
अपघाताने क्रांतीकारी झालेल्या श्रीधरच्या वादळी आयुष्याची कहाणी म्हणजे श्री. चंद्रकांत काकोडकर यांची कादंबरी 'तेथे कर माझे जुळती', श्रीधर या पात्राभोवती या कादंबरीचे कथानक फिरते. अनाथ असलेला श्रीधर मावशीकडे वाढला, सर्व साधारणपणे शिकून नोकरीच्या शोधात असणाऱ्या श्रीधरच्या आयुष्यात अचानक एक अनपेक्षित वळण येते. लहानपणापासूनची बालमैत्रीण आणि तारुण्यातली प्रेयसी पुष्पा हिच्याशी लग्न करण्याची स्वप्न रंगवत असता ती कलावंतणीची मुलगी असल्याने तिच्यावर गावातील धनिक सावकाराची नजर असते आणि तो श्रीधरला दूर करण्यासाठी पोर्तुगीज पोलिसांकरवी त्याला अटक करवतो आणि श्रीधरच्या खडतर आयुष्याची सुरुवात होते. तुरूंगात त्याचा अमानुष छळ होतो, सगळ्यात शेवटी त्याची सुटका होते, त्यात घराकडे परतीचे मार्ग बंद होतात आणि त्यामुळे पावले नेतील तिथे निघालेल्या श्रीधरच्या आयुष्यात शांता येते. तो तिच्या घरी असताना एक घटना अशी घडते की तो क्रांतीमध्ये सामील होण्यास प्रवृत्त होतो. पुढील क्रांतीची वाट तुडवत असताना त्याला अनेक जीवलग सांगाती भेटतात. त्याचा परिचय साळू आणि फ्लॉराशी होतो आणि शेवटी त्याच्या तुकडीतला तो एकमेव व्यक्ती बचावतो आणि वाळपई मार्गे भारतात जाण्यासाठी वळला असता त्याला सुशीला भेटते, तेथे त्याचा निर्णय डळमळीत होतो, मात्र मन घट्ट करून तो आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी सह्याद्री ओलांडून भारताकडे कूच करतो आणि येथे या विराची कहाणी संपते.
या कादंबरीत तत्कालीन काळातील दक्षिण गोव्याचे सुंदर निसर्ग वर्णन आलेले आहे. अगदी लहान लहान बारकावे लेखकाने अप्रतिमरीत्या रेखाटले आहेत. त्यात तिथली देवळे, घरे, डोंगर-दऱ्या, टेकड्या, पाणवठे, सकाळ, रात्र, संध्याकाळ, जंगलं या सर्वांचे लक्षवेधी वर्णन सविस्तरपणे यात आलेले आहे तसेच गोव्यातील कोकणी बोलीभाषेचा वापर देखील यात लेखकाने केलेला आहे. मुख्यतः क्रांतिकारी घटनांच्या वेळचा संघर्ष इतक्या कुशलतेने लेखकाने वर्णिलेला आहे की ती दृश्ये अक्षरशः समोर घडत आहेत असे वाटून अंगावर शहारे उभे राहतात. क्रांतीकारांची पोर्तुगीजांशी होणारी चकमक आणि त्यात धारातीर्थी पडणारे स्वतंत्र वीर आणि नाईलाजाने त्यांचे शव त्यांच्या साथीदारांना तेथेच टाकून पळून जावं लागणं या प्रसंगांचे हृदयद्रावक वर्णन वाचताना वाचक आतून कोसळतो..
तत्कालीन काळातील पोर्तुगीज सत्तेचा फायदा घेत काही आप्तस्वकीयांनी केलेला छळ, पोर्तुगीजांच्या छळाचे प्रसंग, त्यांनी केलेल्या अन्यायाची शिक्षा निष्पाप स्त्रियांना भोगावी लागणे. स्त्रियांची शारीरिक आणि मानसिक भावनांची होणारी कुचंबणा, तिच्या इच्छेविरुद्ध लादलेली वासना आणि ती आतूर असून तिच्या वाटेला न आलेले शरीरसुख या दोन्हींचे चित्रण या कादंबरीत लेखकाने केले आहे. तसेच या कादंबरीत चुंबनासारखी काही श्रृंगारिक दृश्ये आलेली आपल्याला दिसून येतात. क्रांतीकारांनी महत्प्रयासाने आपल्या वैयक्तिक भावनांना घातलेला आवर, अनेकदा मोहाचे क्षण सामोरे असूनही त्याचे धुके दूर सारून शेवटपर्यंत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारे क्रांतीवीर लेखकाने चितारले आहेत. ही खडतर पण ध्येयवादी कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालेली आहे असे आपण म्हणू शकतो.
कादंबरी : तेथे कर माझे जुळती लेखक : चंद्रकांत काकोडकर
- अनु देसाई, हळर्ण, पेडणे-गोवा