गोव्यातील वनौषधींचा समृद्ध वारसा

कोणत्या देवराईत कोणत्या प्रजातीची वनस्पती उपलब्ध आहे, याचे ज्ञान वनौषधिकारांना परंपरेने लाभले होते. देरोड्याच्या धुपाच्या राईत धुपाची झाडे कुठे आहेत? कोपार्डेच्या ब्राह्मणीच्या देवराईत खष्टाचे झाड आणि त्याची फळे कोणत्या मोसमात उपलब्ध होणार याविषयीची माहिती तेथील वयस्कांना होती.

Story: विचारचक्र |
25th August, 11:23 pm
गोव्यातील वनौषधींचा समृद्ध वारसा

यंदाच्या ३ मार्च २०२६ च्या जागतिक वन्यजीव दिनाची संकल्पना 'औषधी आणि सुगंधित वनस्पती : आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे संवर्धन' अशी होती. या संकल्पनेद्वारे आरोग्य आणि उपजीविकेच्या अनुषंगाने वनस्पतीरुपी संसाधनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले होते. भारत हा समस्त विश्वातील जैवविविधतेने समृद्ध अशा जगातील १७ राष्ट्रांपैकी एक असून भारतात सुमारे १५,००० औषधी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी ८,००० वनस्पतींचा उपयोग भारतीय औषध निर्मितीसाठी केला जातो, ज्यामुळे भारत जगातील औषधी आणि सुगंधित वनस्पतींचे एक महत्त्वाचे केंद्र बनलेला आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या माध्यमातून औषधी वनस्पतींचे संरक्षण, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत नैसर्गिक अधिवासातच वनस्पतींचे संरक्षण, तसेच नैसर्गिक अधिवासाबाहेर औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन आणि संसाधन वृद्धीकरणास सक्रिय पाठबळ देण्याचे कार्य करत असते.

भारतीय वनौषधींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे संचित  गोव्याच्या भूमीत पूर्वापार अनुभवायला मिळत असून, पोर्तुगीज अमदानीत गोव्यात स्थायिक झालेल्या डॉ. गार्सिया दी ओर्ता (१५०१ ते १५६८) यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पुस्तक रूपात मांडण्याचा जो प्रयत्न केला, त्या माध्यमातून इथल्या वनौषधींच्या त्याचप्रमाणे आयुर्वेदातल्या वारशाची प्रचिती अभ्यासकांना आलेली आहे.

'होर्टस इंडिकस मालाबारिकस' हा ग्रंथ १७ व्या शतकात (१६७८-१६९३) कोचीचे तत्कालीन डच गव्हर्नर हेनड्रिक एड्रियन वैन रीडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. त्या ग्रंथांत गोमंतकाच्या भूमीशी नाते सांगणाऱ्या रंगा भट, विनायक पंडित आणि अप्पू भट या तीन निष्णात वैद्यांनी औषधी वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची नावे आणि उपयोग ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गोव्यातील वनौषधींच्या त्याचप्रमाणे आयुर्वेदातल्या समृद्ध वारशाला उजाळा देण्याचे कार्य रामचंद्र पांडुरंग वैद्य (दादा वैद्य : १८५९ - १९४७) यांनी पोतुगीज अमदानीत अॅलोपेथी या आधुनिक वैद्यकीय परंपरेचे प्रस्थ असताना केले होते. अॅलोपेथी वैद्यकीय उपचार पद्धतीचा वापर करूनही गुण न आल्याने, निराश झालेल्या तत्कालीन राज्यपालांच्या नातेवाईकास वनौषधींच्या माध्यमातून यशस्वीपणे उपचार केल्याने, दादा वैद्य यांच्या योगदानाची पोर्तुगीज सरकारने दखल घेतली होती.

गोव्यातील वनौषधीचा वारसा येथील गावडा, कुणबी आणि वेळिप आदिवासी जमातींबरोबर पशुपालक धनगरांच्या आणि जंगल निवासी लोक समुहात प्रचलित पारंपरिक लोकवैद्य ज्ञानावर अवलंबून आहे. जेव्हा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यावर आधारित औषध विज्ञान आणि उपचार पद्धतीचे ज्ञान इथे उपलब्ध नव्हते, तेव्हा शेकडो वर्षे या भूमीत उपलब्ध हळद, तुळस, ब्राह्मी, अडुळसा, कांदा, लसुण, दालचिनी, गंजन, जायफळ, कोकम, कोरफड, आवळा... आदी नैसर्गिक घटक नाना व्याधींमधून लोकांना मुक्त करण्याचे कार्य करत होते. पचनक्रियेला पोषक कोकम आगळाचा, जखमेतून अखंडपणे वाहणाऱ्या रक्त प्रवाहाला रोखण्यास हळद पावडर आणि सर्दी, खोकला आदी व्याधींपासून मुक्त होण्यास तुळशीचा वापर पारंपरिक औषध म्हणून केला जायचा. पूर्वीच्या काळी जेव्हा संयुक्त कुटुंबे अस्तित्वात होती, तेव्हा घरातील वयोवृद्ध असणारी आजी, आपल्या बटव्यातून पारंपरिक वनौषधी काढून, घरातल्या आबालवृद्धांवर उपचार करायची. रानातल्या कोणत्या झाडाचा पाला, कोणत्या वृक्षाची साल, कुठल्या वनस्पतीची मुळे किती प्रमाणात कोणत्या व्याधीवर वापरली पाहिजे, याची मात्रा ठरलेली असायची. परंपरेने वनौषधी ज्ञानाचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याची क्षमता आणि अभिरुची पाहून संक्रमित व्हायचा. तत्कालीन समाजाने लोकदेवताच्या नावे अथवा ग्रामदेवीच्या नावे ज्या देवराया राखून ठेवण्यात आल्या होत्या, त्या खरेतर दुर्मिळ वनौषधींसाठी खजिनाच ठरला होता. सत्तरीतील करंझोळ गावातील 'होळयेची राय' एकेकाळी नानाविध वनौषधींसाठी महत्त्वाचा स्त्रोत ठरली होती. वाळपई जवळची कोपार्डेची देवराई केगदीच्या सुंगंधित फुलांसाठी, शिगम्यात भगव्या रंगाच्या अशोक फुलांसाठी विशेष नावारुपास आलेली आहे. कोणत्या देवराईत कोणत्या प्रजातीची वनस्पती उपलब्ध आहे, याचे ज्ञान वनौषधिकारांना परंपरेने लाभले होते. देरोड्याच्या धुपाच्या राईत धुपाची झाडे कुठे आहेत? कोपार्डेच्या ब्राह्मणीच्या देवराईत खष्टाचे झाड आणि त्याची फळे कोणत्या मोसमात उपलब्ध होणार याविषयीची माहिती तेथील वयस्कांना होती. देवराईतील पाने, फुले, कंदमुळे यांचा वनौषधी म्हणून वापर करायचा असेल तर देवराईच्या देवतेला आवाहन करून, तिच्या परवानगीनेच ते वापरणे शक्य होते.

खरेतर फार प्राचीन काळापासून प्राणीसृष्टी वनस्पतींवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून होती. कोणत्या वनस्पतीपासून पोषक अन्नधान्याचे आणि औषधी गुणधर्मांचे घटक उपलब्ध होतील, कोणत्या वनस्पतीपासून आपणासाठी वस्त्रावरणे बनवणे शक्य आहे, निवाऱ्यासाठी कोणत्या वृक्षाची तुळई, फांद्या यांचा वापर करता येईल याचे ज्ञान त्यांनी आपल्या निरीक्षणातून प्राप्त केले होते. कोणत्या वनस्पतीचे पुनरुत्थान कसे होते, तिला फळे, फुले, कंदमुळे औषधासाठी वापरण्यास कोणत्या मोसमात उपयुक्त होतील याविषयीचे ज्ञान त्याने मिळवले होते.

भारतात लोकवनस्पतीविज्ञानाची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली असून, आदिवासी आणि जंगल निवासी लोक समुहांनी केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी वनस्पतींचा जसा वापर केला, तसाच त्यांनी कोणत्या व्याधीवर कोणत्या वनस्पतीची पाने, फुले, कंदमुळे उपयुक्त ठरतील याचे ज्ञान निरीक्षणाद्वारे तसेच परंपरेतून मिळवले होते. एखाद्या विषारी गणल्या गेलेल्या वनस्पतीच्या प्रजातीचा कोणता भाग किती प्रमाणात एखाद्या व्याधीवर उपचार करण्यासाठी वापरावा, याची मात्रा ठरलेली असायची. काजरा (कुचला) Strychnos nux-vomica या वृक्षाची संत्र्याच्या आकाराची आणि नारिंगी रंगाची फळे जरी विषारी असली तरी पारंपरिक औषध म्हणून त्यांचा उपयोग बद्धकोष्ठता, अपचन आदी व्याधींवर केला जातो.


राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५