बालेकिल्ले राखण्यात अपयश : बाणावली, वेळ्ळीत पराभव

पणजी : 'एकला चलो रे'च्या भूमिकेमुळे आम आदमी पक्षाला (aap) यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. 'आप'ला आपले बालेकिल्ले राखण्यात अपयश आले असून, ८६ टक्के मतदारसंघांमध्ये 'आप'च्या मतांची आकडेवारी चार अंकी आकड्यावरून थेट तीन अंकी आकड्यांवर आली आहे.
'आप'चा प्रथमच इतका मोठा पराभव झाला आहे. पक्षाला आपले बालेकिल्ले समजले जाणारे बाणावली आणि वेळ्ळी हे मतदारसंघ राखण्यात अपयश आले. 'आप'चा बालेकिल्ला असलेल्या कोलवा मतदारसंघात त्यांचे उमेदवार आंतोनियो फर्नांडिस हे केवळ ७३ मतांच्या फरकाने निवडून आले. मात्र, वेळ्ळी आणि बाणावली यांसारख्या इतर बालेकिल्ल्यांमध्ये त्यांचा दारूण पराभव झाला.
निवडणुकीतील आकडेवारी
- एकूण ५० मतदारसंघांपैकी केवळ सात मतदारसंघांत 'आप'ला १,००० पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
- उर्वरित मतदारसंघांत पक्षाला १,००० पेक्षा कमी मते मिळाली, तर दोन मतदारसंघांत हा आकडा १०० च्या खाली गेला आहे.
- केवळ चार मतदारसंघांत आप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यामध्ये दक्षिण गोव्यातील वेळ्ळी (२४१७ मते), बाणावली (४४६९ मते), गिर्दोली (१२९१ मते), नावेली (२४५२ मते) आणि सांताक्रुझ पंचायतीमध्ये (२८४३ मते) 'आप'चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आले.
'आप'च्या मतांच्या टक्केवारीत घट
'आप'च्या एकूण मतांमध्ये ३० हजारांहून अधिक मतांची घट नोंदवण्यात आली असून, मतांची टक्केवारी ६.८० टक्क्यांवरून ५.३५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपला ६४,३५४ मते मिळाली होती, मात्र या निवडणुकीत ती निम्म्याने घटून केवळ ३२,९९५ इतकीच राहिली.
गोव्यात युतीबाबत हालचाली सुरू असताना 'आप'ने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षावर आरोप करण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षच 'आप'च्या निशाण्यावर होता. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल गोव्यात आले होते, तेव्हा त्यांनीही काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. काँग्रेसने हीच संधी साधून, 'आप' केवळ विरोधकांना लक्ष्य करत सुटला आहे, असे वातावरण तयार केले. यामुळे लोकांच्या मनात 'आप'विषयी संभ्रम निर्माण झाला आणि मतदारांनी या निवडणुकीत या पक्षाला त्याची जागा दाखवून दिली.