नेपाळमध्ये भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली असताना या आपत्तीच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी काही जणांनी मृतदेहाची विटंबना केली. दागिने काढण्यासाठी महिलेचे केस पकडून तिचे डोके ओढण्यात आले. त्यानंतर कानातील सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने ओढून काढण्यात आल्या.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नेपाळमधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह नदीकाठावर आला होता. यावेळी काही जणांची नजर तिच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर पडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन-तीन जणांनी मृतदेहाजवळ जाऊन महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने ओढून काढण्यात आल्या. या प्रकारामुळे मृत महिलेच्या कानाला गंभीर इजा झाली. आपत्तीच्या काळात घडलेल्या या अमानुष प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता मृत महिलेच्या कानातून काढलेल्या सोन्याच्या बाळ्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून मृतदेहाची विटंबना, चोरी आणि अन्य गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-चीन सीमेजवळ हिमनदी कोसळणे आणि भूस्खलनामुळे अचानक भीषण पूरस्थिती निर्माण झाली. भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या महापुरामुळे रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग यांसह अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेकडो जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये विदेशी पर्यटक तसेच भारतीय यात्रेकरूंचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर आणि भूस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. रस्ते वाहून गेल्याने तसेच काही भागांत दूरसंचार सेवा खंडित झाल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. नेपाळी लष्कर, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव व शोधमोहीम सुरू आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याबरोबरच दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुदेश दळवी


