निकालाची प्रतीक्षा करताना...

काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्यावरून नाराजी होती, तर सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिल्याने भाजपचा पाया भक्कम होईल असे त्या पक्षाला वाटते आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते स्थानिक आमदाराच्या कार्याचे मूल्यमापन मतदानात केलेले दिसेल.

Story: संपादकीय |
21st December, 11:33 pm
निकालाची प्रतीक्षा करताना...

गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून येते. ७०.८ टक्क्यांपर्यंत मतदान नोंदले गेले आहे, जे गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक आहे. हे ग्रामीण स्तरावर लोकांचा सहभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वाढती उत्सुकता दर्शवते. हा उच्च मतदान दर सूचक आहे की मतदारांनी केवळ स्थानिक समस्यांना जनहिताचा मुद्दा मानले नाही, तर आगामी २०२७ विधानसभा निवडणुकाचा अंदाज घेण्याची संधी म्हणून हे मतदान झाले असावे. अर्थात मतदारांचा तो हेतू नसला तरी राजकीय पक्ष तसे मानत असतील. सर्व वयोगटांत आणि सामाजिक गटांतून मतदान वाढल्यामुळे निकाल अधिक प्रातिनिधिक स्वरुपात झाले असे म्हणता येईल. महिलांच्या मतांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा २५ हजारांनी अधिक असल्याने महिला केवळ घरापुरताच विचार न करता राज्याचा विचारही व्यापकपणे करतात आणि घरातील महिलांसोबत पुरुषांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे यावेळी प्रामुख्याने दिसून आले.

गोव्यातील या निवडणुकांमध्ये राजकीय खेळ अथवा डावपेच किंवा रणनीती असल्याचे मागेच स्पष्ट झाले होते. भाजपने मगो पक्षाशी युती करण्याचा निर्णय कायम ठेवून त्यानुसार जागावाटप केले. मात्र विरोधकांच्या पातळीवर सर्वच बिगरभाजप पक्ष एकत्र आले नाहीत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष एकत्र येऊन लढले तर आम आदमी पक्ष व आरजी आणि काही अपक्ष उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरले. या अपक्षांचाही निकालावर प्रभाव पडणार आहे. एकंदरित ५० जागांची ही लढत रंगतदार ठरली आहे.

भाजप-मगो युतीचा ग्रामीण भागात अजूनही मजबूत पाया आहे, विशेषतः उत्तर गोवा आणि पारंपरिक भाजप मतदारसंघांत हे निकालात उघड होईल. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती विविध महिला आणि ओबीसी, एससी व एसटी राखीव जागांवर चांगली स्पर्धा करते आहे, त्यामुळे एखाद्या पक्षाला सर्व जागा सहज जिंकणे कठीण होणार आहे. आपनेही उत्साहजनक प्रवेश केला आहे; त्यांच्या प्रचारात त्यांनी महागाई, पाणी, रस्ते आदी प्रश्नांना विशेष स्थान दिले. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी स्थानिक नेतृत्वावर आधारित ताकद दाखवली आहे, त्यामुळे निकालातील समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची दिसतात. काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्यावरून नाराजी होती, तर सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिल्याने भाजपचा पाया भक्कम होईल असे त्या पक्षाला वाटते आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते स्थानिक आमदाराच्या कार्याचे मूल्यमापन मतदानात केलेले दिसेल.

 एकंदरीत वातावरण पाहता, भाजप-मगो युती बहुतेक जागांवर वर्चस्व दाखवू शकते. परंतु पूर्ण बहुमत मिळेलच असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचा विचार करता, ही  युती काही जागा जिंकण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये त्यांच्या पारंपरिक समर्थकांची भूमिका महत्त्वाची असेल. आप आणि आरजी त्याचप्रमाणे अपक्ष याचा विचार करता आपने अपेक्षेपेक्षा मजबूत उमेदवार दिल्याने काही जागांवर चुरशीची लढत निर्माण झाली आहे. याच कारणास्तव आरजी आणि अपक्ष उमेदवार स्थानिक पातळीवर वजनशीर असल्याने विजय मिळवू शकतात. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की ही जिल्हा पंचायत निवडणूक २०२७ विधानसभा निवडणुकीची सेमी-फायनलच आहे. म्हणजे ही निवडणूक पुढील विधानसभेतील राजकीय स्थिती दर्शविणारे चित्र म्हणता येईल आणि त्यानुसार पक्षांच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडेल. जे उमेदवार जिंकतील त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागण्याची संधी प्राप्त होऊ शकते. ज्यांना अपयश येईल त्यांच्या पक्षांना पुढील रणनीती बदलावी लागू शकते. 

एकंदरीत मतदानानंतरचे वातावरण पाहता, अधिक मतदानाने ग्रामीण भागांतील राजकीय सक्रियता स्पष्ट झाली आहे. भाजप-मगो युती जास्त बलवान ठरण्याची शक्यता असली तरी पूर्ण बहुमत मिळेलच याची खात्री नाही. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती टक्कर देत असल्याचे दिसेल. आप आणि अपक्ष उमेदवार काही जागा जिंकून मुख्य पक्षांसाठी किंगमेकर भूमिका बजावू शकतात, असे चित्र निर्माण झाले असले तरी प्रत्यक्षात निकाल काय लागतात, यावरच जसे राजकीय पक्षांची पुढील वाटचाल ठरेल, तशी जिल्हा पंचायतींची दिशाही स्पष्ट होईल.