बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या!

कोकणातला गणपती म्हणजे फक्त सण नाही; तो आहे भावनांचा प्रवास. विरहातून आनंदाकडे आणि आनंदातून पुन्हा विरहाकडे. पण या सगळ्यातून बाप्पा एकच संदेश देतो तो म्हणजे सुखी रहा, एकमेकांना जोडून ठेवा आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया!

Story: प्रासंगिक |
07th September 2025, 12:26 am
बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या!

उंबरठ्यावर उभं राहून हात हलवत निरोप देणारी आजी, डोळ्यांत पाणी साठवून आपल्या मुला-नातवंडांना पाहणारे आजोबा... कोकणात आता गावोगावी हे चित्र दिसू लागले. विसर्जनाच्या क्षणी गावात पसरणारी शांतता, घरातली ती रिकामी पडलेली खोली आणि वर्षभर एकटेपणात घर सांभाळणाऱ्या वृद्धांच्या मनातली हुरहूर... हा सण फक्त आनंदाचा नाही, खरंतर हा सण इथल्या प्रत्येकाला भावनांच्या खोल समुद्रात बुडवणारा. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच कित्येक महिने आपल्या चाकरमानी मुलांची वाट बघणाऱ्या इथल्या त्या ओल्या डोळ्यांत पुन्हा आनंदाची चमक येते आणि कोकणातली प्रत्येक वाडी गणपतीमय होते.

जेव्हा बाप्पा येतो, तेव्हा कोकणात जणू नव्या पालवीसारखे चैतन्य पसरते. वर्षभर मुंबई-पुण्याच्या धावपळीत हरवलेले  चाकरमानी गावाकडे परततात... आणि घरात पाऊल ठेवताच, जणू सगळं वर्षभराचं ओझं उतरतं. बाप्पा येतो आणि प्रत्येकाच्या मनाला एक नवा जोश, एक नवी उमेद मिळते. जणू तो स्वतःच सगळ्यांना चार्ज करतो पुढच्या वर्षासाठी, नव्या स्वप्नांसाठी.

लहान मुलांचा आनंद तर अगदी उच्च कोटीला पोहोचलेला असतो, तो अगदी पाहण्यासारखा! त्यांच्या नजरेत घरातल्या बाप्पाच्या मूर्तीमुळे चमकणारा उत्साह, फुलांनी सजलेलं मखर आणि आरतीच्या वेळी घुमणारा टाळ-मृदंगांचा नाद हे सगळं त्यांच्या मनात कायमचं कोरलं जातं. "जय देव, जय देव!"चा जयघोष त्यांच्या तोंडून सहज बाहेर पडतो. आरती पाठ नसली तरी, ते मोठ्यांबरोबर गातात, नाचतात. आणि मग प्रसादाची ती रांग... मोदक, लाडू, करंज्या ज्याची चव कधीच विसरता येत नाही.

स्त्रिया सकाळी लवकर उठून भक्ती रंगात रंगतात. रोज नव्या पदार्थांचा नैवेद्य. मोदकांपासून ते पुरणपोळीपर्यंत प्रत्येक पदार्थात त्यांचा जीव ओतलेला. घरातली वयोवृद्ध माणसं, ज्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांतून आनंद ओसंडून वाहतो, ती गणपतीच्या आगमनानं पुन्हा तरुण होतात. त्यांच्या डोळ्यांत बाप्पाचं स्वागत करताना आणि नातवंडांना जवळ घेताना एक वेगळंच समाधान दिसतं. गावातली माणसं, पाहुणे, नातेवाईक सगळे एकत्र येतात. या दिवसात वाडीतली सगळी घरं ही प्रत्येक घराला जणू काही एकच, आपलेच कुटुंब असल्यासारखी वाटू लागतात. आपण इतरांकडे गणपतीच्या दर्शनाला जाणे, इतरांनी आपल्याकडे बाप्पाला पाया पडायला येणे, संध्याकाळच्या प्रत्येकाच्या घरी एकत्र येऊन केलेल्या आरत्या, त्यातली गाण्यातली चढाओढ, प्रसादाची देवाणघेवाण... सगळं आता एका वर्षासाठी अविस्मरणीय ठरणार असतं.

पण हा आनंद जेव्हा विसर्जनाच्या क्षणाकडे सरकतो, तेव्हा मनात एक हळवी किनार उमटते. घरातल्या आजी-आजोबांच्या डोळ्यांत पाणी तरळतं. वर्षभर एकटेपणात सांभाळलेलं घर, जे काही दिवस गजबजलं होतं, ते पुन्हा शांत होणार. ही माणसं इकडे गावी असतात म्हणूनच तर इथल्या घराचे दरवाजे उघडे असतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मुलं-नातवंडं शहराकडे परतणार म्हणून बाप्पाला निरोप देताना, जणू आपल्या प्रियजनांनाही निरोप द्यावा लागतोय, अशी त्यांची अवस्था होते. "पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणताना त्यांचा आवाज थरथरतो. “सर्वांना सुखी ठेव रे बाबा” बाप्पाकडे मागणे मागताना त्यांचा कंठ भरून येतो. उंबरठ्यावर उभं राहून, ओल्या डोळ्यांनी ते सगळ्यांना पाहतात. घर रिकामं होतं, पण मनात बाप्पाच्या आठवणी आणि पुढच्या गणपतीची वाट पाहण्याची आस जागी राहते.

कोकणातला गणपती म्हणजे फक्त सण नाही; तो आहे भावनांचा प्रवास. विरहातून आनंदाकडे आणि आनंदातून पुन्हा विरहाकडे. पण या सगळ्यातून बाप्पा एकच संदेश देतो तो म्हणजे सुखी रहा, एकमेकांना जोडून ठेवा आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया!

बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!