
पेडणे : गावडेवाडा कोरगाव येथील आयआरबी पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर वसंत गावडे (वय ४२) याने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धेश्वर गावडे गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. या काळात तो नियमितपणे कामावर जात नसे. तसेच वेळेवर औषधोपचारही टाळत होता. दि. २२ रोजी रात्री बारा वाजल्यानंतर तो घरी आला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. मात्र, तो झोपत नसल्याचे लक्षात आल्यावर वडिलांनी त्याला विचारणा केली असता, त्याने सोफ्यावर झोपणार असल्याचे सांगितले.
पहाटे सुमारे चार वाजता सिद्धेश्वर याने वडिलांकडे वरच्या मजल्यावरील खोलीची चावी मागितली. वडिलांनी चावी दिल्यानंतर तो वरच्या मजल्यावरील खोलीत गेला व आतून कडी लावली. वडिलांना वाटले की तो झोपलेला असेल. मात्र, सकाळी अकरा वाजता अनेकदा हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सिद्धेश्वर याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी आरडाओरड करत त्यांना तातडीने तुये रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
उल्लेखनीय म्हणजे, मागील महिन्यातही सिद्धेश्वर गावडे याने मानसिक तणावामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी पेडणे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.