उत्तम पार्सेकरांच्या एन्ट्रीने राजकारण रंगणार !

पेडणे सेवा ट्रस्टचा पेडणे येथे झालेला सोहळा इतर इव्हेंट्सपेक्षा निश्चितच सरस होता. गोव्यातील या नव्या शिस्तीमुळे आणि उत्तम पार्सेकर यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पेडणेतील राजकारण बरेच रंगतदार होणार हे नक्की!

Story: विचारचक्र |
27th August, 10:57 pm
उत्तम पार्सेकरांच्या एन्ट्रीने राजकारण रंगणार !

येत्या फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत पेडणेचा किल्ला सर करण्याची जय्यत तयारी करून गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त प्रिंसिपल चिफ इंजिनियर उत्तम  पार्सेकर रणांगणात उतरले आहेत. ते २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविणार, अशी चर्चा आल्तिनोवर गेली तीन वर्षे म्हणजे ते अधिकृतरीत्या निवृत्त झाले तेव्हापासून ऐकू येत होती. गेल्या तीन वर्षात सरकारने त्यांना तीनदा सेवेत मुदतवाढ दिली. चौथ्यांदा फाइल तयार करण्याची सूचना वरून आली तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार दिला, असे सांगण्यात आले. त्यानंतर गेले सहा महिने आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांसह त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.

राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित जातीसाठी ‌१५ टक्के जागा राखीव आहेत. उत्तरेकडील अनेक राज्यांत अनुसूचित जातींची लोकसंख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गोव्यातही तसेच असावे असे गृहीत धरून 'जीएमसी'त जागा राखीव ठेवल्या होत्या. त्या काळात शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नव्हता, त्यामुळे राखीव जागा भरण्यासाठी एससी उमेदवारच मिळत नव्हते. ही गोष्ट सरकारच्या लक्षात येताच दोन टक्के लोकसंख्या असल्याने दोन टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. यावेळी गोव्यातील दलित समाज संघटित झाला आणि विधानसभेत राखीव जागा पुढे आली. गोव्यातील एससी लोकसंख्येची १९७१ ची जनगणना विचारात घेऊन  मतदारसंघवार निरीक्षण केले असता पेडणे मतदारसंघात एससी लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले.

पेडणे मतदारसंघ एससीसाठी राखीव होणार अशी चर्चा चालू झाल्यावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या इतर नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या मतदारसंघात एससी सर्वात जास्त तोच राखीव होणार, ही गोष्ट स्पष्ट झाल्याने लोकांनी आपली तलवार म्यान केली. निवडणूक आयोगाने अधिसूचना काढल्यानंतर १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत मगो उमेदवार निवडून आले. त्यांनी तब्बल तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मडगावचे मातब्बर नेते बाबू आजगावकर यांनीही अशीच हॅटट्रिक केली आणि आता चौथ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी देऊन बाबूंना मडगावात दिगंबर कामत यांच्याविरुद्ध बळीचा बकरा बनविला होता. मात्र पेडणे मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीच्या आधारावर गेली चार वर्षे बाबू जोरदार मुसंडी मारत आहेत.

भाजपने केलेल्या नियमित सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या विरोधात असल्याचे 'लीक' झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार समजते. आर्लेकर यांना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचे जोरदार समर्थन प्राप्त आहे. त्याच्या जोरावर आपले तिकीट कोणीच कापू शकत नाही, अशा प्रचंड आत्मविश्वासात प्रवीण आर्लेकर वावरत आहेत. विद्यमान आमदाराला सहजासहजी तिकीट नाकारले जात नाही. पण भाजप आपल्या गोपनीय अहवालाला खूपच महत्त्व देतो, असा आजवरचा अनुभव आहे. राजेंद्र आर्लेकर व बाबू आजगावकर या दोघा बड्या नेत्यांची उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत.

पेडणे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, असा गोड गैरसमज सगळ्यांनीच करून घेतला आहे. त्यामुळेच भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी भाऊगर्दी उडाली आहे. विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर इच्छुक असूनही बाबू आजगावकर, डॉ. संजय कोरगावकर, डॉ. कुडाळकर, इंजिनीयर तांबोसकर आणि  बांधकाम खात्याचे माजी प्रिन्सिपल चिफ इंजिनियर उत्तम पार्सेकर अशी अर्धा डझन नामवंत मंडळी बाशिंग बांधून उभी आहे. त्याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर वेगळ्याच घडामोडी घडू शकतील. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आगामी निवडणूक मगो पक्षातर्फे लढवणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. माजी आमदार दयानंद सोपटे यांनी पार्सेकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. पार्सेकर सरांना भाजपची उमेदवारी‌ दिली, तर जीत यांचे काय होणार? गेली साडेचार वर्षे भाजपचे आमदार म्हणूनच ‌तन ‌व मनाने  वावरणाऱ्या जीत यांना भाजप अधांतरी सोडेल, असे मला तरी वाटत नाही. अर्थात आजचे राजकारण एवढे बिनभरवशाचे झाले आहे की कधी काय घडेल, याचा अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे. मगो-भाजप युती कायम ठेवायची असेल आणि जीत आरोलकर यांना भाजपने  मांद्रेची उमेदवारी दिली, तर पेडणेची जागा मगोला द्या, असा आग्रह मगो नक्कीच धरेल. तसे घडले तर विद्यमान आमदारांचे काय होईल? ते मूळ मगो पक्षाचे असल्याने दीपक ढवळीकर त्यांना माफ करून तिकीट देतील काय, हे पाहावे लागेल. मगोने धुडकावले तर आर्लेकर बंड करणार नाहीत हे उघड आहे.

गेली १३ वर्षे  गोव्याचे प्रिन्सिपल चिफ इंजिनियर राहिलेले उत्तम पार्सेकर यांचे गोव्यातील सर्व आमदारांशी चांगले संबंध आहेत.  भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या सगळ्या जमेच्या गोष्टी विचारात घेतल्यास विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांना डावलून नव्या व्यक्तीला संधी द्यायची असल्यास "उत्तम"ना उत्तम संधी आहे.

पेडणे मतदारसंघात भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे  गृहीत धरून गेले सहा महिने पेडणे मतदारसंघ त्यानी पिंजून काढला आहे. त्यानंतर "पेडणे सेवा ट्रस्ट" या आपल्या सेवाभावी संस्थेचे अगदी थाटामाटात पंचतारांकित वातावरणात लेझर किरणांच्या झगमगाटात १६ ऑगस्ट रोजी उद्घाटन केले. या सोहळ्यात माजी पोलीस  अधीक्षक आपा तेली, कोरगावचे माजी सरपंच व मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुदीप कोरगावकर, संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार दामोदर शेवडे, नाना आसोलकर, मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर पेडणेकर तसेच विविध क्षेत्रातील एकूण ३५ नामवंतांचा   सन्मान करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात किती लोकांचा सन्मान  करण्यात आला ही गोष्ट महत्त्वाची नसून एका सेवा संस्थेचे उद्घाटन असूनही ठीक वेळेवर कार्यक्रम सुरू झाला, ही गोष्ट मला भावली. राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम असूनही निमंत्रित लोकांचे स्वागत करण्यासाठी भरजरी वेश परिधान केलेले ज्येष्ठ कार्यकर्ते जातीनिशी प्रत्येक प्रवेशद्वारावर हजर होते. सन्मानमूर्तींच्या दिमतीला एकाच रंगाच्या साड्या परिधान केलेल्या सुहास्यवदनी युवती उभ्या होत्या.  पाठीवर उत्तम पार्सेकर हे नाव मोठ्या अक्षरात लिहिलेले डझनभर  स्वयंसेवक सभागृहात लक्ष ठेवून होते. सभागृहात एकही व्हीआयपी नसताना 'वॉकी-टॉकी' घेऊन काही गणवेशधारक कार्यकर्ते दिसत होते. व्यावसायिक पद्धतीने सूत्रसंचालन झाले. ३५ वयोवृद्ध नागरिकांचा शिस्तबद्धरीत्या सन्मान झाला. 

गेल्या काही वर्षांत आपल्या गोवा राज्यात केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स होतात. पेडणे सेवा ट्रस्टचा पेडणे येथे झालेला सोहळा या इव्हेंट्सपेक्षा निश्चितच सरस  होता. गोव्यातील या नव्या शिस्तीमुळे आणि उत्तम पार्सेकर यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पेडणेतील राजकारण बरेच रंगतदार होणार हे नक्की!


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)