पाणी अडवा पाणी जिरवा

जलसंधारण ही केवळ एका गावाची किंवा काही व्यक्तींची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक बांधिलकी आहे. सावई-वेरे ग्रामस्थांनी एकजुटीने केलेला हा उपक्रम म्हणजे निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची जाणीव करून देणारा आदर्श आहे.

Story: साद निसर्गाची |
17th October, 10:34 pm
पाणी अडवा पाणी जिरवा

गतवर्षाच्या तुलनेने यंदाच्या वर्षी पावसाने जरा उशिराच हजेरी लावली. धरणांमधील पाण्याचा साठा घटू लागला आणि राज्यभरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिंता सतावू लागली. पर्यावरणाचा ऱ्हास, मानव-वन्यजीव संघर्ष, पर्यावरण बदल, देशांमधील वाढते तणाव, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, तापमानाचा वाढता पारा यासारख्या कारणांमुळे भविष्यात जाणवू शकणाऱ्या पाणी टंचाईचा मुद्या वर्तमानात ऐरणीवर आला. आपण जे भविष्य भविष्य म्हणतो ते भविष्य येऊन ठेपले की काय याची एका प्रकारे भितीच निर्माण झाली. कृत्रिम घटक जसे वातानाकुलित यंत्रणेची संख्या वाडली आणि वरुणदेव बरसले! झाडांना नवीन पालवी फुटली. फुले बहरली. वन्यजीवाला हुरूप आला. मृतिकेने नव चैतन्याला जन्म दिला. आणि आपण म्हणजे मानवजातीने एक दीर्घ सुस्कार सोडला! 

अवकाळी बरसलेला पाऊस, किंवा असह्य होणारा उकाडा हा काही क्षणार्धात झालेला ऋतूचक्र बदल नव्हे; ही मनुष्याच्या कर्माची फळे! राज्यात पडलेला कमी पाऊस व उद्या होऊ शकणारी पाणीटंचाई ही सुद्धा माणसाच्याच कर्माची फळे. एखाद दिवशी नळ कोरडा पडल्यास आपला घसा सुकून येतो. पाण्याची चणचण जाणवल्यार सजीवाचे कसे हाल होऊ शकतात ही गोष्टीचा विचार कल्पना पलीकडचा आहे. 

या पार्श्वभूमीवर, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वाचे महत्त्व ओळखून सावई-वेरे ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील जलस्रोताच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. केवळ पाण्याचा साठा वाढवणे नव्हे, तर पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलसाठ्याचे पुनर्भरण व्हावे, या उद्देशाने या जलस्रोतावर कोणत्याही प्रकारचे काँक्रिटीकरण न करता नैसर्गिक पद्धतीने बांध घालण्यात आला. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवणच्या या प्रयत्नातून ग्रामस्थांनी निसर्गाशी सुसंगत जलसंधारणाचा आदर्श घालून दिला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वेळीच केलेली ही सामूहिक कृती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा पाण्याचे संवर्धन करून संभाव्य संकटाची तीव्रता कमी करणे अधिक गरजेचे असल्याची बाब लक्षात घेऊन ही सामूहिक कृती करण्यात आली. ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेला हा उपक्रम जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करणारा असून, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणून घेण्याचा संदेश देणारा आहे. 

शेवटी, जलसंधारण ही केवळ एका गावाची किंवा काही व्यक्तींची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक बांधिलकी आहे. सावई-वेरे ग्रामस्थांनी एकजुटीने केलेला हा उपक्रम म्हणजे केवळ जलस्रोताच्या संवर्धनाचा प्रयत्न नसून निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची जाणीव करून देणारा आदर्श आहे. आज आपण पाण्याचा प्रत्येक थेंब जपला, तर उद्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येणार नाही. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो; मात्र त्याच्या देणगीचे जतन करणे आपल्या हातात आहे. चला, पाण्याचा अपव्यय टाळूया, जलस्रोतांचे संवर्धन करूया आणि लोकसहभागातून जलसमृद्ध गावांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहूया. 'पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा केवळ नारा नसून जलसुरक्षित भविष्याचा पाया आहे.