एक काळ असा होता जेव्हा ज्ञान मिळवण्यासाठी नालंदा किंवा तक्षशिलेला जावे लागायचे. तसेच आजच्या काळात ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजला जाण्याचीही गरज उरलेली नाही. खिशात एक स्मार्टफोन आणि त्यात इंटरनेट डेटा असला की तुम्ही थेट 'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी'चे कुलगुरू होऊ शकता. या युनिव्हर्सिटीची वैशिष्ट्ये अशी की, इथे कोणीही नापास होत नाही आणि माहितीची खात्री करण्याची पद्धत तर कोणालाच ठाऊक नाही. विशेष म्हणजे भली मोठी शिकलेली माणसे, त्यातही वयोवृद्ध माणसे काहीही विचार न करता कुठलाही मेसेज फॉरवर्ड करतात. इंस्टाग्रामवर युवा पिढी जाण्याचे एक कारण असेही होते की वृद्ध माणसे फेसबुकवर काहीही पोस्ट करू लागली होती. आता हळूहळू वृद्ध माणसे तिथेही आलीत व युवांवर ही म्हणायची पाळी आली, "बस, आता इकडे तरी काहीही पोस्ट करू नका!" खरे तर, या युनिव्हर्सिटीत पदवी मिळवण्यासाठी अभ्यासाची नाही, तर फक्त 'फॉरवर्ड' बटण दाबताना बोटाला लवचिकता असण्याची गरज असते. विशेष म्हणजे ज्याला नीट सेटिंग सुद्धा येत नाही, ते स्वतःला सोशल मीडियाचे तज्ज्ञ म्हणवून घेतात.
काही लोकांना संडासमध्ये मोबाईल वापरण्याची सवय असते. अशा लोकांच्या मोबाईलला हात लावायची सुद्धा भीती वाटते. कारण मोबाईल ही एकमेव वस्तू अशी आहे ज्याला कुठलेही बंधन, सूतक वगैरे लागत नाही. स्मशानभूमीतून तो थेट मंदिर किंवा लग्न सोहळ्यात न पुसता जातो. माझ्यासारख्या कुणाला जर मोबाईल पुसायची सवय असेल तर गोष्ट वेगळी. मी दिवसाला दोन-चार वेळा मोबाईल टिशू व कॉलिन घेऊन पुसतो.
खूप लोकांना मोबाईल उशाशी घेऊन झोपण्याची वाईट सवय असते. यामुळे झोपेवर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतात. सकाळी डोळे उघडण्यापूर्वीच आपल्याकडे 'गुड मॉर्निंग' व सुविचारांचे बॉम्बगोळे सुटू लागतात. उगवता सूर्य, हात जोडलेले बाळ किंवा चहाची वाफाळलेली कप-बशी... या चित्रांसोबत असे काही जड सुविचार येतात की वाचणाऱ्याला वाटते की संपूर्ण जग सुधारले आहे व फक्त तोच शिल्लक राहिलाय. जो माणूस रात्री रिक्षावाल्याशी पाच रुपयांसाठी भांडलेला असतो, तोच सकाळी "क्षमा हाच सर्वात मोठा धर्म आहे" असा सुविचार पाठवून आपल्याला उपकृत करतो. प्रत्येक सुविचारासोबत गुलाबाचे फूल किंवा एखादा धबधबा असतोच.
या युनिव्हर्सिटीचे 'मेडिकल विंग' तर WHO पेक्षा दोन पावले पुढे आहे. इथे कॅन्सरपासून ते शेअर मार्केटच्या तोट्यापर्यंत सगळ्यावर एकच जालीम उपाय उपलब्ध आहे, 'गरम पाणी आणि ओवा!' आधी रामदेव बाबा होते, आता आचार्य मनीष चर्चेत आहेत. एखाद्याने ग्रुपवर जर टाकले, “जरा डोकं दुखतंय”, तर लगेच सर्व मुन्नी-मुन्ना झंडू बाम, टायगर बाम घेऊन येतात. कोणी सांगते, "कानाच्या मागे लसणाची पाकळी चोळा," तर कोणी म्हणते, "डाव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधा, डोकं दुखणं पळून जाईल!" तर कुणी म्हणते, "झोपताना मोबाईल उशाखाली ठेवू नका, त्याऐवजी अर्धा कापलेला कांदा ठेवा, तो रेडिएशन शोषून घेतो." "अहो, चहामध्ये दोन लवंगा, चिमूटभर काळी मिरी आणि आलं टाका, लगेच बरं वाटेल!" कुणी एक नाकपुडी बंद करून १ ते १० मोजायला सांगते. कारल्याचा रस डोळ्यात घातल्याने लांबचे स्पष्ट दिसते, असेही सल्ले मिळतात. इथल्या घरगुती उपायांची प्रगती पाहता, लवकरच लोक किडनी स्टोनचे ऑपरेशन सुद्धा घरच्या घरी यूट्यूब व्हिडियो बघून करतील की काय अशी भीती वाटते. इथले डॉक्टर्स इतके हुशार आहेत की ते लिंबू आणि बेकिंग सोडा वापरून माणसाला अमर करतात. गोव्यात तर 'काजू फेणीचा एक चमचा' हा कुठल्याही रोगावर रामबाण उपाय आहे म्हणे. असले जादुई उपाय वाचून धन्वंतरी आपल्या पादुकाने एक-एकाला हाणतील. बिचारा डॉक्टरही विचार करत असेल की, आपण उगीच पाच-सहा वर्षे एम.बी.बी.एस.ला घालवली!
इतिहासाच्या पुस्तकात जे नाही, ते व्हॉट्सअॅपवर आहे. "ताजमहाल हे खरं तर तेजोमहालय कसं होतं" इथपासून ते "डायनासोर हे खरं तर शाकाहारी होते आणि ते फक्त तुळशीची पानं खायचे" इथपर्यंतचे अगाध ज्ञान इथे मिळते. युनेस्कोचे अध्यक्ष तर इतके रिकामटेकडे आहेत की ते रोज सकाळी उठून कधी भारताच्या झेंड्याला तर कधी राष्ट्रगानाला 'जगातील सर्वोत्कृष्ट' म्हणून प्रमाणपत्र वाटत असतात.
"हा मेसेज ११ लोकांना पाठवा, संध्याकाळपर्यंत गोड बातमी मिळेल" किंवा "हा मेसेज न पाठवल्यास तुमचे व्हॉट्सअॅप उद्यापासून बंद होईल" अशा मेसेजवर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. लोक भीतीपोटी का होईना, पण तो मेसेज, चहा पिताना एखाद्याने बिस्कीट मागितले तर त्याच्यापेक्षाही वेगाने फॉरवर्ड करतात. उच्चशिक्षित इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स सुद्धा "नासाने म्हटलंय आज रात्री पृथ्वीवरून दोन चंद्र दिसणार आहेत" हा मेसेज उत्साहाने फॉरवर्ड करतात.
फॅमिली ग्रुप म्हणजे तर या युनिव्हर्सिटीचे प्रॅक्टिकल मैदान! तिथे काका-पुतण्याचे वाद होतात, भाऊ राजकारणावरून भिडतात. पण शेवटी एका 'शुभ सकाळ'च्या मेसेजवर सगळं शांत होतं. एखादा फॉरवर्ड मेसेज खोटा आहे असे सिद्ध करायला जा, मग बघा काय उत्तर मिळते. "तू जास्त शिकला आहेस का? तुला मोठ्यांचा मान नाही का?" या एका वाक्यात तुमची वर्षानुवर्षांची पदवी कचऱ्यात जमा केली जाते.
२०१६ च्या नोटाबंदीनंतर एक अफवा वाऱ्यासारखी पसरली होती की, "२००० च्या नवीन नोटेमध्ये एक 'नॅनो जी.पी.एस. चिप' बसवली आहे. त्यामुळे नोट जर जमिनीखाली १२० फूट खोल गाडली तरी सरकारला तिचा पत्ता लागेल." लोक इतके भारावून गेले होते की काही जणांनी तर नोटेमध्ये चिप शोधण्यासाठी नोट प्रकाशात धरून पाहिली, तर काहींनी ती फाडूनही पाहिली. शेवटी ती नोटच चलनातून गायब झाली, पण ती चिप कोणालाच सापडली नाही! "मोबाईलची बॅटरी कमी झाल्यावर जर तुम्ही #३३७०# हा नंबर डायल केला, तर बॅटरी ५०% नी आपोआप चार्ज होते," हा मेसेज फॉरवर्ड करणारा वर्ग इतका मोठा आहे की अॅपलचे इंजिनिअर्स स्वतः घरी येऊन त्यांचा सत्कार करणार आहेत म्हणे.
‘मंदिरात मूर्तीने दूध पिले’ - मेसेजेसच्या खाली एक ओळ हमखास असते: "हे बघून दुर्लक्ष करू नका, नाहीतर अनर्थ होईल." मग बिचारा मध्यमवर्गीय माणूस 'अनर्थ' टाळण्यासाठी तो व्हिडिओ संपूर्ण खानदानाला पाठवून मोकळा होतो. रतन टाटांच्या नावाने "व्हॉट्सअॅपवर मेसेज न वाचणे हा गुन्हा आहे" अशा प्रकारचे फेक विचार फिरतात. बिचाऱ्या दिग्गज उद्योजकांनाही 'आपण असं कधी बोललो?' असा प्रश्न पडत असेल. हिंदीत प्रेमचंद व बच्चन, तर इंग्रजीत शेक्सपिअर यांच्या नावावर काहीही फॉरवर्ड केले जाते. "पुढच्या ३० वर्षात मुंबई, न्यूयॉर्क आणि लंडन पूर्णपणे पाण्यात बुडणार आहेत, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे." पण हेच शास्त्रज्ञ दरवर्षी 'जगाचा शेवट'होण्याच्या तारखाही बदलत असतात, हे कोणीच लक्षात घेत नाही. पण मेसेज वाचून बिचारा सामान्य माणूस चिंतेत पडतो. २१ डिसेंबर २०१२ रोजी काहीच झालं नाही. ती बाबा वेंगाला तर काहीच काम धंदा नाही. प्रत्येक क्षेत्राची भविष्यवाणी करून ठेवलीय.
व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवलीय, 'बुद्धीचा वापर करण्यापेक्षा अंगठ्याचा वापर सोपा आहे.' इथे तथ्य महत्त्वाचे नाहीत, तुमची 'श्रद्धा' आणि इंटरनेट डेटा महत्त्वाचा आहे.

_ आदित्य सिनाय भांगी


