प्राणी आणि पक्षी आपल्या पिल्लांना निरीक्षण, खेळ, अनुभव आणि संरक्षणाच्या माध्यमातून जगण्याची कौशल्ये शिकवतात. या कौशल्यांमुळे पिल्ले स्वतंत्र बनतात आणि जंगलातील कठीण परिस्थितीतही यशस्वीपणे आपले जीवन जगू शकतात.

जगभरात पश्चिम घाटाला भारतातील जैवविविधतेने नटलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळून येतात. प्रत्येक वन्यजीवाला अन्न शोधणे, शत्रू प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करणे व आपली पिढी पुढे नेणे आवश्यक असते. फक्त पिल्लांना जन्म दिल्याने जबाबदारी संपत नसते, तर पिल्लांचे भविष्य सुरक्षित करणेही पालकांसाठी तितकेच महत्त्वाचे असते. प्राण्यांना हे कौशल्य काही प्रमाणात जन्मतः मिळालेले असते, तर अनेक गोष्टी ते आपल्या आई-वडिलांकडून आणि समूहातील इतर सदस्यांकडून शिकत असतात. जी गोष्ट सामाजिक प्राणी म्हणजे मनुष्याला लागू पडते, तीच गोष्ट वन्यप्राण्यालादेखील लागू पडते. माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांची पिल्लेदेखील अनुकरणप्रिय असतात. ती कशी, ते आपण पश्चिम घाटाशी निगडित असलेल्या वन्यजीवांच्या उदाहरणासमवेत समजूया.
हत्ती किंवा गजराज श्रीगणेशाच्या आख्यायिकेमुळे जितका प्रसिद्ध आहे, तितकाच कोकणपट्टीच्या प्रदेशात पिकाची नासाडी करत फिरणाऱ्या ओंकार हत्तीमुळेदेखील तो प्रसिद्ध आहे. हत्तीची पिल्ले नेहमी आपल्या आईबरोबर आणि कळपासोबत फिरतात. प्रौढ/वयस्क हत्ती पिल्लांना पाण्याचे स्रोत आणि सुरक्षित मार्ग शोधायला शिकवतात. धोक्याची शंका आल्यास काय करायचे हेसुद्धा ते आपल्या पिल्लांना शिकवत असतात. एखादा शिकारी प्राणी जवळ आल्यास हत्ती पिल्लांना समूहाच्या मधोमध घेत त्यांना संरक्षण देतात. अशा अनुभवातून पिल्लांना सावधगिरीचे धडे मिळत असतात.
येथील शेकरू (भारतीय विशाल खार) तर सर्वांच्या परिचयाचा. सत्तरी तालुक्यातील शेतकरी ह्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाल्याच्या बातम्या अधूनमधून वाचनात येत असतात. हे प्राणी नारळ खातात व कोवळ्या सुपारीतील रस पिऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेकरूची पिल्ले झाडांवर सुरक्षितपणे चढायचे, फांद्यांवर कशी हालचाल करायची, अन्न कसे शोधायचे याचे प्रशिक्षण आपल्या आईकडून घेत असतात.
पश्चिम घाटात आढळणारा सिंहशेपटा माकड (लायन मकाव) हा एक दुर्मिळ माकड आहे. हे माकड जास्तीत जास्त केरळमधील सह्याद्रीच्या रांगेत आढळून येतात. सिंहशेपट्या माकडे वायनाड, पेरियार, थेक्कडीच्या संरक्षित जंगलात मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. सिंहशेपटा माकडाची पिल्ले दिसायला खूप गोंडस असतात. आपल्या आईच्या मागे मागे फिरत ही जंगलातील जीवन समजून घेतात. निरीक्षण हा त्यांच्या शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कोणती फळे खाण्यास योग्य आहेत, कोणती झाडे सुरक्षित आहेत, या झाडावरून त्या झाडावर उड्या कशा मारायच्या हे ते निरीक्षणातून शिकत असतात.
निलगिरी लंगूर हा असाच आणखी एक माकड आहे, ज्याची पिल्ले खेळातून अनेक गोष्टी शिकत असतात. झाडावर चढणे, उड्या मारणे आणि समूहात राहण्याचे नियम ती खेळताना शिकतात. त्यामुळे त्यांची शारीरिक ताकद आणि आत्मविश्वासही वाढतो.
धोल किंवा रानकुत्रा हा पश्चिम घाटातील एक कुशल शिकारी प्राणी आहे. हे प्राणी समूहाने शिकार करतात. रानकुत्र्याची लहान पिल्ले सुरुवातीला फक्त निरीक्षण करतात. प्रौढ धोल शिकार कशी शोधतात, तिचा पाठलाग कसा करतात आणि एकमेकांना कशी मदत करतात हे पाहून पिल्ले शिकत असतात. हळूहळू ती स्वतः शिकारीत सहभागी होऊन शिकार करू लागतात.
वनात राहणारा पण आता गावातच नव्हे तर शहरातही दहशत माजवणारा गोव्याचा राज्यप्राणी गवारेडा हा पश्चिम घाटातील सर्वात मोठ्या वन्यप्राण्यांपैकी एक आहे. गव्याची पिल्ले कळपाबरोबर राहतात. मोठे गवे त्यांना धोक्याची चिन्हे ओळखायला शिकवतात.
धनेश (मलाबार हॉर्नबिल) हा सुंदर पक्षी आपल्या पिल्लांना उडण्याचे आणि अन्न शोधण्याचे धडे देतो. सुरुवातीला पालक आपल्या पिल्लांना अन्न पुरवतात. कालांतराने पिल्ले स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा चुका होतात, पण पालक त्यांना सावरत, चुका सुधारत जीवनाचे धडे देतात.
प्राणी आणि पक्षी आपल्या पिल्लांना निरीक्षण, खेळ, अनुभव आणि संरक्षणाच्या माध्यमातून जगण्याची कौशल्ये शिकवतात. या कौशल्यांमुळे पिल्ले स्वतंत्र बनतात आणि जंगलातील कठीण परिस्थितीतही यशस्वीपणे आपले जीवन जगू शकतात.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)