गोव्यातील मोपा विमानतळामुळे सीमावर्ती भागातील जमिनींवर परप्रांतीयांची नजर गेली. तिथल्या जमिनींत त्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. या गुंतवणूकदारांत गोव्यातील अनेक जण आहेत. एके काळी मागास म्हणून गणला जाणारा दोडामार्ग तालुका आज गुंतवणुकीचा राजमार्ग बनला आहे.

महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी दोडामार्ग हा दक्षिणेकडील शेवटचा तालुका. गोव्याच्या पेडणे आणि डिचोली तालुक्याला खेटून असलेला हा तालुका सध्या महाराष्ट्रात आणि गोव्यातही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी हत्तींचा उपद्रव किंवा दोडामार्ग तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण हे चर्चेचे मुद्दे नाहीत, तर दोडामार्गमधील जमिनींची खरेदी-विक्री आणि परप्रांतीय धनदांडग्यांचा वाढता वावर हा कळीचा मुद्दा बनला आहे. ‘गोव्यातील मोपा विमानतळामुळे या तालुक्यातील जमिनींना साेन्याचा भाव आला असून कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत. या व्यवहारांत पारदर्शकता नाही,’ असा मुद्दा इस्लामपूर-सांगलीचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील विधानसभेत मांडला. त्यावर ‘एका समितीमार्फत सर्व व्यवहारांची तीन महिन्यांत पडताळणी करू,’ असे आश्वासन महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यामुळे दोडामार्गमधील जमीन व्यवहार आणि तेथील जमिनींची खरेदी नेमकी कोण करतात, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
२६ जून १९९९ रोजी सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून कसई-दोडामार्ग तालुक्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या परिसराकडे इतर भागातील जनतेचे लक्ष गेले. पेडणे तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीला चालना मिळाली आणि दोडामार्गमधील गोव्याच्या सीमावर्ती भागातील गावांत हालचाली वाढू लागल्या. गोव्यातील जमिनींच्या तुलनेत स्वस्त दराने या भागात जमिनी उपलब्ध असल्याने परप्रांतातील लोकांनी गोव्याचा नाद सोडून दोडामार्गकडे लक्ष केंद्रित केले. २०२३च्या प्रारंभी मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर इथल्या जमिनींची मागणी आणखी वाढली. सासोली हा त्यातील ‘हॉट स्पॉट’. आमदार पाटील यांच्या आरोपाप्रमाणे, या गावात बेकायदेशीरपणे कागदपत्रे करून जमिनी लाटण्यात आल्या. त्यात किती तथ्य आहे ते चौकशी समितीच्या अहवालानंतर समोर येईलच. पण सासोलीसह गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या आणखी काही गावांतील जमीन व्यवहारांचीही चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. विशेषत: सत्तरी, डिचोली तालुक्यालगत असलेल्या विर्डी, तळेखोल, आयी, वझरे, माटणे या गावांतील जमिनींची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. यातील एका गावात तर काही वर्षांपूर्वी शहरी धाटणीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात राहणारे सर्व जण परप्रांतीय. ते दोडामार्गात का आले, याची कारणे अनेक आहेत. त्यातील एक प्रमुख कारण इथला निसर्गरम्य परिसर. गोव्यातील बांबोळीचे जीएमसी हॉस्पिटल, थिवी रेल्वे स्थानक, मोपा विमानतळ अशा गोष्टी ३० ते ५० किमीच्या परिघात येतात. शिवाय दोडामार्गची बाजारपेठ अवघ्या काही किलोमीटर अंतरावर. यामुळे परप्रांतीयांनी आपले ‘सेकंड होम’ या भागात निवडले. उत्तर भारतात, विशेषत: दिल्ली, नोयडा परिसरात लोकसंख्येची घनता प्रचंड आहे. बेसुमार औद्योगिकीकरण, धोक्याची पातळी ओलांडलेले वायू प्रदूषण यामुळे हा परिसर आजारी, वयस्क लोकांच्या राहणीमानास अनुकूल नाही. निवृत्तीकडे झुकलेल्या अशा अनेक धनिकांनी दोडामार्गच्या दिशेने कूच केले.
कोट्यवधींची उलाढाल, अनेक जण मालामाल
कोणत्याही भागातील कुठल्याही बऱ्यावाईट स्थित्यंतरास तिथला भूमिपुत्रच कारणीभूत असताे, असे म्हटले जाते. दोडामार्गच्या बाबतीतही काहीच वेगळे नाही. अनेकांनी जमिनींच्या खरेदी-विक्रीत मध्यस्थाची भूमिका पत्करली आहे. अमूक एक रक्कम द्या, सर्व कायदेशीर सोपस्कार विनाअडथळा करून मिळतील, असा सरळसोपा मामला. त्यातून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. इतकी वर्षे पडीक असलेल्या जमिनींना लाखोंचा भाव आल्यामुळे जमीनमालक सुखावले. अनेकांनी मागचापुढचा विचार न करता वडिलोपार्जित जमिनींची सौदेबाजी केली. त्या पैशांतून इमले बांधले, गाड्या घेतल्या, व्यवसाय उभारले. ज्या भागात कुठलाही उद्योग नाही, कसल्याही रोजगाराची हमी नाही, स्वयंरोजगाराची साधने मर्यादित, आरोग्य, रस्ते, शिक्षण अशा सर्व आघाड्यांवर मर्यादांचा सामना करणाऱ्या लोकांपैकी अनेकांना अर्थप्राप्तीचा हा नवा मार्ग खुणावू लागला. त्यातूनच कोट्यवधींच्या व्यवहारांतून जमिनींची विक्री होऊ लागली. या व्यवहारांमुळे परप्रांतीय उरावर बसत आहेत. निसर्गरम्य परिसरात बंगले, रिसॉर्ट, फार्म हाऊसेस, नवनव्या रहिवासी इमारती उभ्या राहत आहेत. तिथल्या भूमिपुत्राला अजून त्याची झळ बसलेली नाही. ती बसण्यासाठी बरीच वर्षे जावी लागतील. पण तोपर्यंत हातातून हुकमाचे सर्व एक्के निसटलेले असतील. जे गोव्यातील भूमिपुत्राला आज भोगावे लागत आहे, तेच तिथल्या लोकांनाही कधी ना कधी भोगावे लागेल.
गोव्यातील धनिकांचीही गुंतवणूक
दाेडामार्गमधील जमिनींत गोव्यातील शेकडो जणांची गुंतवणूक आहे, असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. तिथल्या महसुली नोंदी पडताळून पाहिल्या, तर वस्तुस्थिती ध्यानात येईल. गौण खनिजांच्या व्यवसायातील संधी, बागायतींमधून मिळणारे उत्पन्न तसेच निवृत्तीनंतरचे जीवन शांततेत व्यतित करण्यासाठी ‘सेकंड होम’ अशा अनेक कारणांमुळे गोव्यातील धनिकांनी या भागात जमिनी घेतल्या आहेत. तिळारीसारख्या भागात काहींनी काजू, मसाल्यांची लागवड करून फार्म हाऊसेस बांधली आहेत. महिन्यातून काही वेळा त्यांची नियमित ये-जा असते. त्यामुळे गोवा आणि दोडामार्ग हे केवळ दोन राज्यांचे कायदेशीर भाग राहिले आहेत. जमिनींतील गोवेकरांच्या गुंतवणुकीचा हा वेग असाच राहिला, तर कदाचित आणखी काही वर्षांनी दोडामार्ग तालुक्याचे विलिनीकरण गोव्यात करण्याची मागणीही करण्याची वेळ येणार नाही.
गुप्ता, जैन बनले ‘शेतकरी’
महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या शेतकरी किंवा ज्यांच्या कुटुंबाचा शेतीचा इतिहास आहे असे लोकच शेतजमीन खरेदी करू शकतात. इतर व्यक्ती थेट शेतजमीन खरेदी करू शकत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ते अकृषिक (एनए) जमीन विकत घेऊ शकतात. त्यामुळे परराज्यातील लोकांनी या भागात जमिनी खरेदी करताना आपण शेतकरी असल्याचे महसूल खात्याला आधी पटवून दिले. यात गुप्ता, जैन अशी सहसा शेतकरीवर्गात न आढळणारी नावे दिसून येतात. इथे जमिनी विकत घेतलेल्या गोव्यातीलही अनेकांना शेतीचा वारसा नाही किंवा त्यांच्या पूर्वजांच्या गोव्यात शेतजमिनी नाहीत. त्यामुळे जमीन व्यवहारांत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आमदार पाटील यांचा आराेप तथ्यहीन म्हणणे चुकीचे ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तालुक्यातील प्रश्न सांगली जिल्ह्यातील आमदार विधानसभेत का मांडतो, या प्रश्नातच या व्यवहारांना कोणाचा वरदहस्त आहे, याचे उत्तर मिळेल.
प्लॉट विक्रीतून परप्रांतीयांना फायदा
दहा-पंधरा वर्षांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील मोक्याच्या गावांत जमिनी खरेदी करताना काही हजारांच्या मोलाने एकरी खरेदी करण्यात आली. मधल्या काळात मोपा विमानतळ झाला आणि मोपाचा संदर्भ देऊन प्रचंड जाहिरातबाजी करून या जमिनींचे प्लॉट करून ते लाखोंच्या किमतीने विकण्यात आले. आधी जमिनी विकत असताना मिळणारा पैसा काही जणांना मोठा वाटला. मात्र काही वर्षे उलटल्यानंतर प्लॉटची लाखोंच्या घरात होणारी विक्री पाहून ज्यांनी जमिनी विकल्या, त्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहिला नाही. या स्थितीतही आशेचा थोडाफार किरण कोलझरसारख्या गावाच्या निर्णयातून दिसला. गावातील जमीन गावातील व्यक्ती अथवा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशिवाय अन्य कोणालाही न विकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी केला. यातून इतर गावांनीही बोध घेतला, तरच हे दुष्टचक्र थांबू शकेल.
पूर्वजांचा ठेवा परप्रांतीयांच्या घशात
दोडामार्ग हा कृषीसंपन्न आणि निसर्गाचे भरभरून वरदान मिळालेला तळकोकणातील हिरवाकंच पाचू. या भागातील वनराई, शेतजमिनी इथल्या पूर्वजांनी जीवापाड जपल्या. कमी संसाधनांत राहूनही त्यांनी भूमातेशी प्रतारणा केली नाही. मात्र अलीकडच्या काही वर्षांत सहज मिळणाऱ्या पैशांसाठी भूमिपुत्र म्हणवणाऱ्यांनी याच भूमातेला बाजारात उभी केली आहे. या क्षेत्रातील खल प्रवृत्तींकडून अशा प्रकारे कोंडी केली जाते की, जमीन विकायची इच्छा नसणारा जमिनीचा सहमालकही अखेरीस राजी होतो. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस जटील होत जाणार आहे. इथे आता होणारा गुंतवणुकीचा ओघ भविष्यात विनाशकारी प्रकल्प माथी मारेल हे नक्की. हे चक्र थांबविणे केवळ भूमिपुत्रांना शक्य आहे. पण तेही हतबल आहेत. एका नाटकातील ‘आम्ही लढतोय राजासाठी आणि राजा आहे शत्रूला फितूर’ या ओळी इथे प्रत्यक्षात घडताना दिसतात. कालाय तस्मै नम:!
सचिन खुटवळकर
(लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक आहेत.)