शिक्षक म्हणजे सागराच्या लाटांवर पेलणाऱ्या अवखळ जहाजाला दिशा देणारा दीपस्तंभ. मानवी मनाला खऱ्या अर्थाने सुजाण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे शिक्षक सदैव आदरणीय राहिले आहेत. अनेक शिक्षक त्यांच्या कर्तृत्वाने आपल्या मनात घर करतात.
मुष्टीफंड संस्थेच्या श्री सरस्वती पूर्व प्राथमिक - प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. वंदना गावसकर याही अशाच आमच्यासाठी आदरणीय शिक्षिका आहेत. शनिवार, २९ ऑगस्ट रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. बालमनावर वात्सल्याचा अभिषेक करणाऱ्या आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचे नाव निश्चित घेतले जाते.
त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही त्यांची खासियत होती; त्यामुळे विद्यार्थीही मन लावून अभ्यास करत. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती हीच त्यांच्या कार्याची पोच पावती आहे. त्यांच्याकडे प्राचीन भारतीय परंपरांचा अक्षरशः खजिना आहे. असंख्य स्तोत्रे, देवपूजा आणि हिंदू सणवार यांच्या त्या उत्तम अभ्यासक आहेत. लहानथोरांचा आदर करण्याची त्यांची शिकवण मुलांमध्ये बदल घडवते. तेच संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर व्हावेत, हा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. त्यामुळे बालमन संस्कारमय होते.
त्या विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करत. प्रसंगी दटावून तर कधी मायेने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आत्मीयता निर्माण केली. लहानग्या मनावर शालेय संस्कार करताना त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आपल्याजवळ असलेले सगळे ज्ञान त्यांनी मुलांमध्ये रुजवले. भारताची भविष्यातील सुजाण पिढी घडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून मन निश्चित सुखावते. आजही असे आदरणीय शिक्षक आहेत, हे निःसंशय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे.
अशा या विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्वाला व आमच्या शिक्षिकेला उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या कार्यास बळ मिळो, हीच आमची सदिच्छा. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे शाब्दिक मूल्यमापन करणे अशक्यकोटीतील कार्य आहे. तरीही...
ज्ञानाचा प्रकाश देण्या
दिवा अखंड जळतो,
जीवनाचा अर्थ खरा
शिक्षकांमुळेच कळतो!

- श्रीधर धनंजय पाटील


