ही वही 'बोलकी' का ठरली? तर मुलगा प्रत्येक चित्र लावल्यानंतर आईला प्रश्न विचारायचा आणि प्रत्येक वेळी तो बाईंकडे वही सोपवताना आपले चित्र समजावून सांगायचा. मग ते चित्र मी कुठून मिळवले? कसे लावले? काय बोलणे झाले? हे सर्वच…

अधूनमधून पुस्तक चाळत असताना ती वही तिच्या हाती लागायची आणि त्या वहीची पाने पलटताना ती आठवणीत हरवून सुखावून जायची. त्या वहीचे नाव होते, "संग्रह वही". प्रबोधन पूर्व प्राथमिक विद्यालय, पर्वरी येथील हा एक उपक्रम. मुलांना संग्रहाची आवड लागावी म्हणून विविध आवडणाऱ्या चित्रांचा, वस्तूंचा संग्रह करणे. आठवडाभर संग्रह करायचा, शुक्रवारी वही बाईंना दाखवायची व सोमवारी स्टार मिळवून घरी घेऊन जायची.
आज तिच्या हाती लागलेली ती वही तिच्या मुलाच्या शिशुवर्गातील म्हणजेच नर्सरीच्या वर्गातील, वर्षभराच्या आठवणींची वही.
एक-एक पान पलटताना आसू आणि हसू आणणारी ती वही आणि तिचं बाळ जशास तसे डोळ्यांसमोर आणणारी... ही सर्व किमया त्या वहीची होती. ती विसराळू होती, पण या वहीने तिच्या बऱ्याचशा आठवणी जाग्या केल्या होत्या.
ही वही 'बोलकी' का ठरली? तर मुलगा प्रत्येक चित्र लावल्यानंतर आईला प्रश्न विचारायचा आणि प्रत्येक वेळी तो बाईंकडे वही सोपवताना आपले चित्र समजावून सांगायचा. मग ते चित्र मी कुठून मिळवले? कसे लावले? काय बोलणे झाले? हे सर्वच... आई, मुलाचा संवाद कौतुकाने टिपून लिहून ठेवायची. सहज म्हणून हे घडले, पण आज हीच वही मायलेकाच्या आणि शिक्षिका-विद्यार्थ्यांच्या संवादातून बोलकी ठरली आणि तिचे मन आनंदाने भरून आले. काही संवाद पुढे दिले आहेत:
पहिले चित्र साईबाबांचे मिळाले व लावले:
मावशी: चला... चला हो...
कृतार्थ: कुठे? कुठे ग मावशी? कुठे जाऊया?
मावशी: शिर्डीला जाऊया, डोळे भरुनी बाबांना पाहूया... मी तर गाणे म्हणते.
कृतार्थ: बाई, अशी रोज मला मावशी फसवते, तुम्ही तिला ओरडा. हा, एकदा मी शिर्डीला जाऊन आलो आहे.
गणपतीची चित्रे:
कृतार्थ: पप्पा, मस्ती करता? देवबाप्पा बघतोय तुम्हाला हा! तो इथे पण आहे.
पप्पा: कोणी सांगितले तुला?
कृतार्थ: आईने.
(वही देताना)
कृतार्थ: बाई बाई, मी खूप मातीचे गणपती करताना पाहिले बाई! आई सांगते, "खूप वेगवेगळे देवबाप्पा असले, त्यांची नावे खूप असली, तरी बाप्पा मात्र एकच असतो." आमच्या घरात गणपती बाप्पा येतो.
कृष्णाचे चित्र:
कृतार्थ: बाई, आई सांगते हा कृष्णबाप्पा. पण कृष्णापेक्षा तू जास्त (मस्तीखोर) आहेस. त्याने आपल्या आईला एवढा त्रास दिला नसेल, एवढा तू मला त्रास देतोस.
पक्षांची चित्रे:
आई: बघ कसे पक्षी उडतात!
कृतार्थ: (केविलवाण्या नजरेने) आई, मी कसा उडू? मला पंख कुठे आहेत?
(वही देताना)
कृतार्थ: बाई, हा गरुड पक्षी. पण मामा म्हणतो याला गरुडदादा म्हणायचे, हा मी मामाकडे पाहिलाय.
मला जेवताना अंगणात चिऊ, काऊ, कुतू, माऊ, कोकू जमल्याशिवाय जेवता येत नाही. आमच्या शेजारची काकी माझ्यासाठी जेवताना गाणे म्हणते, "चिऊ, काऊ, कुतू, माऊ, या रे सारे या, अंगणातील दाणे-गोटे उचलूनी न्या. गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी, आयुष्यवंत करी त्याला कुलमाऊली."
मुलांची चित्रे लावल्यावर:
कृतार्थ: बाई, मला खेळायला खूप मुले हवीत, म्हणून आमच्याकडे कोणी मुले आली की मी पहिल्यांदा दरवाजा बंद करून घेतो.
फळांची चित्रे लावली:
कृतार्थ: बाई, मला मोठं आणि ताकदवान व्हायचं आहे, पण काहीच न खाता! भाजी नको, फळे नको, जेवण नको, दूध नको... फक्त आईचंच बुवा पाहिजे.
(आणि सांगायचे म्हणजे, शाळा सुटल्यानंतर वर्ग बंद करून आतल्या वर्गात तो आईचे दूध प्यायचा.)
पत्रिका व लग्नसोहळ्याची चित्रे:
कृतार्थ: बाई, मावशीचे लग्न हे... खूप मज्जा मज्जा आली! पुन्हा पुन्हा असे लग्न असू दे, मला कोणी ओरडत नव्हते.
सैनिकाचे चित्र:
कृतार्थ: माझे पप्पा पोलीस, माझे काका सैनिक, माझे दोन आजोबा सैनिक आहेत. मी काका आले की त्यांच्याशी खूप लढाई करतो. मी सैनिक होणार!
भाजीची चित्रे:
कृतार्थ: मी आईसोबत बागेत भाजीच्या बिया पेरतो, पाणी घालतो, भाजी काढतो. आई म्हणते, "हे तू कधी खायला शिकणार?"
प्राण्यांची चित्रे:
कृतार्थ: हे सर्व प्राणी मला आवडतात, हे प्राणी आमच्या घरात कधी येणार?
(खरोखरच प्राण्यांवर माया करणारा, जीव लावणारा आणि त्यांच्यासाठी ओक्साबोक्सी रडणारा तो जीव आहे.)
गाड्यांची चित्रे:
कृतार्थ: आई, मला काम करणाऱ्या मशीनच्या गाड्यांची चित्रे शोधून दे. ही माझ्या पप्पांची गाडी, ही काकांची रिक्षा, या रेल्वेतून माझी आत्या येते, ही माझ्या मामाची इंडिका.
कृतार्थ (बाईंना सांगताना): बाई, मी शेजारच्या संजनाकडून भांडून गाडीचे चित्र घेत असताना ते फाटले, पण वहीत लावताना मामाने मला ते एकत्र चिकटवून दिले. आणि संजना झोपल्यावर काकीने मला सगळी गाड्यांची चित्रे गपचूप वहीत लावायला दिली. (ही संजना शेजारची).
घर व गाडीचे चित्र:
कृतार्थ: बाई, आई म्हणते अभ्यास करून खूप मोठा हो, ऑफिसात कामाला जा, घर बांध, गाडी घे आणि सगळ्यांना गाडीतून फिरव.
बालजगतातील मुलांनी काढलेली चित्रे लावताना:
आई: ही मुलांनी काढून रंगवलेली चित्रे आहेत.
कृतार्थ: मोठा झाला की मी पण काढणार. आता तू माझा हात पकड आणि काढ. (पुढे हा त्याचा नावडता विषय ठरला).
घरट्याची चित्रे:
कृतार्थ: बाई, ही वेगवेगळ्या पक्षांची घरे. आई सांगते याला घरटी म्हणतात.
असे हे काही संवाद... पण प्रत्येक चित्राशी त्याचे जोडलेले नाते, विचार किंवा चित्रासोबत केलेली चर्चा, आठवणी, आवड-निवड आणि स्वप्ने आठवतात. हे प्रथम आईने त्याला वेळ देऊन, त्याची शोधक नजर बनवून संग्रह करायला लावला व संवाद टिपून ठेवला. तर ते चित्र बाईंना दाखवताना, समजावताना शिक्षिकेनेही ते कौतुकाने ऐकून घेतले आणि तो आपल्या चित्राबद्दल जे सांगतो, ते आईला सांगितले. तेही आईने टिपून ठेवले व त्या-त्या चित्रासोबत वहीतच लिहिले; आणि अशी ठरली ती एकमेव ‘बोलकी वही’.
त्यानंतर त्याची आवड पाहून त्याला पुढच्या वर्षी मोठी वही आणून दिली आणि पुढे संग्रह तो स्वतःच करत गेला. त्यात चित्रेच नव्हे तर विविधता होती. शंख-शिंपले, पक्षांची पिसे, दगड-गोटे असा तऱ्हेवाईक संग्रह त्याने केला. आणि तिन्ही वर्षे उत्कृष्ट संग्रहवहीचे बक्षीसही त्याने मिळवले. तो कुठेही जाऊ दे. मूळ घरी, मामाच्या घरी, शेजारी, पाहुण्यांकडे, जिथे जिथे चित्र दिसेल तिथून तो ते जमा करून आणायचा. एकही चित्र विकतचे नव्हते. चित्र लावल्यानंतर वही बाईंकडे देईपर्यंतही त्याला थारा नव्हता व बाईंकडून मिळेपर्यंतही धीर नव्हता. जेव्हा जेव्हा ती वही काढली जाते, तेव्हा त्याचे ते वर्ष प्रत्यक्ष अनुभवण्याचा सुखद आनंद मिळतो.
- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)