२०२७ ची 'सेमीफायनल' भाजपने जिंकली; पण विजयाचे मताधिक्य घटल्याने धोक्याची घंटा!

पणजी: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, सत्ताधारी भाजप-मगोप युतीने दोन्ही जिल्हा पंचायतींवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. एकूण ५० जागांपैकी भाजप-मगो युतीने २९ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला १२ पेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानताना ‘गोवा सुशासन आणि प्रगत राजकारणासोबत उभा आहे’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या निकालाला ‘डबल इंजिन’ सरकारवरील विश्वासाची पावती म्हटले आहे.
मात्र, या विजयाचा सखोल अभ्यास केल्यास भाजपसाठी काही धोक्याच्या घंटाही वाजल्या आहेत. उत्तरेतील काही मोजके उमेदवार वगळता भाजपचे बहुतांश उमेदवार अगदी निसटत्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अनेक ठिकाणी भाजपला विरोधकांमधील विखुरलेल्या मतांचा मोठा फायदा मिळाला. निवडणूक रिंगणात अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार असल्याने मतविभाजन झाले, ज्याचा थेट लाभ भाजपच्या पदरात पडला. विशेष म्हणजे, काही मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघांतील भाजप पुरस्कृत उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ग्रामीण भागात सुप्त लाट असल्याचे यातून दिसून येत आहे.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीची ही 'सेमीफायनल' मानली जात होती. २०२० च्या निवडणुकीत भाजपने जे अभूतपूर्व यश मिळवले होते, त्या तुलनेत यावेळी भाजपला विजयासाठी मोठी कसरत करावी लागली. दक्षिण गोव्यात काँग्रेसने आपली स्थिती सुधारल्याचे चित्र असून नुवे, दवर्ली, गिरदोली, कुडतरी आणि नावेली या ख्रिस्ती बहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. विरोधक जर आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र आले, तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असा संदेश या निकालातून मिळत आहे.