गोव्यात पुन्हा रुजतेय संस्कृतची परंपरा

Story: प्रासंगिक |
27th August, 10:55 pm
गोव्यात पुन्हा रुजतेय संस्कृतची परंपरा

भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळख असलेला आपला गोवा एकेकाळी संस्कृत भाषेचे समृद्ध केंद्र म्हणूनही ओळखला जात होता. काळाच्या ओघात काही कारणांमुळे ही परंपरा बऱ्याच अंशी खंडित झाली होती. ही खंडित झालेली परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गोवा आणि देशभरात तसेच विदेशात सरळ आणि सोप्या पद्धतीने संस्कृत शिकविण्यासाठी 'संस्कृत भारती' उल्लेखनीय योगदान देत आहे. त्यांच्या या प्रयत्नांव्यतिरिक्त शांकर पाठशाळा कवळे, स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी तपोभूमी, श्री विद्या शास्त्र पाठशाला ऋषीवन रिवण, पर्तगाळ मठ आदी संस्थांनी आपल्या समिधा या ज्ञानयज्ञात अर्पण केल्या आहेत.

राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली म्हणजेच केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्लीतर्फे जुलै-ऑगस्ट २०१६ मध्ये देशभर संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच, तिला जनभाषा म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा येथे संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष चिन्मय आमशेकर यांच्या प्रयत्नांमुळे संस्कृत शिक्षण केंद्र सुरू केले व त्याची जबाबदारी आचार्य राजेश ठक्कर यांच्यावर सोपविण्यात आली. साल २०२५-२६ मध्ये गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय फर्मागुढी येथे केंद्र सुरू करण्यात आले. त्याची जबाबदारी आचार्य या नात्याने धीरज मिश्रा यांच्यावर सोपविण्यात आली. पुढील केंद्र याच वर्षी कुंकळ्ळी एज्युकेशन सोसायटीचे सी. ई. एस. महाविद्यालय कुंकळ्ळी आणि शासकीय महाविद्यालय केपे येथे सौरभ गायने यांच्या प्रमुखपदी सुरू करण्यात आले. या केंद्रात अनुक्रमे ४८ आणि ३० विद्यार्थी सहभागी झाले. ही तिन्ही केंद्रे सध्या कार्यरत आहेत.

संस्कृत ही देवभाषा म्हणून प्रसिद्ध होती. आपले धार्मिक साहित्य, वेद, उपनिषदे, पुराणे याच भाषेत आहेत. एकंदरीत हा ज्ञानाचा खजिना आपणाला, पुढील पिढीला, तसेच जगभरातील जिज्ञासूंना अभ्यासासाठी उपलब्ध होण्यासाठी आपणही जमेल तसा हातभार लावला पाहिजे. आज जागतिक संस्कृत दिनानिमित्त आपण असा संकल्प करूया.

उमाकांत शेटये

(देवळाय-खांडोळा)