साधा पूल दोन ठिकाणांना सहज जोडून देतो, पण उड्डाणपूल त्याहूनही मोठे आश्वासन देतो; सुसाट प्रवास, मध्ये कुठेही अडथळा नाही आणि ट्रॅफिकच्या कटकटीतून एकदम सुटका! पर्वरीच्या नव्या फ्लायओव्हरकडून हीच अपेक्षा होती. पण तो सुरू झाला अन अवघ्या काही दिवसांतच प्रवासाऐवजी गोंधळ, अचानक घातलेली बंदी आणि दुर्दैवी अपघातांमुळेच हा पूल चर्चेत आला.
पुलावरून उतरताना अन चढताना होणारा गोंधळ, सर्व्हिस रोडशी जोडणारा रस्ता आणि दुचाकींची ये-जा... या सगळ्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परिस्थिती बिघडल्यावर मग प्रशासनाला जाग आली; त्यांनी दुचाकींना बंदी घातली, काही रस्ते बंद केले आणि वाहतुकीचा अभ्यास करायला तज्ज्ञांची समिती बोलावली. पण या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, लोक आधी निर्णय घेऊन मोकळे होतात आणि मग त्याचे घातक परिणाम भोगल्यावरच का जागे होतात?
नियोजनातील तर्कदोष
या सगळ्यामागे सर्वात मोठे कारण आहे 'प्लॅनिंग फॅलसी' म्हणजेच नियोजनातील तर्कदोष. एखादे काम पूर्ण करायला किती वेळ, मेहनत आणि पैसा लागेल, तसेच त्यात काय काय अडचणी येतील, याचा भलताच कमी अंदाज बांधण्याची माणसाला सवय असते. लोक फक्त शेवटी काय चांगले होणार, याचाच विचार करतात आणि मध्ये येणाऱ्या अडथळ्यांकडे पुरते दुर्लक्ष करतात. रस्ता ही अशी जागा आहे जिथे विविध मानसिकतेचे, वेगवेगळ्या वेगाने गाडी चालवणारे लोक असतात. चालकाकडून एखादी साधी चूक झाली तरी अपघात होणार नाही, अशा दृष्टीने रस्ता तयार केला तरच तो सुरक्षित मानला जातो. पर्वरीच्या बाबतीत नियोजकांनी फक्त ट्रॅफिक कमी करण्यावर आणि वेळ वाचवण्यावर भर दिला; प्रत्यक्ष गाडी चालवणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या स्वभावाचा विचारच केला नाही.
अति-आशावाद
या नियोजनातील चुकीमागे 'अति-आशावाद'ही दडलेला असतो. म्हणजे 'वाईट जे काही घडेल ते दुसऱ्या कोणासोबत तरी घडेल, माझ्या बाबतीत असा अपघात होणारच नाही' असे मानण्याची मानवी वृत्ती! अस्पष्ट फलक किंवा अचानक लेन बदलणे धोकादायक ठरू शकते हे ठाऊक असूनही, 'काही होणार नाही' असाच गृह्यप्रकार प्रशासनाने केला असावा. वैयक्तिक आयुष्यात असा विचार चालून जातो, पण लोकांच्या जिवाशी जोडलेल्या कामांमध्ये असा बाळबोध आशावाद भलताच महागात पडतो.
अति-आत्मविश्वास
आपला निर्णय किती अचूक आहे यावर अतीव विश्वास असणे, हा झाला अति-आत्मविश्वास. लोक नवा रस्ता लगेच समजून घेतील, ट्रॅफिक आपोआप शिस्तीत चालेल आणि काही गडबड झालीच तर पूल सुरू झाल्यावर सुधारू... अशीच काहीशी समजूत प्रशासनाची असावी. दिसायला एखादा प्रकल्प कितीही भव्य आणि आधुनिक असला, तरी तो प्रत्यक्षात तितकाच चांगला चालेल असे मानणे हा एक भ्रमच आहे.
प्रतिक्रियात्मक उपाय
अपघात झाल्यावर प्रशासनाने केलेली धावपळ म्हणजे केवळ 'प्रतिक्रिया' आहे. दुर्घटना घडल्यावर जागे होण्यापेक्षा हे तांत्रिक ज्ञान आधीच वापरायला हवे होते. उड्डाणपूल सुरू करण्यापूर्वीच वाहतुकीचे सिम्युलेशन आणि सखोल अभ्यास केला असता, तर धोक्याच्या जागा आधीच स्पष्ट झाल्या असत्या.
मागून सुचलेले शहाणपण
घटना घडल्यावर 'हे तर आधीच उघड होते' असे म्हणण्याची सवय सर्वांनाच असते. आता अपघात झाल्यावर कुठे काय चुकीचे होते हे स्पष्ट दिसते आहे. पण म्हणून ते दुर्घटना घडण्यापूर्वीही सर्वांना तितकेच स्पष्ट दिसत होते असे नाही.
'प्री-मॉर्टम'ची गरज
या चुका टाळण्यासाठी 'प्री-मॉर्टम' ही संकल्पना कामी येते. काम सुरू करण्याआधीच 'हा प्रकल्प सपशेल अपयशी ठरला आहे' असे गृहीत धरून चालल्यास संभाव्य चुका आधीच समोर येतात. पर्वरी पुलाच्या बाबतीत असा विचार केला असता, तर अस्पष्ट फलक, दुचाकींचा धोका आणि वेगाची मर्यादा यावर आधीच मार्ग काढता आला असता.
पर्वरीचा फ्लायओव्हर हा फक्त इंजिनिअरिंगचा धडा नाही, तर योग्य निर्णय कसा घ्यावा याचा वस्तुपाठ आहे. एखादा पूल फक्त भक्कम उभा आहे म्हणून तो सुरक्षित होत नाही; तर लोक कोणत्याही दबावाशिवाय आणि गोंधळाशिवाय तो वापरू शकतात, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने सुरक्षित ठरतो.



