Home >> तरंग >> शिकार -भाग - २

शिकार -भाग - २

पहिल्या भागात आपण पाहिले की, पत्नी लक्षुमीचा तीव्र विरोध आणि अपशकुनाची भीती डावलून पट्टीचा शिकारी अर्जुना मोठ्या शिकारीच्या जिद्दीने डांगोरीच्या किर्र अंधाऱ्या जंगलात निघून जातो...

Story: कथा |
25th July, 11:21 pm
शिकार -भाग - २

जंगलात लपून बसलेल्या अर्जुनाचा सामना अचानक एका हिंस्त्र बिबट्याशी होतो. ऐनवेळी बंदुकीचा बार न उडाल्याने त्याचा करुण अंत होतो आणि संपूर्ण वाडीवर शोककळा पसरते.

हिला काय घरात थारा होईना. बऱ्याच दिवसांनी भेकराच्या पाळतीवर होता. आज तयारीने बाहेर पडलेला अर्जुना असा कसा माघारी येईल बरं! बघता बघता किर्र जंगलाच्या राईत, काळोखात गायब झाला. अंधारी, पण सवयीची पायवाट तुडवत कपाळाला बांधलेल्या बॅटरीच्या उजेडात पुढे पुढे जात होता. रानात थोडंफार चांदणं होतं, पण आडव्या येणाऱ्या ढगांनी तेही धूसर व्हायचं आणि पुन्हा अंधार गडद व्हायचा. रातकिड्यांचा आवाज तर कानात घुमत होता. कुठं तरी सावरीच्या झाडावर बसलेलं घुबड अधून-मधून घुमत होतं. पण लहानपणापासून या असल्या वातावरणात वाढलेला अर्जुना तिकडं कानाडोळा करत पुढे चाललेला. वाटेत मध्येच एक काळा साप एका वेलीवरून लोंबत खाली येत होता, क्षणात अर्जुनानं बंदुकीची बार खाचायची सळी काढली आणि सपकन वार केला. सापाचे दोन तुकडे मातीत पडले. वळवळणाऱ्या सापाच्या तुकड्यांकडे बघत त्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू पसरलं... किती विचित्र होतं ते. या सगळ्याची वर्षानुवर्षे त्याला सवय झालेली. रानात त्याच्या हातात बंदूक असली की त्याला कसली भीती नसायची.

आतापर्यंत तांबडीचा माळ पार करून थोडी चढण चढत, खांद्यावरची बंदूक सायला धरून पुढे चालला होता. कपाळावर बांधलेली बॅटरी दूरवर आपला प्रकाश फेकत होती. ठरल्या जागेवर जायला अजून थोडा वेळ होता. मध्येच थांबून त्यानं बिडी पेटवली आणि झुरक्यावर झुरके ओढत, धूर सोडत अर्जुना शिकारीच्या जागेवर पोहोचला. अंगावर फटकूर गुंडाळून, बार भरलेली बंदूक त्यानं सावरून धरली आणि झाडाच्या बुंध्याला टेकून बसला. भेकराची वाट बघत लपून बसलेला अर्जुना झाडांच्या सावलीत दिसेनासा झाला होता. अंधारात जंगल कसं जिवंत होऊन जातं ते तेव्हा कळत होतं. पानांआड काही ना काही सरसर व्हायची, वटवाघळे इकडून तिकडे गिरक्या घेत झाडीत गुसायची, रातकिड्यांचा आ वाज एकसारखा घुमत राहायचा, वाऱ्याची एखादी झुळूक सारं रान हलवून जायची; पण अर्जुना मात्र फटकूर गुंडाळून गप्प बसलेला.

थोडा वेळ झाला असेल, अर्जुनाला कसलीशी चाहूल लागली. तरीही अर्जुना थोडाही हलला नाही. भेकर नेहमीच्या जागेवर आलं आणि चरायला लागलं. अर्जुनानं आपली बॅटरी सुरू केली, त्या प्रखर प्रकाशझोतात भेकराचे डोळे चमकायला लागले. तोंडात गवताचा घास घेऊन ते जागच्या जागी कान टवकारून उभं राहिलं. पण एवढ्यात कुठून माहित नाही, त्या भेकरावर एका बिबट्यानं झडप घातली. अर्जुनाला कळायच्या आत सगळं घडत होतं. अर्जुना गोंधळला आणि त्याची जरा जास्तच हालचाल झाली.. काय करावं कळेना! एवढ्यात बिबट्याला अर्जुनाची चाहूल लागली. बॅटरीच्या प्रकाशात ते उमदं जनावर भेदक दिसत होतं. बिबट्याही रक्ताळलेल्या तोंडाने त्याच्याकडे बघू लागला. अर्जुनाकडे आता पर्याय नव्हता. अर्जुनाने बंदूक बिबट्याच्या दिशेने धरली... आणि घात झाला... बंदुकीचा चाप ओढला पण बार मात्र उडालाच नाही. आता मात्र अर्जुनाची भीतीने गाळण उडाली आणि क्षणात बिबट्याने मोठी झेप घेतली आणि अर्जुनाच्या गळ्याचा घोट घेतला. एवढ्यात दुसऱ्या शिकाऱ्यांची चाहूल लागली आणि बिबट्या रात्रीच्या अंधारात नाहीसा झाला. तोपर्यंत अर्जुनाच्या गळ्यातून गरम रक्त वाहून जात होतं. तडफडणारा अर्जुना रक्ताच्या थारोळ्यात, पालापाचोळ्यावर तळमळत होता. दुसऱ्या शिकाऱ्यांनी त्याला तसाच फटकुऱ्यात गुंडाळून घेतला आणि वाडीची वाट धरली.

कसाबसा त्याला घरात आणून टाकला आणि त्याची बंदूकही. आजपर्यंत या फटकुऱ्यातून कितीतरी शिकारी आल्या, पण आता मात्र तो स्वतःच त्या फटकुऱ्यातून बाहेर पडला. त्याचीच शिकार झाली होती. अर्जुनाची अवस्था पाहून सारी वाडी सुन्न झाली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने वाडी बिथरली. ते बघून लहान पोरांनी रडायला सुरुवात केली. लक्षुमी तर अवसान गळून बेशुद्ध होऊन पडली. पोरं बापाच्या भोवती रडून रडून त्याला उठवत होती, पण बाप काही उठेना. कुणीतरी बाया-माणसांनी पाणी मारून लक्षुमीला शुद्धीवर आणलं. आया-बाया तिच्या भोवती बसून रडायला लागल्या. आभाळ फाटून गेलं होतं. काही वेळापूर्वीची मनातली भीती आता तिच्या समोर खरी होऊन पडलेली. निपचित पडलेला अर्जुना रक्तबंबाळ अवस्थेत होता. शिकारीपायी अर्जुना गेला, एकटं पाडून गेला. यातून सावरायला मात्र लक्षुमीला बरीच वर्षं लागली. (समाप्त)

- प्रा. सागर डवरी, हरमल