धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर दोन सैन्यांच्या मध्ये अर्जुनासमोर उभ्या असलेल्या या विश्वरूपमय देवाने अलौकिक लीला रचून ठेवली होती.
याचकांचे आर्त जो सदोदित सहस्र पटीने पुरवतो त्या देवाचे औदार्य कसे अपार आहे बघा. ते काय मोजता येण्यासारखे आहे काय? तो देव आपल्या भक्ताच्या भावाला भुलून त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. म्हणजे जे वेदांपासूनही लपवून ठेवले, जे शेषालाही दाखवले नाही, जे रमेलाही कळू दिले नाही, अगदी तेच त्याचे विश्वरूप आता तो या भक्तासमोर, अर्जुनासमोर नाना प्रकारांनी प्रकट करण्याच्या तयारीत आहे. त्या अर्जुनाचेही भाग्य किती अपार असेल याची कल्पनाच केलेली बरी! जागृतीमधून स्वप्नात जाताना जे जे म्हणून दिसते ते ते सगळे म्हणजे जणू काही आपण स्वतःच असावे, अगदी तसा तो स्वतः आपोआप अगणित असा ब्रह्मांडस्वरूप झाला. एकाएकी त्या केशवाने आपला विश्वरूपाचा आकार प्रकट केला. स्थूल दृष्टीचा पडदा बाजूला सारून त्याने आपले केवळ योगैश्वर्य दाखवले. पार्थ ते लगेच कसे बघू शकेल हे लक्षात न येऊन प्रेमाच्या भरात तो म्हणाला, 'पार्था, हे बघ माझं विश्वरूप.'
श्री भगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोsथ सहस्रश:।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च।।५।।
सरळ अर्थ : या प्रमाणे अर्जुनाने प्रार्थना केल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले- 'हे पार्था, माझी शेकडो व हजारो नानाप्रकारची आणि नाना वर्णांची तसेच नाना आकृतींची दिव्य रूपे पहा.'
विस्तृत विवेचन : सगळ्या तोडी देऊन अर्जुनाने हृदयाला भिडणारी विनंती इतक्या आर्ततेने केल्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणाले- 'तुला एक विश्वरूपच पहायचे आहे ना? मग त्यात काय एवढे कौतुक? हे पहा माझे विश्वरूप. तुला जे जे काही म्हणून दिसते आहे, ते सगळे आता माझ्याच स्वरूपात सामावलेले बघ.'
काही कृश, काही स्थूल, काही लघू, काही विशाल, काही सरळ विस्तीर्ण तर काही प्रांतहीन म्हणजे अमर्याद; काही अनावर प्रामाणिक तर काही प्रेमळ कडक, काही व्यवहारप्रिय तर काही तटस्थ निष्क्रिय, काही दक्ष तर काही मूढ बेसावध, काही सोपे तर काही गूढ, काही उदार किंवा कंजूष तर काही रागीट विशेष, काही सौम्य आणि शांत तर काही मदोन्मत्त, काही गर्जून बोलणारे तर काही मौन स्वीकारणारे, काही स्तब्ध आणि औपचारिक तर काही आनंदात गढलेले, काही लोभिष्ट, काही विरक्त तर काही सुप्त झोपलेले.
काही संतुष्ट आणि प्रसन्न तर काही कष्टी आणि खिन्न, काही अशस्त्र काही सशस्त्र तर काही तल्लीन विचित्र, काही तामसी काही स्नेहाल तर काही अक्राळविक्राळ, काही सर्वकाळ उत्पत्तीचा खेळ खेळणारे तर काही प्रेमाने सांभाळ करणारे संरक्षणशील, काही संहारकार्यात आवेशाने वर्तणारे तर काही सर्व कर्मांत अनासक्त असलेले केवळ साक्षीभूत.
अशी माझी नानाविध व असंख्य रूपे ती इथे बघ आणि जी माझी प्रकाशणारी दिव्य तेजे आहेत ती सुद्धा त्यांच्या रंगांसहित व चित्रविचित्र लक्षणांसहित इथे बघ.
काही तप्त सुवर्णासारखी, काही संध्यासमयी दिसणाऱ्या शेंदरी आकाशासारखी तेजस्वी तांबूस; दिव्य माणकांनी ब्रह्मांड भरून गेल्यावर त्यांचे अनिवार तेज जसे पिंगट सहज सुंदर दिसते तशी काही रूपे तर काही अरुणोदयासारखी उत्तम केशरी. काही स्फटिकासारखी शुभ्र वर्णाची तर काही इंद्रनीळासारखी सुनीळ, काही काजळाच्या कीटासारखी काळीकुट्ट तर काही जास्वंदीच्या फुलासारखी लाल रंगाची, काही दिव्य कांचनासारखी पीतवर्णीय तर काही नव-मेघांसारखी परम श्यामल, काही शुभ्रचंपकासारखी गौरवर्ण तर काही नव-तृणांकुरांसारखी हिरवी गार, काही तप्त-तांब्यासारखी तांबडी तर काही श्वेत-चंद्रासारखी उत्तम निर्मल.
आकृती ही कशा भिन्न भिन्न आहेत त्या बघ. बांधा सुकुमार सुंदर व तुळतुळीत सुरेख असलेल्यांना बघून साक्षात मदनही लाजून मान खाली घालेल. शृंगाराच्या वैभवाची भांडारेच जणू इथे उघडलेली आहेत की काय असे तुला वाटेल. काही गोंडस गुबगुबीत, तर काही किडकिडीत आणि शुष्क. काही अत्यंत विक्राळ व दीर्घ कंठांची तर काही भयंकर अशी मोठ्या टाळूची. या नानाविध आकृतींना सीमा नाही. त्यांच्या अंगप्रत्यंगात हे सगळे विश्व सामावलेले आहे.
पश्याssदित्यावसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याऽऽश्चर्याणि भारत।।६।।
सरळ अर्थ : आणि हे भरतवंशी अर्जुना, माझ्या ठिकाणी आदित्यांना म्हणजे अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना आणि दोन्ही अश्विनीकुमारांना व ४९ मरुद्गणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपेही पहा.
विस्तृत विवेचन : या विश्वरूपाची दृष्टी उघडल्यावर आदित्यांच्या सृष्टी उलगडतात. मग ती दृष्टी मिटल्यावर त्या सृष्टी तशाच परत लय पावतात. लक्ष देऊन बघण्यासारखे हे आहे की तोंडातून येणाऱ्या तीव्र वाफेबरोबर सगळे ज्वालामय होते. मग त्या ज्वाळेमध्ये अग्नी आणि अष्टवसू-वर्ग जन्म पावतो (अष्टवसू म्हणजे प्रतिमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरातील धर्मऋषी व दक्षकन्या वसू यांचे पुत्र- धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष व प्रभास. भागवतात द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू व विभावसू अशी नावे आढळतात.) आणि जेव्हा क्रोधाच्या आवेगाने भ्रू-लताग्रे म्हणजे भुवयांची टोके एकत्रित व्हायला येतात तेव्हा तिथे रुद्रगणांचा संभार अवतीर्ण होतो. सौम्यतेच्या ओलाव्यात असंख्य अश्विनीकुमार अवतीर्ण होतात (अश्विनीकुमार म्हणजे अश्विनी नावाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे. हे देवांचे वैद्य होत.) आणि कानांमधून नानाविध वायू निर्माण होत आहेत ते बघ. याप्रमाणे माझ्या स्वरूपाची लीला एकेका सुर-सिद्ध-कुळाला जन्मास घालते (सुर म्हणजे देव. सिद्ध म्हणजे पुराणात वर्णन केलेले एक प्रकारचे उपदेव. याचे कूळ म्हणजे जाती-समुदाय.)
हे अर्जुना, अशी ही माझी खरीखुरी विशाल व अपार स्वरूपे बघ. या स्वरूपांचे वर्णन करायला वेदही असमर्थ आहेत. ही स्वरूपे पाहण्यासाठी काळाचेही आयुष्य तोकडेच म्हणायचे आणि सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवालाही त्यांचा ठाव लागत नाही. ही माझी स्वरूपे जी तिन्ही देवांच्या कानीसुद्धा येत नाहीत, ती तू तुझ्या नयनांनी बघ आणि कौतुकाने आश्चर्याच्या ऐश्वर्याचा यथोचित भोग तू इथे व्यवस्थितपणे घे. (क्रमशः)

- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३


