Home >> ती >> सोळा वर्षांनंतर...

सोळा वर्षांनंतर...

खरंच, किती भाग्यवान होतो आम्ही! शिक्षक नव्हते, अडचणी होत्या, संकटं होती; पण मेहनतीच्या जोरावर त्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलो. कदाचित म्हणूनच आयुष्यात कितीही मोठी वादळं आली, तरी आम्ही कधी डगमगलो नाही.

Story: अनुभवलेलं |
10th July, 09:20 pm
सोळा वर्षांनंतर...

सोळा वर्षांनंतर... आठवणींच्या वाटेवर!”.              

आज खूप वर्षांनी गायत्री आणि सुनैना भेटल्या होत्या. २०१० नंतर थेट २०२६ मध्ये त्यांची भेट झाली. या सोळा वर्षांच्या काळात दोघींची लग्नं झाली, संसार सुरू झाले, मुलं झाली आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यात इतका व्यस्त झाला की पुन्हा भेटण्याचा योगच आला नाही.

गप्पा रंगल्या आणि सुनैना अचानक म्हणाली,

“तुला आठवतंय का गं? त्या दिवशी किशोरसोबत काय झालं होतं? तू अख्खी पाण्याची बाटली त्याच्या डोक्यावर ओतली होतीस! आठवतंय का? ते आठवून आजही हसू आवरत नाही.”

दोघी इतक्या मनापासून हसू लागल्या की डोळ्यांत पाणी आले.

आता तुम्ही म्हणाल, हा किशोर कोण?

किशोर... आमच्या महाविद्यालयीन जीवनाचा एक अविस्मरणीय भाग.

महाविद्यालयाचा पहिलाच दिवस. वर्गात सरांनी प्रश्न विचारला, “तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी घेण्याचा निर्णय का घेतला?”

मागच्या बाकावरून एका मुलाने आत्मविश्वासाने हात वर केला.

“सर, मला गणित हा विषय खूप आवडतो. म्हणूनच मी बॅचलर ऑफ सायन्सला प्रवेश घेतला आहे. बारावीत मला ८८ टक्के गुण मिळाले आहेत आणि मला पुढे गणित विषयातच करिअर करायचे आहे.”

त्याच्या आवाजातला आत्मविश्वास आणि भविष्याबद्दलची स्वप्नं स्पष्ट जाणवत होती.

पण वर्गात तो सगळ्यांपेक्षा वेगळाच दिसायचा. वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि स्वतःच्या विश्वात रमलेला स्वभाव. त्यामुळे फारसं कोणी त्याच्याशी बोलत नसे. अभ्यासाशिवाय त्याला दुसरं काही येत असेल, असंही कुणाला वाटत नव्हतं.

असेच दोन वर्षे निघून गेली.

शेवटच्या वर्षी आम्ही फक्त आठ विद्यार्थ्यांनी बी.एस्सी. गणित हा विषय घेतला. पण आमचं दुर्दैव असं की आमच्या विभागप्रमुख शिक्षिकेने आत्महत्या केली होती. जूनमध्ये कॉलेज सुरू झाल्यावर ही धक्कादायक बातमी समजली. त्यांच्या निधनानंतर विभागातील इतर शिक्षकांनीही राजीनामे दिले होते. फक्त नायर सर आम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकवायला येत असत.

जून आणि जुलै असेच अनिश्चिततेत गेले.

याच काळात आम्हाला किशोरचं खरं व्यक्तिमत्त्व समजलं. आम्ही त्याला माणसांत मिसळायला शिकवलं, नीटनेटके राहण्याचे धडे दिले. ऑगस्टमध्ये नवीन शिक्षक मिळाले. कमी वेळात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करायची होती. आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली.

आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं.

किशोरला तब्बल ९८ टक्के गुण मिळाले!

आम्ही त्याला चिडवत म्हणालो, “आता पार्टी हवी.”

दुसऱ्या दिवशी सुधारलेल्या किशोरने आमच्यासाठी फ्रूट अँड नट केक आणला.

तेवढ्यात गायत्रीने गंमत म्हणून म्हटलं,

“अरे किशोर, बघ रे! तुझ्या डोक्यावर कोंबडीने शी केली आहे.”

भोळ्या किशोरला ते खरं वाटलं.

तो घाईघाईने म्हणाला,

“हो का गं? पाणी घाल... लवकर पाणी घाल!”

आणि गायत्रीने क्षणाचाही विचार न करता अख्खी पाण्याची बाटली त्याच्या डोक्यावर ओतली! त्याचे ते लांब केस पूर्ण भिजून गेले.

इतक्यात सर वर्गात आले. त्यांनी फक्त एवढंच विचारलं,

“हे काय चाललं आहे?”

आम्हा सगळ्यांना पूर्ण तासभर हसू आवरत नव्हतं. पण कसंबसं हसू दाबून बसलो. सर वर्गाबाहेर जाताच आम्ही इतके हसलो की पोट दुखायला लागलं.

सुनैना पुन्हा म्हणाली,

“आठवतंय ना गं?”

गायत्री हसतच म्हणाली,

“हो तर! असे क्षण कसे विसरता येतील?”

खरंच, किती भाग्यवान होतो आम्ही! शिक्षक नव्हते, अडचणी होत्या, संकटं होती; पण मेहनतीच्या जोरावर त्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलो. कदाचित म्हणूनच आयुष्यात कितीही मोठी वादळं आली, तरी आम्ही कधी डगमगलो नाही.

आज तोच किशोर ‘डॉ. किशोर’ म्हणून आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे. आम्ही दोघी शाळांच्या मुख्याध्यापिका आहोत. आमचे इतर मित्र-मैत्रिणीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत आनंदाने आयुष्य जगत आहेत.

दोघींच्याही गप्पा सोळा वर्षांपूर्वीच्या त्या सुवर्णक्षणांत हरवून गेल्या होत्या. काही आठवणी काळाच्या ओघात फिकट होत नाहीत; उलट प्रत्येक भेटीत त्या नव्याने उमलतात आणि पुन्हा एकदा जगण्याला सुंदर अर्थ देऊन जातात.

- सौ. गौरी रोशन वेर्लेकर