२०२७ पूर्वीचे सौम्य हादरे !

ही निवडणूक फक्त भाजपला भविष्यातील नुकसानीचा इशारा आणि संकेत देणारी ठरलेली नाही, तर विरोधी पक्षांनाही त्यांच्या चुका दाखवणारी ठरली आहे. अनेक ठिकाणी आरजीपी, काँग्रेस, गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली. ते एकत्र राहिले असते तर भाजपला नक्कीच ही निवडणूक जड गेली असती.

Story: संपादकीय |
3 hours ago
२०२७ पूर्वीचे सौम्य हादरे !

गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहे. त्यापूर्वी या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय पक्षांनी त्या प्रतिष्ठेच्या केल्या. भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावून जिल्हा पंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न जरी यशस्वी झाल्याचे दिसत असले, तरी या निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण केले तर यातून जिल्हा पंचायतीसाठी असलेला मतदार भाजपबाबत तेवढा समाधानी नाही असेच दिसून येते. भाजपचे गोव्यातील नेतृत्व दामू नाईक करत आहेत. यापूर्वीच्या काही निवडणुका सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तानावडे यांनी संयुक्तपणे अनेक निवडणुका जिंकून दिल्या. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका, महापालिका, विधानसभा अशा निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व ठेवले. यावेळची निवडणूक दामू नाईक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत भाजप तांत्रिकदृष्ट्या जिंकला असला, तरी भाजपला बहुतेक मतदारसंघांमध्ये भूकंपाचे धक्के बसावेत तसे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार धक्के बसलेले आहेत. भाजप हे हादरे दाखवून देत नसले तरी ते सिस्मोग्राफवर स्पष्ट जाणवावे तसे बसलेले आहेत. २०२७ मध्ये काय होऊ शकते, ते या निवडणुकांच्या निकालातून दिसून आले आहे. सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील काही मतदारसंघ वगळले तर पेडणे, बार्देश, तिसवाडी, फोंडा, सासष्टी, मुरगाव, काणकोण मतदारसंघांत भाजपला इतर पक्षांच्या उमेदवारांनी धक्केही दिले आणि भविष्याची चाहूलही दिली. मुख्यमंत्र्यांनी दिवसरात्र एक करून भाजपला सत्ता देण्यासाठी प्रयत्न चालवले असले, तरी यावेळीही यशाचे श्रेय त्यांच्या एकट्याकडेच जाते. विश्वजीत आणि देविया राणे यांनी आपल्या ताब्यातील जिल्हा पंचायतींच्या चारही मतदारसंघांत आपले वर्चस्व बहुमतांनी सिद्ध केले. डॉ. प्रमोद सावंत यांच्या तालुक्यातील सर्व जागाही भाजपला मिळाल्या. या तीन नेत्यांना वगळता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही मंत्री, आमदारांचा या यशात किती वाटा, असा प्रश्न येतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सासष्टीतील आहेत, तसेच तिथे एक मंत्री आणि महामंडळावर नियुक्त असलेले एक अपक्ष आमदारही आहेत. अन्य दोन भाजप आमदारही तिथे आहेत. असे असतानाही तिथे भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसने तिथे आपला गड राखला. आपनेही एक जागा मिळवून आपली लाज राखली. सांकवाळमध्ये अपक्ष आमदाराने आपली जागा शाबूत ठेवली. काणकोणात भाजपचा मंत्री असतानाही एक जागा काँग्रेसला गेली. फोंड्यात सरकारमधील तीन मंत्री असतानाही एक अपक्ष निवडून येतो. तिसवाडीत भाजपकडे चार आमदार असतानाही आरजीपीने दोन जागा जिंकल्या. केपेतील जागा ही काही मतांच्या फरकाने भाजपने घेतली. रिवणमध्ये अवघ्या काही मतांच्या फरकाने गोवा फॉरवर्डचा उमेदवार पराभूत झाला. कोलवाळ मतदारसंघात किरण कांदोळकर यांच्या पत्नी अपक्ष म्हणून विजयी ठरल्या. हरमलमध्ये राधिका पालयेकर या अपक्ष उमेदवार विजयी ठरल्या. कळंगुटमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय काठावरचाच म्हणावा लागेल. एकंदरीत चित्र पाहिले तर भाजपला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला. भाजपच्या विरोधात वातावरण आहे हे या निवडणुकीने सिद्ध केले. भलेही विरोधकांच्या हाती फार जागा लागल्या नसतील, पण भाजपला या निकालावर समाधानही मानता येणार नाही असे निकाल आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता घेणे कठीण झाले. बहुमतही मोठे नाही. दक्षिण गोव्यात भाजपला काठावरचे बहुमत आहे. उत्तर गोव्यात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजीपी यांची युती झाली असती तर अनेक मतदारसंघांत वेगळे चित्र दिसले असते. यावरून डिचोली, सत्तरी वगळता भाजपला तसे पोषक वातावरण इतर तालुक्यांमध्ये राहिलेले नाही. विरोधी पक्षांची युती झाली असती तर भाजपकडे काँग्रेसमधून आयात केलेल्या आमदारांचा मूळ मतदार कदाचित युतीच्या उमेदवारांकडे वळला असता. उत्तर गोव्यात काँग्रेसचा एकच आमदार आहे. असे असले तरीही उत्तरेत जिल्हा पंचायतीत काँग्रेसच्या हाती दोन मतदारसंघ लागले आहेत.

ही निवडणूक फक्त भाजपला भविष्यातील नुकसानीचा इशारा आणि संकेत देणारी ठरलेली नाही, तर विरोधी पक्षांनाही त्यांच्या चुका दाखवणारी ठरली आहे. अनेक ठिकाणी आरजीपी, काँग्रेस, गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली. ते एकत्र राहिले असते तर भाजपला नक्कीच ही निवडणूक जड गेली असती. विरोधकांनी शेवटच्या क्षणाला युती तोडून आपलेच नुकसान करून घेतले आहे. भाजपला पुन्हा जिल्हा पंचायतींवर सत्ता मिळाली आहे, पण गोव्यातील जिल्हा पंचायतींना किमान यावेळी तरी चांगले अधिकार मिळतील अशी अपेक्षा ठेवूया.