Home >> तरंग >> ‘जनरेशन गॅप’ मुळावर उठण्याआधी...

‘जनरेशन गॅप’ मुळावर उठण्याआधी...

गेल्या काही वर्षांत जगातील काही देशांमध्ये अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी परिवर्तन घडवून आणले. हे सर्व जण 'जनरेशन झेड'चे प्रतिनिधी. आपल्याहून मोठ्या असलेल्या पिढ्यांना ते काही तरी सांगू इच्छितात. पारंपरिक मानसिकतेतून त्यांना झुकविण्याचा प्रयत्न झाला, तर ते दुप्पट त्वेषाने अंगावर येतात. ‘नीट’ परीक्षेवरून झालेल्या रणकंदनात नेमके हेच झाले आहे. ही ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली नाही, तर ती संबंधितांच्या मुळावर उठायला वेळ लागणार नाही.

Story: वर्तमान |
25th July, 11:34 pm
‘जनरेशन गॅप’  मुळावर उठण्याआधी...

‘पुन्हा आंदोलनात दिसाल, तर खिशात ५० ग्रॅम ड्रग्ज टाकून गजांआड करेन!’

ही धमकी कुठल्या हिंदी चित्रपटातील पोलिसाने कोणा हिरोला दिलेली नाही. मुंबई पो​लिसांतील एका कर्मचाऱ्याने आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावताना हे शब्द वापरले आहेत. त्या पोलिसाच्या नकळत एका विद्यार्थ्याने हा प्रकार मोबाईलमध्ये शुट केला म्हणून तो उघडकीस आला. नंतर त्या कर्मचाऱ्यावर बदलीची वगैरे कारवाई करण्याचा फार्स झाला. पण यातून लोकशाही व्यवस्थेतील घटक कसे एकाधिकारशाहीकडे झुकू लागले आहेत, याचे प्रत्यंतर आले. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना या दिव्यातून जावे लागले. एकीकडे, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सहृदयतेने वडापाव खाऊ घालणारे मुंबई पोलीस आणि दुसरीकडे, गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणारा पोलीस अशा दोन टोकाच्या प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेकांचे बुरखे टराटरा फाडले जाताना बघायला मिळाले. सन्माननीय अपवाद वगळता प्रसिद्ध खेळाडू, कलाकार, इतर प्रसिद्ध व्यक्ती तसेच निवृत्तीनंतर सुखासीन जीवन जगणाऱ्या बहुतेकांनी एक तर मौन साधले किंवा सत्ताधिशांसमोर लोटांगण तरी घातले. एरवी मोठमोठ्या बाता मारणारे तथाकथित व्याख्याते, समाजनिर्मितीचा कैवार घेतलेले प्रबोधनकार, विचारांची मक्तेदारी वागवणारे साहित्यिक, ज्येष्ठ माध्यमकर्मी अशा अनेकांची वाचा या आंदोलनामुळे बसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा लोकांकडून युवा पिढीने फार अपेक्षा ठेवल्या नाहीत. आपली लढाई ते आपल्या भरवशावरच लढले आणि यशस्वीसुद्धा झाले. हे विचारांचे युद्ध आहे, हा अपेक्षांचा लढा आहे, ही उज्ज्वल भविष्यासाठीची युवा चळवळ आहे. तिला पाठिंबा द्यायचा नसेल, तर निदान अपशकुन करण्याचे पातक तरी कोणी करू नये. 

नवी पिढी, नवे अवकाश 

कुठलीही युवा चळवळ वयस्क माणसांच्या पचनी लवकर पडत नाही. यातील बहुतांश वर्ग शासकीय लाभाच्या शिदोरीच्या अपेक्षेने लाचार झालेला असेल, तर विरोधात ब्र सुद्धा काढण्याची जोखीम ते पत्करत नाहीत. विचारांचा लढा पिढीनुसार बदलत जातो, असे म्हणतात. यापूर्वीही प्रत्येक ‘जनरेशन’च्या उदयानंतर जगभरात वेगवेगळ्या उलथापालथी घडलेल्या बघायला​ मिळाल्या आहेत. द ग्रेटेस्ट जनरेशन : जन्म १९०१–१९२७, द सायलेंट जनरेशन : जन्म १९२८–१९४५, बेबी बूमर्स : जन्म १९४६–१९६४, जनरेशन एक्स : जन्म १९६५–१९८०,, मिलेनियल्स (जनरेशन वाय) : जन्म १९८१–१९९६, जनरेशन झेड : जन्म १९९७–२०१२, जनरेशन अल्फा : जन्म २०१३–२०२४, जनरेशन बीटा : जन्म २०२५–२०३९ अशा जनरेशन आतापर्यंत बघायला मिळाल्या आहेत. प्रत्येक जनरेशन किंवा पिढीला स्वतंत्र पार्श्वभूमी आहे. पैकी जनरेशन अल्फा आणि बिटा या किशाेर आणि बाल्यावस्थेत आहेत. मात्र ऐन तारुण्याच्या जोशात असलेली जनरेशन झेड किंवा ‘जेन झी’ सध्या जगभर लक्ष वेधून घेताना दिसते. नव्या कल्पना, नव्या व्यवस्थेचा आग्रह त्यांच्याकडून होताना दिसतो. गेल्या काही वर्षांत जगातील काही देशांमध्ये ज्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी परिवर्तन घडवून आणले, ते याच पिढीचे प्रतिनिधी. आपल्याहून मोठ्या असलेल्या पिढ्यांना ते काही तरी सांगू इच्छितात. त्यांचे अवकाश इतरांहून भिन्न आहे. सरधोपट पारंपरिक मानसिकतेतून त्यांना आपल्या मनाप्रमाणे वाकविण्याचा प्रयत्न झाला, तर ते दुप्पट त्वेषाने अंगावर येतात. त्यांच्याहून काहीशी ‘वरिष्ठ’ असणारी ‘मिलेनियल्स’ पिढी या दोन टोकांना सांधणारा दुवा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी परंपरागत उपायांसाठी ते आग्रही राहतात. युवा पिढीला फारसा दोष न देता काही काळ प्रतीक्षा करतात आणि ‘जेन झी’चे विचार पटू लागले की, त्यांच्या समर्थनातही उतरतात. ‘नीट’ परीक्षेवरून दिल्लीत आणि देशभरात सुरू असलेल्या रणकंदनात नेमके हेच झाले आहे. या दोन्ही पिढ्यांनी मिळून प्रस्थापितांच्या नाकीनऊ आणले आहेत. ही ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली नाही, तर स्थिती आणखी चिघळत जाणार, हे वेगळे सांगायला नको. त्यासाठी योग्य वेळी हुशारी दाखविण्यातच सर्वांचे हित आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले, हे चांगलेच झाले. 

पेरले तेच उगवले...

दिल्लीतील आंदोलनात युवा पिढीने व्यक्त होताना वापरलेली भाषा हा काहींनी कळीचा मुद्दा बनविला आहे. म्हणे या मुलांची भाषा योग्य नाही, त्यांना संस्कार नाहीत, थोडक्यात त्यांना अक्कल नाही. शिवराळ भाषा वापरून या मुलांनी आपली खदखद व्यक्त केली. पण ही वेळ त्यांच्यावर कोणामुळे आली? त्यांना हे शब्द वापरण्याचे धाडस कोणामुळे झाले? आक्षेपार्ह, कमरेखालील भाषा वापरून भारतीय राजकारणात भाषिक हीनतेची पातळी कोणी गाठली? या प्रश्नांची उत्तरे युवा पिढीला आरो​पीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांनी शोधायला हवी. जो द्वेषाचा भडका गेल्या दशकाहून अधिक काळ धगधगत ठेवण्यात आला आहे, त्याचीच ही फळे आहेत. त्यामुळे या पिढीला सोशल मीडियावर कितीही उपदेशाचे डोस पाजले, तरी ते याच भाषेत व्यक्त होणार. कारण ज्यांना जाग आणायची आहे, त्यांच्यापैकी काहींनी​ याच भाषेच्या आडून आपले ध्येय साध्य केले. बुधवारी पणजीतील एका मोर्चात दिलेल्या 'नीम का पत्ता कडवा है' या घोषणेबद्दल पत्रकारांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारलेला जाब हे याच ‘जनरेशन गॅप’चेच प्रातिनिधिक उदाहरण. ही नवी पिढी प्रश्न उपस्थित करते, तिला उत्तरे हवी आहेत. ती मिळाली नाहीत, तर ती वदवून घेण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यामुळे एवढी वर्षे थातूरमातूर युक्तिवाद करून वेळ मारून नेण्याचे दिवस संपले आहेत, याची सर्वांनीच नोंद घ्यायला हवी. 

एककल्लीपणाला चपराक

चुकीच्या गोष्टींसाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे लोकशाहीचे लक्षण. पण त्यालाच हरताळ फासला जातो. अशा लोकांचा धार्मिक मुद्द्यांवरून बुद्धिभेद करूनही ते ऐकत नाहीत, असे ध्यानात आले की, त्यांच्यावर दहशतवादी, खलिस्तानी, डावे, अर्बन नक्षली, पाकिस्तानी एजंट, फॉरेन फंडिंग घेणारे असे शिक्के मारले जातात. चौकशीचा ससेमिरा लावला जातो. एका अदृश्य भीतीने ग्रासलेल्या लोकांकडून भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो. सोशल मीडियाचा वापर अस्त्र म्हणून केला जातो. त्याला अनेक जण फशी पडतात. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने या दहशतीच्या फुग्याला टाचणी मारून त्याची हवाच काढून घेतली. सोशल मीडियाने तर पार दाणादाण उडवून दिली. भारतीय राजकारणाला एक स्पष्ट संदेश या चळवळीने दिला. तो समजून घेणे सत्तेतील आणि विरोधातील पक्षांसाठी हितावह ठरेल. अन्यथा युवकांनी व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारला आहेच, तो सर्वांच्याच मुळावर यायला वेळ  लागणार नाही.

- सचिन खुटवळकर, (लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक आहेत.)