बर्च क्लबची बनावट आरोग्य एनओसी प्रकरण

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लबसाठी अबकारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वापरल्याप्रकरणी रोमिओ लेन वजा जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीचे सहमालक अजय गुप्ता यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली. म्हापसा न्यायालयाने हस्तांतरणाला मंजुरी दिल्यानंतर पोलिसांनी गुप्ताला ताब्यात घेत अटक केली.
सोमवार, २२ रोजी म्हापसा पोलिसांनी अजय गुप्ता याच्या अटकेसाठी हस्तांतरण रिमांड अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अर्जाला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने २३ रोजी सकाळी मंजुरी दिली व कोलवाळ कारागृह अधिकाऱ्यांना संशयिताला म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लगेच पोलिसांनी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करत संशयिताला ताब्यात घेतले. नंतर बनावटगिरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. सोमवारीच अजय गुप्ता याची न्यायालयाने ११ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
दरम्यान, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी या बनावटगिरी बाबतीत दि. १७ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १३ डिसेंबर पूर्वी अबकारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला आहे.
साकवाडी हडफडे येथील सर्व्हे क्र. १५९/० मधील घर क्रमांक ५०२/१ मध्ये चालणाऱ्या कंपनीच्या आस्थापनासाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी समान हेतूने जाणूनबुजून आणि अप्रमाणिकपणे कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार केले. संशयितांनी फिर्यादींची नक्कल करून बनावट सही केली व रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर केला. नंतर हा बनावट दाखला खरा असल्याचे भासवून उत्पादन शुल्क खात्याकडे अर्ज सादर केला. यात संशयित आरोपी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यात यशस्वी झाला. यामुळे फिर्यादी तसेच अबकारी अधिकाऱ्यांची फसवणूक झाली.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी व त्याच्या कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर करीत आहेत.
यानंतर आरोग्य केंद्राधिकारी डॉ. नाझारेथ यांची पोलिसांनी चौकशी केली. कारण सदर एनओसीवर त्यांची सही, शेरा होता. डॉ. नाझारेथ यांनी आपण एनओसी जारी केली नाही, असे स्पष्ट केले. नंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार डॉ. नाझारेथ यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
कांदोळी आरोग्य केंद्राची बनावट ‘एनओसी’
बर्च दुर्घटनेनंतर हणजूण पोलिसांकडून सौरभ लुथरा, गौरव लुथरा, अजय गुप्ता यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवेळी संशयितांनी क्लबसाठी अबकारी परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राची एनओसी सादर केली होती. या नाहरकत दाखल्याची पोलिसांनी आरोग्य केंद्रामार्फत पडताळणी केली. क्लबला अशी एनओसी केंद्राने कधीच दिली नसल्याचे यावेळी आढळून आले.