या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी आणि बकरी ब्रँड 'मैं-मैं' करणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून स्वतःचा 'बॅटरी बॅकअप' संपवण्यापेक्षा, कधीतरी स्वतःच्या वागण्याची 'मिरर टेस्ट' करून बघावी. कारण जग त्यांच्या फालतू कथा ऐकून फक्त मान डोलवत असते, त्यांच्यावर विश्वास ठेवत नसते.

शास्त्रज्ञांनी अजून एक शोध लावलेला नाहीये, ज्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने तातडीने घ्यायला हवी. हा शोध म्हणजे 'रिकामटेकडे' लोक! हे लोक म्हणजे देवाचे असे अद्भूत क्रिएशन आहेत, ज्यांना स्वतःच्या घरात काय शिजतंय याच्याशी काडीचाही संबंध नसतो; पण शेजाऱ्याच्या कुकरची कितवी शिटी झाली आणि त्यात डाळ कोणती होती, याचंच चोवीस तास टेन्शन असतं. हे साधेसुधे मानव नाहीत, हे तर 'चालते फिरते सीसीटीव्ही कॅमेरे' आहेत! या कॅमेऱ्यांची मेमरी इतकी अफाट असते की, स्वतःचे ब्लॅक अँड व्हाईट कारनामे विसरून हे दुसऱ्यांच्या आयुष्याचं एच.डी. फुटेज गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एक ठरलेले रोजचे रुटीन असते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत यांना एकच ध्यास असतो - 'कोण काय करतोय?' पण हे फुटेज साठवून ठेवायला त्यांना एक 'कान' हवा असतो. मग तो गल्लीचा कोपरा असो, ऑफिसची कॅन्टीन, दुसऱ्या सहकर्मीचे कॅबिन असो किंवा व्हॉट्सअॅप! एकदा का त्यांना एखादा 'कान' मिळाला की यांचं पुराण सुरू होतं - "अरे काय सांगू तुला, तो समोरचा ना, अगदीच वाया गेलाय. त्याचे संस्कारच खराब आहेत. त्याच्या बापाने त्याला काहीच शिकवले नाही, म्हणून तो आता असा झालाय.” अशा फालतू, मनघडंत शिजवलेल्या कहाण्या ऐकवताना जर समोरच्याने चुकून मध्येच अडवून स्वतःचे मत मांडण्याचा प्रयत्न केला, तर या चालत्या-फिरत्या कॅमेऱ्यांचा इगो दुखवतो. त्यांना मध्ये बोललेलं अजिबात चालत नाही. त्यांना फक्त आपला एकतर्फी चॅनल चालवायचा असतो.
दुसऱ्यांची तासंपट्टी करताना हे महाशय इतके वाहवत जातात की, थेट समोरच्याच्या आई-वडिलांवर आणि त्यांच्या संस्कारांवर पोहोचतात. "कोणाच्या आई-वडिलांनी काय संस्कार दिलेत, कोणाची लायकी काय," हे ठरवण्याचे जणू काही सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार यांनाच मिळालेले असतात. स्वतः घरात आई-वडिलांशी नीट बोलत नसतील, पण जगाला संस्कारांचे डोस पाजण्यात हे नेहमीच पुढे असतात. स्वतःच्या आई वडीलांना एखाद्या कोपऱ्यात टाकून देतील किंवा कुठे वाटेवर सोडून जातील, पण इतरांना दाखवताना मात्र जणू आम्हीच संस्कारी असे दाखवणार. तसेच त्यांचा हमखास एक प्रश्न असतो - "आणखी काय विशेष? आणखी काय नवीन?" मग पुढचा माणूस बुचकळ्यात पडतो की, 'काय सांगू? आलायस तर तूच पुढून, तूच सांग ना!'
या लोकांचा मुख्य अजेंडा एकच असतो - 'दुसरा कसा नालायक आणि मीच कसा दुधाने धुवून निघालेला देवमाणूस!' हे पटवून देणे. दुसऱ्यांबद्दल इतकं वाईटसाईट सांगायचं की, ऐकणाऱ्याला वाटावं, "बाप रे! हा माणूस किती महान आहे." पण गंमत अशी असते की, दुसऱ्यांना वाईट ठरवण्याच्या नादात ते स्वतःचे काळे कारनामे लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. पण त्यांना कोण सांगणार की, "बाबा रे, तुझे कारनामे आधीच 'जगप्रसिद्ध' आहेत!" गल्लीतल्या कुत्र्याला सुद्धा माहिती असतं. पण हे महाशय स्वतःला मात्र एकदम 'सत्य हरिश्चंद्र' किंवा 'महात्मा गांधींचे' थेट वंशज असल्यासारखे मिरवतात.
या लोकांच्या बोलण्यात एक शब्द फेव्हिकॉलसारखा चिकटलेला असतो - 'मी'. "तो असा करतो, हा असा करतो, पण 'मी' होतो म्हणून वाचले! त्याने ते केलं, पण 'मी' तिथे नसतो तर काय झालं असतं? माझ्यामुळेच ते काम झालं, लोक मलाच फोन करून विचारतात, मी आहे म्हणून इथे लोक मलाच भेटायला येतात.” यांच्या गप्पा ऐकताना कधीकधी शंका येते की, बिचाऱ्या सूर्याला रोज सकाळी उठवून पूर्व दिशेला आणून सोडण्याचं कंत्राट बहुदा यांच्याकडेच असावं! यांच्यामुळेच बहुदा पृथ्वी गोल फिरतेय आणि ऋतुचक्र चालतंय. बापरे बाप! किती तो 'मी, मी आणि मी'! आपण लहानपणापासून ऐकतोय की 'बकरी' सतत 'मैं-मैं' करते, पण या रिकामटेकड्या लोकांची स्पर्धा लावली तर बिचारी बकरी सुद्धा हरणार. यांचं ‘मैं-मैं’ इतकं भयानक असतं की कदाचित बकरी या स्पर्धेतून आधीच माघार घेईल.
यांची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, दुसऱ्यांबद्दल स्वतः रचलेल्या खोट्या अफवा खऱ्या आहेत हे पटवून देण्यासाठी हे जीवाचं रान करतात. अगदी छाती ठोकून खोट्या गोष्टी समाजात पसरवणार आणि त्यात त्यांना एक विकृत आनंद मिळतो. पण जेव्हा याच लोकांबद्दल एखादी खरीखुरी बातमी बाजारात येते, तेव्हा मात्र यांचे पित्त खवळते. दुसऱ्यांबद्दल रचलेल्या अफवांवर टाळ्या वाजवणारे हे लोक, स्वतःचे खरे कारनामे लोकांसमोर आले की, "जग किती वाईट आहे," म्हणत रडायला लागतात. ती बातमी आधीच जगभर पसरलेली असते, हे त्यांच्या 'ट्यूबलाईट'च्या खूप उशिरा लक्षात येते.
अशा माणसांमध्ये घमंड आणि माज जास्तच असतो. काल-परवा नोकरीत रुजू झालेल्यांना आणि काहीच येत नसलेल्यांना तर जास्तच माज असतो. त्यांना काम करायचे नसते, पण पैसे मात्र हवे असतात. काहीजण त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांचे 'कान भरण्याचे' काम करतात, म्हणून हा माज जास्त वाढतो. "तू पुढे जा, मी तुझ्या सोबत आहे," हे वाक्य वाईट मार्गावर चालणाऱ्यांसाठी सुद्धा वापरले जाते. काहीजण कामाच्या ठिकाणी आधी स्वतःचा फायदा बघतात आणि त्यानुसार तुमच्याशी जवळीक साधतात. काही जण म्हणणार, "तो मला त्रास देतो," पण आपल्या फायद्यासाठी पुन्हा त्याच माणसाबरोबर फिरताना दिसणार! एखाद्या चांगल्या माणसा बद्दल वाईट सांगून, त्याला दूर करून, तिथे स्वतःचा नंबर लावणार. जिथे सर्वांसमोर मिरवायला मिळते तिथे हे सर्वात पुढे, जणू काही 'मीच एकटा काम करतोय'; पण जेव्हा मुख्य काम असते, तेव्हा अनेक निमित्तं करून गायब होतात. सर्वात मजेशीर म्हणजे, हळूच नोटिफिकेशनमधून ग्रुपमधील मेसेज वाचणे - म्हणजे समोरच्याला ‘सीन’ म्हणून मिळू नये, आणि नंतर सांगणे की, "मी मेसेज वाचलाच नाही!" काहीजण ज्या दिवशी जास्त काम असते, त्याच दिवशी रजेवर जातात, काहीतरी विसरल्याचे नाटक करतात किंवा अर्जंट काम आलंय सांगून पळून जातात. इंटरनेट चालत नाही, लॅपटॉप ठीक नाही हे तर कामचोरांची राष्ट्रीय कारणे!
काहींना तर आपल्या पदाचा जास्तच माज असतो. ते फक्त दुसऱ्यांना त्यांचे पद विचारतात - "तू कोण? तुझे पद काय?"
हे सर्व लोक म्हणजे फिरते ज्ञानकोश आहेत. समाजात कसे वागावे, स्वभाव कसा मऊ असावा, यावर हे तासनतास व्याख्यान देऊ शकतात. पण, 'आधी केले मग सांगितले' हा नियम यांच्या डिक्शनरीत नसतो. स्वतःचा स्वभाव म्हणजे जणू काही जळजळीत अॅसिड, पण दुसऱ्यांना मात्र ते मधासारखे गोड बोलण्याचा सल्ला देणार! स्वतःच्या डोळ्यातले मुसळ त्यांना दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ शोधायला हे दुर्बीण घेऊन बसतात.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी आणि बकरी ब्रँड 'मैं-मैं' करणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून स्वतःचा 'बॅटरी बॅकअप' संपवण्यापेक्षा, कधीतरी स्वतःच्या वागण्याची 'मिरर टेस्ट' करून बघावी. कारण जग त्यांच्या फालतू कथा ऐकून फक्त मान डोलवत असते, त्यांच्यावर विश्वास ठेवत नसते. दुसऱ्याचे चारित्र्य धुण्यापेक्षा स्वतःच्या कारनाम्यांचे डाग थोडे स्वच्छ केले, तर कदाचित आयुष्याला काहीतरी अर्थ उरेल! नाहीतर स्पर्धा करायला 'बकरी' तर आहेच!