
पणजी : गोव्यातील (Goa) थंडीचा कडाका वाढत आहे. मंगळवारी पणजीत (Panjim) किमान १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील किमान तापमान १८.८ अंश सेल्सिअस राहीले. राज्यात २९ डिसेंबर पर्यंत राज्यातील किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे पुढील आठवडाभर थंडीचा मुक्काम कायम असणार आहे.
हवामान खात्याने (Metrological Department) राज्यात पुढील सहा दिवस पहाटे मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात रात्री आणि पहाटे तीव्र थंडीची तीव्रता जाणवत आहे. ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी पणजीत ३२.७ अंश तर मुरगावमध्ये ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याआधी २१ डिसेंबर रोजी पणजीत २०२५ मधील निचांकी म्हणजेच १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर १२ डिसेंबर २०२५ रोजी पणजीतील किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंड येथील काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे.