खूपदा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की, "स्पर्धा परीक्षेसाठी मी कोणती पदवी (Degree) घेऊ? बी.ए. (BA) केले तर चालेल का?" या प्रश्नाला पण काहीतरी तर्क (Logic) आहे, कारण सुरुवातीच्या काळात लोक / जाणकार यांचे उत्तर 'हो, बी.ए. लाच प्रवेश घे; म्हणजे तुला पुढे सोपे जाईल' वगैरे वगैरे असे असे. त्यामुळे खूपदा मुलांचा गोंधळ व्हायचा की बी.ए. पदवीमधील विषयांवरच युपीएससी चा अभ्यासक्रम अवलंबून आहे व त्यामुळे त्यांनी बी.ए. ला प्रवेश घ्यायचे. परंतु हे उत्तर चुकीचे होते किंवा चुकीच्या संदर्भावर अवलंबून होते. 'बी.ए. कर' या पर्यायावर (विकल्पावर) खरे तर कारण असे होते की, बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्याला इतर शाखांपेक्षा अभ्यासक्रमात मोकळा वेळ जास्त मिळतो व त्या वेळेचा सदुपयोग तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी करू शकतो. म्हणून याच एका कारणाने लोक असा सल्ला द्यायचे. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय नक्कीच बी.ए. ला आहेत व हे विषय युपीएससी ला देखील आहेत; परंतु दोघांचा अभ्यासक्रम खूप वेगवेगळा आहे हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.
शेवटी अनेक जण सनदी अधिकारी म्हणून बी.ई. (BE), एम.बी.बी.एस. (MBBS), बी.टेक. (B.Tech) असे शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी तयार झाले. त्यामुळे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी नुसत्या जिद्दीच्या / मेहनतीच्या जोरावर सनदी अधिकारी होऊ शकतो. काही असेही विद्यार्थी बघितले की, त्यांनी युपीएससी साठी बी.ए. घेतले, पण मुळात ज्यात रस नव्हता, त्यात ४-५ अटेम्प्ट करून युपीएससी मध्ये अपयश आले. त्यामुळे आवडते शिक्षण व युपीएससी मधील अपयश यांमुळे पुढे नैराश्याच्या गर्तेतून त्यांनी 'आत्महत्या' केली.
येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, शिक्षण हे नेहमी आपल्या आवडीचे व झेपणारे घ्यावे, मग ते काहीही असो. कारण उद्या तेच शिक्षण प्लॅन-बी (Plan-B) बनून आपल्या रोजीरोटीसाठी उपयोगी पडू शकते. ९ वी च्या वर्षापासून युपीएससी ची तयारी करावी. १० वी नंतर आवडीची शाखा निवड करावी. आवडीच्या विषयात पदवी मिळवावी व समांतर जोडीला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी; म्हणजे पुढे नैराश्य येत नाही. याच अभ्यासाच्या बळावर मुलांनी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे (GPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांनाही बसावे. गोवा स्टाफ सिलेक्शन परीक्षेसाठी रिझनिंग (Reasoning), न्यूमेरिकल (Numerical), इंग्रजी या विषयांचा तिथे केलेल्या अभ्यासाचा फायदा होतो. कोणताही अभ्यास कधीही भविष्यात फायदेशीर पडू शकतो, वाया काहीही जात नाही.
खूपदा गोष्टींत असे घडलेले आहे की, ज्यांनी युपीएससी ची तयारी केली त्यांना जीपीएससी (GPSC) परीक्षा सोपी गेली. त्यामुळे 'प्लॅन बी' (Plan B) जर ठेवला तर फायदा होतो.



