गर्द जंगलाने वेढलेल्या डांगोरी वाडीतील अर्जुना हा शिकारीतला हुकमी एक्का होता. लक्ष्मीचा विरोध आणि अपशकुनाचा इशारा डावलून, तो एका रात्री जीवावर बेतणाऱ्या मोठ्या शिकारीसाठी जंगलात रवाना होतो.

डांगोरी... नावासारखंच डोंगरात, कड्याकपाऱ्यांच्या खाली आठ-दहा घरांचं गाव. गाव कसलं, छोटीशी वाडी! वाडीच्या अवतीभवती पावसाच्या पाण्यावर येणारी शेती. उन्हाळी पीक काढायला वाव नव्हता. तांबडी माती पावसाच्या पाण्यापुरती ओली व्हायची. उन्हाळा कोरडा खट्ट जायचा. एका व्हाळाला मात्र जिवंत झरा. त्यावर सर्वांची तहान भागायची. डोंगरातून नळ घालून आणलेलं पाणी पावसाळ्यात मुसंड्या मारून नळ्यांतून बाहेर पडायचं, तेच पाणी उन्हाळ्यात मे महिना येईपर्यंत बोटाएवढी धार बनून राहायचं.
तेवढीच पोटापुरती शेती, चार जनावरं, पाच-सहा शेळ्या आणि ढीगभर कोंबड्या असं काहीसं प्रत्येकाच्या घरात. वाडीत कोकरं आणि वासरं कुठंही फिरायची. कधी कधी परड्यात लावलेलं खाऊन टाकायची. मग काय, भांडणाचा सूर कानावर पडल्याशिवाय तो दिवस सरत नसायचा. सकाळ-संध्याकाळ राखण्या गुरं घेऊन वेगवेगळं रान पिंजून काढायचा. पावसाळा आला की मात्र रानातून पाय निघायचा नाही.
असं हे डांगोरी..! पण अजून एक राहीलंच सांगायचं..! गावाला जंगल चिक्कार..! गर्द झाडी, आडव्या-तिडव्या वाढलेल्या वेली आणि तेवढीच जंगली जनावरं. मग काय, शिकार हे एक इथलं खूळ... प्रत्येकाच्या डोक्यात घर करून बसलेलं. घराघरात जुन्या बनावटीच्या, बार भरायच्या बंदुका. रानात राहत असल्यामुळे तिची गरज पडायची. त्यामुळे फॉरेस्टर साहेबांनी दुर्लक्ष केलेलं. रानडुक्करं तर सारं पीक खाऊन टाकायची.
याच वाडीत शिवा आणि भिवा त्यांच्या आईसंगं शेतात राबायचे. लक्ष्मी म्हणजेच त्यांची आई, सगळे तिला लक्षुमी म्हणायचे. पोरांचा बा अर्जुना, पोरांना लहान वयातच सोडून गेलेला. प्रपंच सोडून गेलेला. पोरं आईसोबत उन्हा-तान्हात राबायची. बापा मधला शिकारीचा नाद या पोरांमध्ये होता. वाडीतल्या शाम्याने लक्षुमीच्या नकळत या पोरांना शिकारीच्या नादाला लावलं होतं. कारणही तसंच होतं, लक्षुमीला शिकारीला गेलेलं चालायचं नाही; अर्जुना या शिकारीपायीच दगावला होता.
अर्जुना शिकारीत तरबेज...! जनावर अंगावर आलं तर समोरून बार घालायचा... जनावर पडणार म्हणजे पडणार! दोन-तीन दिवसांत घरात रानातलं मटण चुकायचं नाही. चुलीवरची भांडी उतरायच्या आत काहीतरी शिकार घरात यायचीच. आजूबाजूलाही अर्जुनाचं नाव होतं. संध्याकाळी अंधार पडायला झाला की खांद्यावर बंदूक घेऊन अंधारात गायब व्हायचा. येताना रानकोंबडं, एखादा ससा, कवडं, ल्हावऱ्या आणि साधलंच तर कधी कधी भेकर घेऊनच माघारी फिरायचा. घरात आला म्हणजे त्याच्या खांद्यावरच्या फटकुऱ्यातून हे सगळं बाहेर पडायचं आणि लक्षुमी रांधायच्या कामाला लाबायची. तिलाही याचा कधी कंटाळा आला नाही. पोरंही सगळं बघत मोठी होत होती.
एकदा अशीच सगळी तयारी करून अर्जुना शिकारीला चालला होता. लक्षुमीला का कुणास ठाऊक, आज अर्जुनाने जाऊ नये असंच वाटत होतं. म्हणालीही ती,
"आवं, ऐकतासा काय?" भेदरलेल्या आवाजात ती बोलली.
अर्जुना तिच्यावर खेकसलाच, "भाईर पडताना कसला मोडा घालतीस!" डोळे वटारून ओरडला.
"कितीदा सांगितलंय, तरीबी हाईच का?"
"बोल काय ते लवकर, मला जाग्यावर पोहोचायला पाहिजे!"
जरा घाबऱ्या आवाजात लक्षुमी बोलली, आवाज कातरल्यासारखा झाला, "आत्ताच माझ्या अंगावर पाल पडली वं..! म्हणून भ्या वाटलं..! आज नाय गेलं तर चालणार नाही काय..? असं अंगावर पालीचं पडणं बरं नव्हं.. जीव घाबरा झाला..!"
अर्जुना पुन्हा ओरडला, "लै शहाणपण करू नको.. किती दिवसांनी आज मोठ्ठा बार भरलाय. तो काय असाच जाऊ देणार व्हय? आलोच मी, चुलीला जळण घाल!" असं म्हणत तो बाहेर पडलासुद्धा.
जंगलात लपून बसलेल्या अर्जुनाचा सामना अचानक एका हिंस्त्र बिबट्याशी होतो. ऐनवेळी बंदुकीचा बार न उडाल्याने त्याचा करुण अंत होतो आणि संपूर्ण वाडीवर शोककळा पसरते.
(क्रमश:)
प्रा. सागर डवरी, हरमल