
टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेला आता अवघे ५० दिवस उरले आहेत. भारत हा या स्पर्धेचा यजमान आणि गतविजेता असल्यामुळे अपेक्षा अधिक आहेत. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून अक्षर पटेलची उपकर्णधारपदी नियुक्ती हा सर्वात मोठा आश्चर्याचा निर्णय मानला जात आहे. मात्र, संघाची घोषणा झाली असली तरी विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडियाला काही गंभीर आव्हानांवर मात करावी लागणार आहे.
२०२५ या वर्षात सूर्यकुमारने १९ डावांमध्ये केवळ २१८ धावा केल्या आहेत. विश्वचषकापूर्वी खेळलेल्या २० सामन्यांमध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकलेला नाही, ही बाब भारतीय संघासाठी चिंतेची आहे.
अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून निवड हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. २०२५ मध्ये त्याने आतापर्यंत १९ टी-२० सामने खेळत १८३ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट फक्त ११८.८३ आहे, जो टी-२० क्रिकेटच्या दृष्टीने कमी मानला जातो. गोलंदाजीतही २०२४ मध्ये त्याने २० विकेट्स घेतल्या होत्या, तर २०२५ मध्ये केवळ १७ विकेट्स मिळवू शकला. मात्र, त्याचा इकॉनॉमी रेट ६.९३ आहे.
टीम इंडियासमोरील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे योग्य गोलंदाजी संयोजन ठरवणे. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या तज्ज्ञ गोलंदाजांना एकत्र खेळवणे कठीण ठरू शकते. सलामीची जोडी अजूनही निश्चित झालेली नाही. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे की, सलामीला यष्टिरक्षक फलंदाज असणे संघासाठी फायदेशीर ठरते. संघात दोन प्रमुख पर्याय आहेत संजू सॅमसन आणि इशान किशन. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या टी-२० सामन्यात झटपट ३७ धावांची खेळी करत आपला फॉर्म दाखवला आहे. तर दुसरीकडे, इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हरियाणाविरुद्ध १०१ धावांची तुफानी खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. अभिषेक शर्मा सोबत सलामीला एकाच यष्टिरक्षकाला संधी मिळेल, त्यामुळे अंतिम ११ ठरवताना मोठा पेच निर्माण होणार आहे. विरोधी संघानुसार सलामीची जोडी बदलली जाऊ शकते, असे संकेत सूर्यकुमारनेही दिले आहेत.
रिंकू सिंगचा मागील एक वर्षातील प्रवास अत्यंत दुर्दैवी राहिला आहे. तो सतत संघात येतो आणि बाहेरही जातो. आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने एकाच चेंडूवर विजयी चौकार मारत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर मात्र त्याला नियमित संधी मिळालेली नाही. आता तो पुन्हा विश्वचषक संघात आहे, पण अंतिम ११ मध्ये स्थान मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.
- प्रवीण साठे