गोव्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असा जो पुन्हा पुन्हा आरोप होत आहे, त्याकडे पोलीस आणि शासनानेही दुर्लक्ष केले आहे असेच म्हणावे लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांना खुलेआम मारहाण करणारे असोत किंवा वकिलांवर हल्ले करणारे असोत, पर्यटकांना मारहाण करणारे असोत किंवा त्यांचे खून करणारे असोत कोणीच पोलिसांना घाबरत नाही. पोलिसांची भीती नाहीशी झाल्यामुळेच खुलेआम मारामारी, हल्ले होत आहेत. हे सुरू असतानाच आता गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. शुक्रवारी रात्री एका कॅसिनोचे संचालक असलेले श्रीनिवास नायक यांच्यावर झालेला हल्ला हा राज्यातील पोलिसांची भीती नसल्याचे दाखवून देतो. दोन शूटर मोटारसायकलने आले, त्यांनी नायक यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला आणि कुठल्या तरी वाहनाने ते पसार झाले. तीन दिवसांनंतरही ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत. गोवा हे जमीन व्यवहार आणि जुगाराचे केंद्र झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना गोव्यात वारंवार होत आहेत. ईडी, प्राप्तिकर खात्याकडून वारंवार गोव्यात छापे पडत आहेत. कॅसिनो आणि जमीन व्यवहारात गुंतलेल्या अनेकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. हजारो कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातूनच आता एकमेकांवर सुपारी देऊन हल्ले करण्यापर्यंत या व्यवहारांत वैर तयार झाले आहे. रस्त्यांवर वाहन आदळले तरीही एकमेकांच्या अंगावर धावून जातात. बार, पबमध्ये धक्का लागला तर जीव जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करतात. गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये वारंवार भडके उडतात. तुरुंगात टाकले तर तिथेही गुन्हे घडतात. पोलिसांचा धाकच राहिलेला नाही, हेच या साऱ्या घटनांमधून दिसून येते. सरकारने पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले तरच गोव्यातील गुंडगिरी संपुष्टात येण्याची एक आशा आहे. सरकार जोपर्यंत पोलिसांना कारवाईसाठी स्वातंत्र्य देत नाही, तोपर्यंत गोव्यात गुंडांचे राज्य सुरू राहील. आतापर्यंत फक्त गोळीबार झाला आहे. यापुढे त्याही पुढच्या घटना घडतील. कारण जमीन व्यवहार आणि कॅसिनोंमुळे गोव्यात अनेक जणांमध्ये व्यावसायिक वैर तयार झाले आहे. त्याचा विस्फोट झाला, तर मोठ्या दुर्घटना घडू शकतात. जमीन व्यवहार काही काळ स्थगित ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला तसेच कॅसिनोंना नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा उभी केली, तर काही प्रमाणात गैरप्रकारांवर नियंत्रण येऊ शकते. आता फक्त गोळीबारच झाला आहे, भविष्यात सरकारने या व्यवसायांकडे अशाच प्रकारे दुर्लक्ष केले, तर एकमेकांचा जीवही घेण्यापर्यंत घटना घडू
शकतात.
गोवा पोलिसांचे संख्याबळ प्रथमच नऊ हजारांच्या आसपास पोहोचले आहे. प्रथमच सुमारे २७ अधीक्षक नियुक्त केलेले आहेत. असे असतानाही गुन्हे मात्र कमी होत नाहीत. टोळीयुद्ध, हल्ले, मारामारी, चोऱ्या, दरोडे हे सारे प्रकार गोव्यात वाढत चालले आहेत. फक्त पोलिसांची संख्या वाढवून काही होणार नाही. पोलिसांना सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी सक्षम करतानाच गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर योग्य कारवाई करण्याची मुभा द्यायला हवी. पोलिसांची भीती राहिली तरच काही प्रमाणात गोव्यातील गुन्हे नियंत्रणात येऊ शकतात. कोणाचे 'एन्काउंटर करा' असे अपेक्षित नाही; पण जे गुन्हे करताहेत, खुलेआम हल्ले करताहेत त्या लोकांना पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे. 'गोव्यातील पोलिसांच्या हाती लागलो तर आपली खैर नाही' हे गुन्हेगारांना कळेल तेव्हाच गुन्हा करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील. कॅसिनोच्या संचालकावर झालेला हल्ला हा गोव्यातील मालमत्ता व्यवहारातून असू शकतो किंवा काही वैयक्तिक कारणही त्यामागे असू शकेल. पण ते हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत, याचाच अर्थ पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही कमकुवत झाली आहे, हे पोलिसांनी मान्य करायला हवे. दरोडेखोर वारंवार हुल देऊन पळतात, आता हल्लेखोरही सापडत नाहीत. पोलीस अधिकारी फक्त बढत्याच घेण्यात धन्यता मानत आहेत, त्यांची कामगिरी खरोखरच त्यांना बढती देण्यालायक आहे का, ते कोणीच पाहत नाही. सत्तेतील लोकांना धरून बढत्या, पुरस्कार घेण्यापेक्षा लोकांना भीतीमुक्त करण्यावर पोलिसांनी भर द्यायला हवा. रोज होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे गोव्याच्या पोलीस दलाची बदनामी होत आहे, याची जाणीव पोलिसांनी ठेवायला हवी.


