सिव्हिल सर्व्हिसेस असो वा इतर शासकीय भरती, उत्तम पद आणि क्षमता असूनही शेकडो उच्चविद्याविभूषित उमेदवार पहिल्याच फेरीत बाहेर का पडतात? यामागे मार्गदर्शनाचा अभाव, ऐनवेळी केलेली तयारी की परीक्षेच्या स्वरूपाची अपुरी माहिती जबाबदार आहे? स्क्रीनिंग टेस्टचे नेमके स्वरूप, त्यात विचारले जाणारे विषय आणि या अपयशामागची खरी कारणे

अलीकडेच गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विभागाने गोवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रवेश परीक्षांसाठी चार दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्याची संधी मला प्राप्त झालेली होती. खरंतर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम गोवा सरकारतर्फे सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेमध्ये गोमंतकीय उच्चविद्याविभूषित विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी देखील सहभागी होते. यामध्ये काही वकील होते, काही अभियंते होते, काही शिक्षक तर काही इतर सरकारी अधिकारी देखील होते. या सर्वांनी जेएसओच्या ३८ जागांसाठी अर्ज भरलेले होते. जेएसओ म्हणजे ज्युनिअर स्केल ऑफिसर अर्थात डेप्युटी कलेक्टरची पोस्ट. हे पदाधिकारी म्हणजे गोव्यातील 'आयएएस' समकक्ष उमेदवार, यांची निवड गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून केली जाते. कमिशन परीक्षा घेते व चार स्तरातून ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अथवा उमेदवार यांची मुलाखत होऊन पोस्टिंग होते. प्रि-स्क्रीनिंग, मग स्क्रीनिंग, मग लेखी परीक्षा आणि शेवटी तोंडी परीक्षा अशा क्रमाने निवड असते. ही परीक्षा इतर पोस्टच्या परीक्षांपेक्षा अवघड असते, कारण यूपीएससी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा जसाच्या तसा जीपीएससीला लागू पडतो. गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगातर्फे सुद्धा अलीकडेच भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ग्रुप 'सी' आणि ग्रुप 'डी' साठीच्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट १ आणि स्क्रीनिंग टेस्ट २ असे स्तर असतात. विशिष्ट शासकीय खात्यासाठी जर पोस्ट भरायच्या असतील तर त्या खात्याविषयीचे प्रश्न त्या त्या परीक्षेत विचारले जातात. याला 'कोअर सब्जेक्ट' म्हटले जाते. गंमत अशी आहे की पुढील स्तरावर जाण्यासाठी प्रथम स्क्रीनिंग / प्रि-स्क्रीनिंग प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, मगच पुढे जाता येते.
हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात पण मोजकेच विद्यार्थी ती पास होऊन पुढच्या स्तराला निवडले जातात किंवा पात्र होतात. प्रि-स्क्रीनिंग अथवा स्क्रीनिंग परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंग्रजी व त्याचे व्याकरण, गणितीय अर्थात न्यूमरिकल अॅबिलिटी, रिझनिंग आणि जनरल अॅप्टिट्यूड असे विषय असतात. ६० मार्कांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. मल्टिपल चॉईस प्रश्न असतात. साधारणपणे ७५ मिनिटांत हे प्रश्न सोडवायचे असतात. चांगली गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे यूपीएससीसारखे दडपण नसते. पहिले १० प्रश्न छोटा इंग्रजी उतारा आणि त्यावरील प्रश्न अशा स्वरूपात असतात. मग समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द त्यावर प्रश्न असतात, ज्याला सिनॉनिम आणि अँटोनिम असे म्हणतात. काही ठिकाणी वाक्याचे व्याकरण दुरुस्त करा असे प्रश्न असतात. काही इडिओम तसेच म्हणींचा अन्वयार्थ विचारला जातो. या ठिकाणी थोडा नीट प्रयत्न केल्यास गुण पाडता येतात किंवा येऊ शकतात. मार्टिन्स यांचे 'वर्ड पॉवर' पुस्तक रेफर केल्यास याचा खूप फायदा होतो.
त्यानंतर गणितीय प्रश्न असतात. साधारणपणे १० वी मध्ये जसे प्रश्न असायचे तसे प्रश्न विचारले जातात. उदा. ४ माणसे ८ दिवसांत १ एकर शेत नांगरतात, तर ६ माणसे तेच शेत किती दिवसांत नांगरतील? एक ट्रेन ताशी ८० किमी/तास वेगाने जातेय व दुसरी रेल्वे विरुद्ध दिशेने ६० किमी/तास वेगाने समांतर रुळावरून येत असेल तर किती वेळात दोन्ही एकमेकांना क्रॉस करतील? असे प्रश्न हमखास असतात. प्रश्न सोपे असतात परंतु आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहीत नसतात आणि सराव देखील नसतो, त्यामुळे खूपदा येथे मार्क जातात आणि वेळ देखील जातो. यासाठी सराव वर्ग लावल्यास हे ज्ञान मिळू शकते.
काही गणिते रिलेशनशिपबद्दल असतात. 'पप्पूची आई वंदना असून तिचा भाचा सुरेश आहे, तर सुरेश हा पप्पूच्या मावस बहिणीचा मुलगा आहे, तर मावस बहिणीचे आणि वंदनाचे नाते काय?' अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. सिरिज प्रकारात 'मिसिंग नंबर' शोधून काढायचे असतात, 'ऑड वन आऊट'नुसार ऑड गोष्टी शोधायच्या असतात. काही प्रश्नांना लॉजिकनुसार उत्तरे द्यावी लागतात. त्या उत्तराला काहीतरी लॉजिक असावे लागते. खूपदा विद्यार्थी येथे अपयशी ठरतात, कारण 'आली परीक्षा - भरा फॉर्म' यानुसार या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. किमान १२ महिने आधी याची व्यवस्थित तयारी करून उतरावे लागते. मुलांची तयारी हा एक मोठा इश्यू आहे. यात असे विषय शिकवणारे कोचिंग क्लास देखील कुठेही उपलब्ध नसतात. प्रि-स्क्रीनिंगचे नीट नियोजन केले तर १ वर्षाने येणाऱ्या परीक्षेत यश मिळण्याचे खूप चान्सेस असतात. इथेच बाहेर फेकले गेले तर पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रि-स्क्रीनिंग / स्क्रीनिंगसाठी स्वतःला १२ महिने आधी सज्ज करून मगच यात उतरावे.
- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)