महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाने गाजणारे, रुबाबदार आणि धडपडी सरकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात होत आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदल्या पत्करून आणि कायम बदल्यांची टांगती तलवार डोक्यावर असतानाही, अतिशय कर्तव्यदक्षपणे कार्यरत असलेले तुकाराम मुंढे हे आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरत आहेत. कारण गोव्यात पर्यटन आणि दैनंदिन व्यवहारांचा प्रमुख कणा असलेल्या हॉटेल व्यवसायात अस्वच्छता, दर्जाहीन खाद्यपदार्थ आणि अनियंत्रित भाववाढ यांसारख्या गंभीर समस्या ऐरणीवर आल्या आहेत. काणकोणपासून पेडण्यापर्यंतच्या लहान-मोठ्या हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसते. राजधानी पणजीसह मडगाव आणि कुडचडे अशा प्रमुख शहरांमध्येही खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये मोठी विषमता आढळते. एकाच चहाची किंमत १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वसूल केली जात असून, यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.
अन्न सुरक्षा आणि ग्राहक हिताच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. बाजारात मिळणारी फळे, फुले आणि सणासुदीच्या काळात विक्री होणारी मिठाई यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक उपाहारगृहांमध्ये अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवले व वाढले जाते, जिथे असुरक्षित आरोग्यदायी परिस्थिती सर्रास पाहायला मिळते. ग्राहकांच्या आरोग्यविषयक तक्रारींची दखल घेणारी अन्न व औषध प्रशासन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात आपल्या बेधडक आणि निष्पक्ष कार्यशैलीने नावारूपास आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष प्रशासकाची उदाहरणे प्रशासकीय व्यवस्थेला दिशा देणारी ठरतात. अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत उच्च पद गाठलेल्या मुंढेंनी आपल्या अल्प कारकिर्दीत २५ हून अधिक बदल्या होऊनही, दबाव न मानता नियमांचे काटेकोर पालन केले. केवळ राजकीय इच्छाशक्तीने रामराज्य येत नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि कठोर अंमलबजावणीच नागरिकांना दिलासा देऊ शकते.
गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्यात नागरिकांचे आरोग्य, दर्जा आणि वाजवी दर सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' या उक्तीचे महत्त्व जपत, ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तडजोड न करता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी गोव्याला लवकरात लवकर प्राप्त व्हावा.
- तन्वी बाणे


