Home >> तरंग >> एकादशी निसर्गस्नेही जीवनशैलीचा संदेश

एकादशी निसर्गस्नेही जीवनशैलीचा संदेश

एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा शरीराला विश्रांती देण्याबरोबरच निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा संदेश देते.

Story: साद निसर्गाची |
25th July, 10:47 pm
एकादशी निसर्गस्नेही जीवनशैलीचा संदेश

अाज जगासमोर हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, अन्नाची नासाडी, जैवविविधतेचा ऱ्हास आणि वाढता उपभोगवाद यासारखी गंभीर पर्यावरणीय आव्हाने उभी आहेत. या समस्यांवर उपाय शोधताना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक ज्ञानाकडेही पाहण्याची गरज आहे. अशा वेळी एकादशीची परंपरा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश देते.

भारतीय संस्कृतीत धरतीमातेला जीवनदायिनी मानले जाते. अन्न, पाणी, वनसंपदा आणि जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला धरतीमातेकडून मिळते. भारतीय संस्कृतीत धार्मिक महत्त्व लाभलेली एकादशी मानवाला निसर्गाचा समतोल राखण्यास शिकवते. आज जगभरात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जात असताना, एकादशी अन्नाचा आदर करण्याची आणि त्याचा जपून वापर करण्याची शिकवण देते.

एकादशीच्या दिवशी उपवास किंवा अल्पाहार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे एकादशी हा केवळ धार्मिक उपवासाचा दिवस नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा दिवस आहे, असे वाटते. या दिवशी कडधान्यांचा त्याग करून फळे, कंदमुळे आणि इतर नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. सात्त्विक आहार ग्रहण केल्याने निसर्गाने मानवाला दिलेल्या अन्नसंपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. उपवासामुळे संयम, साधेपणा आणि संसाधनांचा जपून वापर करण्याची भावना निर्माण होते. धरतीमातेने दिलेल्या अन्नधान्याची, पाण्याची आणि इतर नैसर्गिक संपत्तीची किंमत ओळखण्याची प्रेरणा मिळते. समतोल राखून नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याची शिकवण या गोष्टीतून मिळते.

एकादशीच्या दिवशी अनेकजण मांसाहार टाळतात. त्यामुळे प्राणीजीवनाबद्दल करुणा आणि सहअस्तित्वाची भावना दृढ होते. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे, ही जैवविविधतेची मूलभूत संकल्पना यातून अधोरेखित होते. उपवास केल्यावर अन्नाचे महत्त्व अधिक जाणवते. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळण्याची जाणीव निर्माण होते. अन्न वाया जाणे ही जागतिक पर्यावरणीय समस्या असल्याने एकादशीचा हा संदेश आज अधिक महत्त्वाचा ठरतो.

निसर्गात प्रत्येक गोष्ट संतुलनावर आधारित असते. ऋतूंचे बदल, दिवस-रात्र यांचे चक्र आणि सजीवांचे जीवन यामध्ये संतुलनाचे महत्त्व दिसून येते. एकादशी चांद्र पंचांगानुसार साजरी केली जाते. त्यामुळे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या नैसर्गिक चक्रांशी मानवी जीवन जोडलेले असल्याची जाणीव होते. भारतीय ऋषी-मुनींनी चंद्राच्या कलांचा मानवी शरीरावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासला होता. या काळात शरीरातील द्रवांवर होणारा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी उपवास करण्याचा बोध त्यांनी दिला. हलका आहार किंवा उपवास केल्यास पचनसंस्थेला आराम मिळतो. एकादशीनिमित्त केलेल्या उपवासामुळे अन्नाची नासाडी कमी होते आणि संसाधनांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

आधुनिक पर्यावरणीय संकटांचे एक प्रमुख कारण म्हणजे अतिरिक्त उपभोग. अधिक उत्पादन, अधिक वापर आणि अधिक कचरा या चक्रामुळे पृथ्वीवरील ताण वाढत आहे. एकादशी मात्र गरजा मर्यादित ठेवण्याचा संदेश देते. महिन्यातून दोन दिवस जाणीवपूर्वक साधेपणाने जगण्याची ही संकल्पना शाश्वत जीवनशैलीच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. पर्यावरण संवर्धन केवळ वृक्षारोपण किंवा प्रदूषण कमी करण्यापुरते मर्यादित नाही. आपल्या सवयींचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, याचे आत्मपरीक्षणही आवश्यक आहे. एकादशी हा स्वतःच्या जीवनशैलीचे पुनर्मूल्यांकन करण्याचा दिवस म्हणून पाहता येतो.

एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा शरीराला विश्रांती देण्याबरोबरच निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा संदेश देते. एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याची, पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची व संयम, मितव्ययिता, कृतज्ञता आणि सहअस्तित्वाची भावना निर्माण करून संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा देणारी एक सुंदर जीवनशैली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)