
म्हापसा: 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबसाठी अबकारी (एक्साईज) परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट नाहरकत दाखला (NOC) वापरल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 'जीएस हॉस्पिटॅलिटी' या लुथरा बंधूंच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी यासंदर्भात रीतसर तक्रार दिली आहे.
असा उघड झाला प्रकार
बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर हणजूण पोलिसांकडून सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान, संशयितांनी क्लबच्या अबकारी परवान्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राची एनओसी सादर केली होती. पोलिसांनी या दाखल्याची पडताळणी आरोग्य केंद्रामार्फत केली असता, असा कोणताही दाखला केंद्राने कधीच जारी केला नसल्याचे समोर आले.
या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. नाझारेथ यांचा जबाब नोंदवला. संबंधित एनओसीवर डॉ. नाझारेथ यांची स्वाक्षरी आणि शिक्का होता. मात्र, आपण असा कोणताही दाखला दिलेला नाही आणि तो पूर्णतः बनावट असल्याचे डॉ. नाझारेथ यांनी स्पष्ट केले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
आरोग्य केंद्राच्या प्रमुखांची बनावट सही आणि शिक्क्याचा गैरवापर करून प्रशासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी लुथरा बंधूंच्या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.