकूण मते : ७३१९
अवैध मते : १६४
वैध मते : ७१५५

गिर्दोली
संजय वेळीप (काँग्रेस) ६०५४ (२३०६ मतांनी विजयी)

गोकुळदास गावकर (भाजप) ३७४८
जोसेफ पिक्सतो (आप) १२९१
महेश वेळीप (अपक्ष) ३५८
एकूण मते : ११६५३
अवैध मते : २०२
वैध मते : ११४५१

कोलवा
आंतोनिओ फर्नांडिस (आप) ३२१४ (७३ मतांनी विजयी)

अँथनी रॉबर्ट (आरजी) ९१२
डोमिंगो फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस) ६८२
नेली रॉड्रीग्ज (अपक्ष) ३१४१
वेनिसिआ कार्व्हालो (काँग्रेस) २४७४
एकूण मते : १०५४५
अवैध मते : १२२
वैध मते : १०४२३

वेळ्ळी
ज्युलिओ फर्नांडिस (काँग्रेस) ४०८३ (१६६६ मतांनी विजयी)

क्रुझ पिंटो (अपक्ष) ४०३
डॅगली फर्नांडिस (आरजी) १२१३
फ्रँक व्हिएगस (अपक्ष) १५४७
इसाका फर्नांडिस (आप) २४१७
जॉन परेरा (अपक्ष) २३६
एकूण मते : ९९९६
अवैध मते : ९७
वैध मते : ९८९९

कुडतरी
एस्ट्रा दा सिल्वा (काँग्रेस) ५०९७ (२८०९ फरकाने विजयी)

एडीसन कार्दोज (अपक्ष) २२३१
जोसेफ कार्दोज (आप) १९६०
सतीश शेट (अपक्ष) २५९
विवेक नाईक (अपक्ष) २२८८
एकूण मते : ११९८५
अवैध मते : १५०
वैध मते : ११८३५

नावेली
मालिफा कार्दोज (काँग्रेस) ४५०३ (२०५१ मतांनी विजयी)

अग्नेला दिनीझ (राष्ट्रवादी काँग्रेस) ३५३
बिट्रीस फर्नांडिस (आप) २४५२
लक्ष्मी शेटकर (भाजप) १३००
एकूण मते : ८७०६
अवैध मते : ९८
वैध मते : ८६०८

बाणावली
लुईझा रॉड्रिग्ज (काँग्रेस) ५११९ (६५० मतांनी विजयी)

ग्रेफिन्स फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस) ३२४
जोसेफ पिमेंता (आप) ४४६९
मारिया रिबेलो (अपक्ष) २००१
एकूण मते : १२०५४
अवैध मते : १४१
वैध मते : ११९१३