
गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यात सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्याम अनंत गांवकर हे गोव्यातील एक अष्टपैलू, अभ्यासू व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्रातील अभ्यासू लेखक डॉ. लहू गायकवाड यांच्या 'शिवकालीन जलनिती' या मूळ मराठी पुस्तिकेचा 'शिवकालीन उदकाचे व्यवस्थापन' या शीर्षकाखाली त्यांनी केलेला कोंकणी अनुवाद हे गोव्यासाठी व गोमंतकीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य आहे. 'पाण्यासाठी दिशा आम्हा फिरविशी दाहीदिशा' असे म्हणावे अशी आजची देशातील जलव्यवस्थेबाबतची भयावह परिस्थिती आहे.
मानवी जीवनात पिण्याचे शुद्ध पाणी नसेल, तर कितीही सुबत्ता, ऐश्वर्य, शक्ती, सामर्थ्य व बुद्धिमत्ता असली तरी ती व्यर्थ आहे; कारण पाणी हाच जीवनाचा मूलाधार आहे. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती करून अवकाशात झेप घेतली आहे. 'दुनिया मेरी मुठ्ठी में' अशी आज परिस्थिती असली, तरीही जीवनात सर्वात अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत आपल्याकडे कुठलेही नियोजन वा व्यवस्थापन नाही. फिनलंडसारखा एक चिमुकला देश आज जलव्यवस्थापनाबाबत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, आणि अर्थातच त्यामुळेच तो जगातील सर्वात सुखी व आनंदी देश म्हणूनही अग्रस्थानी आहे. त्याउलट आपल्या 'मेरा भारत महान' देशाची अवस्था जलव्यवस्थापनाबाबत जगात तब्बल ५३ व्या क्रमांकावर आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण रात्रंदिवस गुणवंत, प्रज्ञावंत आणि जगातील सर्वोत्तम जाणता राजा म्हणून उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्यावेळी विज्ञानाच्या बाबतीत नन्नाचा पाढा होता जगाला सर्वोत्कृष्ट जलनितीचा आविष्कार घडविला. तब्बल १६७० साली भरतगडाच्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याची योजना आखली; परंतु तिथे पाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही हे समजल्यावर त्यांनी त्वरित किल्ला बांधण्याची योजना तडकाफडकी रद्द केली. यावरून किल्ले सुरक्षा व्यवस्थेपेक्षाही सर्वात प्रथम जलनियोजनाबाबत शिवाजी महाराज किती काटेकोर होते, याची प्रचिती येते.
पण कालांतराने याच जागेवर पाण्याचा झरा सापडल्याची बातमी फोंड सावंतांनी महाराजांना दिल्यावर, लगेचच महाराजांनी पुन्हा तिथे किल्ला बांधण्याचे ठरवले. अर्थातच या किल्ल्यावर जनजीवन प्रस्थापित होणार असल्याने, दहा घरांमागे प्रत्येकी एक विहीर उभारण्याचे त्यांनी आदेश दिले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही आपल्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनाची महाराजांनी केलेली व्यवस्था, आजही ते जलनियोजनाला किती महत्त्व देत होते याची प्रचिती देते. किल्ला बांधताना जागेची अचूक निवड, उपलब्ध साधनांचा अचूक वापर आणि मुख्य म्हणजे जिथे किल्ला उभारणार तिथे दगडांच्या खाणी निर्माण करून, पठारावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची त्या खाणीत साठवणूक करून वर्षभर पाण्याची व्यवस्था कशी करावी, हे महाराजांनी दाखवून दिले.
सर्व किल्ल्यांवर वर्षभरात पाण्याची कमतरता जराही भासू नये याची खबरदारी घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विविध सूचना संबंधितांना केल्या होत्या, त्या या पुस्तिकेत वाचताना महाराजांची दुर्लक्षित झालेली जलनिती ही त्यांच्या अचाट, अफाट आणि दिग्विजयी पराक्रमासारखीच कशी महत्त्वपूर्ण होती, याची प्रचिती या जेमतेम पन्नास पानी पुस्तिकेतील शब्दाशब्दांत आणि वाक्यावाक्यांत येते. आज गोव्यात गावागावांत वर्षभर पाणीटंचाई असल्याच्या बातम्या नित्य प्रसिद्ध होत असताना दिसतात. शंभर टक्के साक्षरतेचा दावा करणाऱ्या गोव्यात जीवनावश्यक पाण्यासाठी मात्र नियमित रडारड असते. गोव्यात गावागावांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याबाबत स्पर्धा आहे व ती निश्चितच स्तुत्य आहे.
पण त्याचबरोबर जीवनात सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या पाण्याबाबत महाराजांची कायम कशी सजगता असायची, यासंदर्भातील माहिती देणारी ही पाणीदायिनी म्हणजेच जीवनदायिनी पुस्तिका आज प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरात व ज्या शाळांमधून गोव्याचा व देशाचा भावी नागरिक घडतो, त्यांच्या हातात पोहोचणे ही आजच्या काळाची गरज आहे. कारण जगातील सर्व पर्यावरणतज्ज्ञांनी व युद्धतज्ज्ञांनी ठासून सांगितले आहे की, तिसरे जागतिक महायुद्ध सोने, चांदी, सत्ता, जमीन-जुमला किंवा ऐश्वर्यासाठी होणार नसून, ते केवळ पाणी आणि पाण्यासाठीच होणार आहे. जगभरात भेडसावणारी पाण्याची समस्या ही संपन्न व समृद्ध समजल्या जाणाऱ्या गोव्यातही तितकीच गंभीर आहे. तात्पर्य, श्याम गांवकर यांनी अतिशय कष्ट घेऊन, ही पुस्तिका आणि शिवकालीन जलनितीच्या संदर्भातील उत्कृष्ट छायाचित्रे या पुस्तिकेत समाविष्ट करून 'हा सूर्य, हा जयद्रथ' याची प्रचिती दिली आहे.
पुस्तिका : शिवकालीन जलनिती (मराठी)
लेखक : डॉ. लहू गायकवाड
अनुवाद : शिवकालीन जलनिती (शिवकालीन उदकाचे व्यवस्थापन) (कोंकणी)
अनुवादक : श्याम अनंत गांवकर
अनु देसाई
हळर्ण, पेडणे-गोवा