पहिलवानाच्या भीतीने भटजींनी 'नाऱ्या' गड्याला कामावर ठेवले, पण त्याच्या अजब आणि उलट्या कामांमुळे भटजींचे अतोनात नुकसान झाले. त्याला कामावरून काढताही येत नसल्याने भटजी 'इकडे आड तिकडे विहीर' अशा संकटात सापडला.

भटजीबुवांना गडी पाहिजे होता म्हणून पहिलवानाने आपल्या भावाला, नाऱ्याला भटजीकडे गडी म्हणून आणून ठेवले. पण ह्या नाऱ्याला इतर कुठे काम का मिळत नव्हते, हे मात्र भटजींना काही दिवसांतच समजले. बिचारा डोक्याला हात लावून बसला. नाऱ्याला काही काम सांगावे तर तो त्याचे उलटेच करतो. बरे, ह्या नुकसान करणाऱ्या नाऱ्याला काही बोलायची सोय नाही; कारण याला काही बोलले तर त्याचा पहिलवान भाऊ आपली पाठ सोलायला मागेपुढे करणार नाही, याची भटजींना भीती. त्यामुळे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी गत भटजीबुवांची झाली. 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' म्हणावे तो असा, याची प्रचिती भटजीबुवांना आली.
पण ह्या नाऱ्याला असेच आपल्याकडे ठेवले तर आपल्याला धुळीला मिळवल्याशिवाय हा नाऱ्या काही दम धरायचा नाही, याची भटजींना पुरेपूर खात्री झाली. त्यामुळे याला अद्दल घडवलीच पाहिजे, असे भटजीबुवांनी मनोमन ठरवले. पण या गावात नाऱ्याच्या अंगाला बोट जरी लावले तरी त्याच्या भावापर्यंत ती वार्ता सहज पोहोचणार हे माहीत असल्यामुळे, दुसऱ्या गावात नेऊन याला शिक्षा करावी असे भटजींनी ठरवले. आता दुसऱ्या गावात तरी कुठे जायचे? खूप विचार करून त्यांनी आपल्या मावाड्याला म्हणजेच बायकोच्या माहेराला ह्या नाऱ्याला न्यायचे आणि तिथे त्याला चांगलीच अद्दल घडवायची, असे ठरवले.
झाले, मावाड्याला जाण्याचा दिवस उजाडला. भल्या पहाटे भटजींनी नाऱ्याला हाक मारली, "नाऱ्या, उठ, तयारी कर. आज आम्हाला आमच्या मावाड्याला जायचे आहे." नेहमी कामात तत्पर असणारा नाऱ्या लगेच म्हणाला, "आत्ता तयारी करतोय, काका." आणि काही क्षणांत तयार देखील झाला. मावाड्याची वाट जरा लांबची होती. भल्या पहाटेला वाट धरली तर साधारण दिवसभर चालून तिन्हीसांजेला मावळतीचे गाव दिसू लागायचे. एवढ्या लांबचा पल्ला गाठायचा म्हटल्यावर वाटेत खायला काहीतरी घ्यावेच लागेल. म्हणून भटजीबुवांनी वाटेत खाण्यासाठी तानलाडू, भूकूलाडू तर घेतलेच, शिवाय एक पिकलेल्या केळीचा भला मोठा घड घेतला. हे सर्व नाऱ्याच्या खांद्यावर दिले आणि भटजी पुढे झाले.
भटजी पुढे आणि नाऱ्या मागे अशी दोघांची स्वारी मावाड्याची वाट चालू लागली. भटजीबुवा पुढे असले तरी यांच्या मनात नुसती चलबिचल चालू झाली. 'एवढ्या लांबचा पल्ला आहे. नाऱ्याच्या खांद्यावर मी केळीचा घड दिला आहे. या नाऱ्याचा काही भरोसा नाही. याने वाट चालता चालता सगळी केळी खाऊन संपवली तर आपण उपाशी राहू.' मनात परत परत हा विचार येऊ लागल्यामुळे त्यांना चालताना धाप लागू लागली. शेवटी भटजीबुवा नाऱ्याला म्हणालेच,
"नाऱ्या, तुझ्या खांद्यावर केळीचा घड आहे. त्यातली केळी हळूच खाशील तर बघ. माझ्या पाठीला डोळे आहेत. तू जर केळी खाऊ लागशील, मला त्या डोळ्यांतून व्यवस्थित दिसणार. मग काही तुझी खैर नाही."
"नाही हो काका, तुम्ही निर्धोक चला."
आता कुठे भटजीबुवा शांतपणे चालू लागले. पण इकडे नाऱ्याचे मन अशांत झाले.
'अरे वा, आम्हा सगळ्यांना दोनच डोळे असतात, तेही कपाळावर. पण काकांना चार डोळे. दोन डोळे कपाळावर आणि दोन डोळे पाठीवर.' नाऱ्याला या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले. त्याने डोळे फाडून फाडून भटजींची पाठ न्याहाळली. पण छे! नाऱ्याला एकही डोळा दिसेना.
'खरंच का भटजी काकांना पाठीला डोळे आहेत? खरंच का त्यांना दिसत असेल का ह्या डोळ्यांनी?' आता नाऱ्या बेचैन झाला. ह्या डोळ्यांची एकदा परीक्षा घ्यायचीच, असे ठरवून त्याने हळूच केळीच्या घडापासून एक केळे तोडले आणि हळूच खाल्ले.
'अरे, आपण केळे तोडले तरीही काका आपल्याला काहीच बोलले नाहीत. कदाचित काकाच्या पाठीवरच्या डोळ्यांचे आपल्यावर लक्ष नसेल. परत केळे खाऊन बघूया.' असे म्हणून त्याने अजून एक केळे तोडले. तरीही काका काहीच बोलेना. काकांच्या पाठीवरच्या डोळ्यांचे लक्ष नसेल म्हणून नाऱ्या एकेक केळे तोडून खाऊ लागला. बघता बघता अख्खा घड संपला. नाऱ्याने घडाचा दांडा फेकून दिला आणि मनाशी विचार केला, 'अरे काय हे काका, एवढा मोठा घड मी संपवला तरीही यांचे माझ्यावर लक्ष नाही. आता तहान पण लागली आहे, बघूया हे तानलाडू खाताना तरी काकांच्या पाठीवरच्या डोळ्यांची आपल्यावर दृष्टी पडते का.' असे म्हणून नाऱ्याने तानलाडू आणि भूकूलाडू पण संपवले. हे सगळे खाऊन संपेपर्यंत दुपार झाली होती.
पहाटेला पिकलेल्या केळीच्या घडाचे आणि तानलाडू, भूकूलाडू यांचे ओझे घेऊन चालणारा नाऱ्या आता रिकामी झाला होता. त्यामुळे हात हलवत आरामात भटजीबुवांच्या मागोमाग चालत होता. पण बिचाऱ्या भटजीबुवांनी मात्र काहीच खाल्ले नव्हते. जेवणाची वेळ होताच त्यांच्या पोटात कावळे कलकल करू लागले. शेवटी एका पाण्याजवळची छानशी जागा बघून काका नाऱ्याला म्हणाले,
"चल रे नाऱ्या, केळी आणि लाडू दे बरे. फार भूक लागली आहे."
"अरे, असे काय करता काका? मी वाटेन वाटभर सगळी केळी खाल्ली, तरी तुमचे माझ्यावर लक्ष नाही. म्हणून मी हे लाडू सुद्धा खाल्ले. ते खाताना तरी मला बघाल, पण तुम्ही काय बघितले नाही. तुमच्या पाठीच्या डोळ्यांना दिसत नाही का काय?"
हे ऐकताच भटजीबुवा भुकेने आणि रागाने लालबुंद झाले. त्यांना खरेच आता काय करावे ते सुचेना. पोटात भुकेची आग आणि मस्तकात संतापाची आग यामुळे भटजीबुवा थराथरा कापू लागले. घटाघटा नदीचे पाणी प्याले आणि उपाशीच कसेबसे पावले टाकत ते आपल्या मावाड्याच्या घरी येऊन पोहोचले.
मावाड्याच्या घरी भटजीबुवांचे यथायोग्य स्वागत झाले. तेव्हा सांज संपून रात्र होत आली होती. सगळ्यांनी पोटभर जेवण केले. नाऱ्याचे खरे तर पोट तुडुंब भरले होते, पण भटजीबुवांच्या मावाड्याच्या घरी झालेल्या पाहुणचारावरही नाऱ्याने ताव मारला.
जेवणानंतर सगळे झोपायला गेले. नाऱ्या भटजीबुवांच्या ओसरीवर ठेवलेल्या बाकावर झोपला. भटजीबुवा आणि सगळे मेहुणे घरातील चौकात झोपले. झोपताना भटजीबुवांनी आपण कोणत्या संकटात सापडलो हे सांगताना, ह्या नाऱ्याची सगळी हकीकत आपल्या सगळ्या मेव्हण्यांना सांगितली. शिवाय याला कामावरून काढून टाकले तर आपली पाठ सोलण्याची धमकी ही याच्या पहिलवान भावाने दिल्याचे सांगत भटजीबुवा म्हणाले,
"काय सांगू तुम्हाला ह्या गड्याची करामत! जगणे मुश्किल करून सोडले आहे. एक वेळ हा नसता आणि कामे तशीच राहिली असती, त्यामुळे होऊ शकलेल्या नुकसानापेक्षा कैक पटीने नुकसान याला कामावर ठेवून झाले आहे. त्याने मला पार धुळीला मिळवले आहे."
मेव्हण्यांनी भटजीबुवांना धीर दिला.
"तुम्ही याला शिक्षा करू शकत नाही. आम्ही शिक्षा केली तरीही हा आपल्या भावाला जाऊन सांगेल आणि पाठ तुमचीच सोलली जाईल. त्यामुळे याला मध्यरात्री झोडपून काढायचे. रात्रीच्या काळोखात नाऱ्याला कोणी मारले हे त्यालाही सांगता येणार नाही. भरपूर मार खाऊन व्यंग आल्यामुळे तो कामावर ठेवण्याच्या लायकीचाही राहणार नाही." भटजीबुवांना आपल्या मेव्हण्यांचा हा सल्ला आवडला. पसंती दर्शवून भटजीबुवा आणि सगळे मेहुणे झोपी गेले आणि मध्यरात्र होण्याची वाट पाहू लागले.
'हम्म्म, मला मारायचं म्हणतात काय?' नाऱ्याच्या मेंदूपर्यंत एखादी गोष्ट पोहोचत नसली तरी त्याचे कान मात्र तीक्ष्ण होते. भटजीबुवा आणि मेव्हण्यांमध्ये चाललेले खलबत नाऱ्याच्या कानावर अचूक पडले. आपल्या जीवावर संकट आले आहे याची जाणीव त्याला झाली. नाऱ्या सतर्क झाला. घरातली सगळी मंडळी झोपली तेव्हा नाऱ्या हळूच उठला. त्याने पाहिले, आपण ज्या बाकड्यावर झोपलो आहोत त्या बाकड्याच्या खाली एक नुकतेच जन्माला आलेले वासरू आहे. त्या वासऱ्याला बघून नाऱ्याने शक्कल लढवली. नाऱ्याने हळूच बाकड्याखालील वासराचे चारही पाय बांधले. त्याला बाकड्याच्या वर झोपवले. त्याला नीट पांघरून घातले. हे पांघरून घातलेले वासरू बघताना कोणालाही वाटावे की माणूसच मुटकुळे करून झोपला असावा. अशा प्रकारे वासराला झोपवून स्वतः बाकड्याच्या खाली झोपला.
ठरल्याप्रमाणे भटजीबुवा आणि मेहुणे मध्यरात्री उठले. घरात जे काही दांडे मिळतील ते सगळे दांडे त्यांनी उचलले. चार मेव्हणे आणि एक भटजी, पाचही जणांनी मिळून रपारप नाऱ्यावर दांडे मारले. पण पहिल्याच दांड्याच्या आवाजाने बिचारे वासरू तळमळू लागले, हंबरू लागले. तो आवाज ऐकताच आपल्या हातून काय घोर चूक झाली, हे भटजीबुवा आणि मेव्हण्यांना समजले. त्यांनी पटकन आपला हात आवरता घेतला आणि वासराला न्याहाळतात, तोच बाकड्याखालून नाऱ्या बोंब मारीत सुटला, "अरे गावातल्यांनो, भटजीकाका वासराला मारतात रे मारतात!"
नाऱ्याच्या बोंब मारण्याबरोबर सगळा गाव उठला आणि भटजीकाकांच्या मेव्हण्याच्या घरी गोळा झाला. मधोमध बोंब मारणारा नाऱ्या आणि भटजी; त्यांच्या चहूबाजूंनी सगळे गावकरी. नाऱ्या ओरडत होता, "भटजीकाकांनी वासराला मारले रे मारले!" आणि केविलवाणे होत भटजीबुवा नाऱ्याला म्हणत होते, "सत्य बोल नाऱ्या, सत्य बोल!"(समाप्त)
गाैतमी चाेर्लेकर गावस